प्राज्ञपाठशाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्राज्ञ पाठशाळा या पानावरून पुनर्निर्देशित)

प्राज्ञपाठशाला महाराष्ट्राच्या वाई शहरातील वैदिक शिक्षण देणारी पाठशाळा आहे. ही शाळा कैवल्यानंद सरस्वती (पूर्वाश्रमीचे नारायणशास्त्री मराठे) यांनी इ.स. १९०१मध्ये सुरू केली.

इतिहास[संपादन]

कैवल्यानंद सरस्वतीचे गुरू प्रज्ञानंद सरस्वती इ.स. १९०४मध्ये समाधिस्थ झाल्यावर त्यांच्या स्मरणार्थ वाईतील या पाठशाळेचे नाव प्राज्ञपाठशाला असे करण्यात आले. अगदी सुरुवातीच्या काळात या पाठशाळेत वेदविद्येत पारंगत, कर्मकांडांत निष्णात आणि न्याय, व्याकरण, वेदान्त इत्यादी शास्त्रांचे अध्यापन करणारे संख्येने ५० च्या आसपास विद्वान होते.

तळेगाव येथील समर्थ विद्यालय नावाचे जुने विद्यालय होते. १९१० साली ते बंद पडल्यावर तेथील शाळेतील अनेक विद्यार्थी आणि शिक्षक वाईच्या प्राज्ञपाठशाळेत आले. शाळेत संस्कृत शिक्षणाबरोबर इतिहास-भूगोल, गणित, मराठी साहित्य, संगीत, शारीरिक आणि मैदानी खेळांचे शिक्षण हेही विषय शिकवले जात. त्या काळचा राष्ट्रीय क्रांतिकारकांचा गट, आणि लोकमान्य टिळक, अरविंद घोष आदी राष्ट्रीय नेते यांचा प्रभाव पाठशाळेतील विद्यार्थ्यांवर पडत असे. संस्थेतील शिक्षक हे अध्यापनाबरोबर प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्राचे अध्ययनही करीत.

कैवल्यानंद सरस्वती या पाठशाळेत पूर्ण वेळ काम करीत. त्यांना दिनकरशास्त्री कानडेमहादेवशास्त्री दिवेकर यांनी प्राज्ञपाठशाळेच्या प्रगतीसाठी सहकार्य केले.

विनोबा भावे १९१७ साली वेदान्ताच्या अध्ययनासाठी वाईच्या पाठशाळेत दाखल झाले. येथे त्यांनी आठ महिने शांकर तत्त्वज्ञानाचे अध्ययन केले. लोकमान्य टिळकांनी शाळेला भेट देऊन कैवल्यानंद सरस्वती यांचा गौरव केला. इतिहास संशोधक वि.का. राजवाडे या संस्थेत येऊन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करीत आणि संशोधनविषय प्रश्न सोडवण्यास उत्सुक असत.

इ.स. १९६२ मध्ये या संस्थेने वाईमध्ये महाविद्यालय सुरू केले. संस्थेचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व त्यानंतरचे अध्यक्ष प्रा. मे.पुं. रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी या संस्थेतून पी‍एच.डी. केली.