Jump to content

ईस्टर्न ऑर्थोडॉक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पौर्वात्य पारंपारिक या पानावरून पुनर्निर्देशित)

ईस्टर्न ऑर्थोडॉक्स तथा पौर्वात्य पारंपारिक हा ख्रिश्चन धर्माचा एक पंथ आहे.

पूर्वेकडील ऑर्थोडॉक्स मंडळे

[संपादन]

जुन्या रोमन साम्राज्याच्या पूर्वेकडील भागात आणि हल्लीचे पोलंड आणि स्वीडन यांच्या पूर्वेकडील भागात वस्ती करणाऱ्या ख्रिस्ती लोकास स्वतंत्र शाखाश्रयी ऑर्थोडॉक्स मंडळे असे म्हणतात. हे लोक प्रामुख्याने इसवी सन १०५३ साली कॅथोलिक महामंडळापासून अलग झाले. हल्लीची प्रमुख ऑर्थोडॉक्स मंडळे पुढीलप्रमाणे आहेत. पश्चिमेकडील सीरियन मंडळे, पूर्वेकडील सीरियन मंडळे, इजिप्तमधील कॉप्टिक मंडळे, आर्मेनियन मंडळे, कॉन्स्टॅन्टिनोपालची ग्रीक मंडळे, कॉन्स्टॅन्टिनोपालची अरेबियन मंडळे, रशियन ऑर्थोडॉक्स मंडळ इत्यादी. आणखी स्लाविक, रुमानियन व अंत्योखची ही ऑर्थोडॉक्स मंडळे आहेत. आजपर्यंत ही सर्व भिन्नभिन्न ऑर्थोडॉक्स मंडळे कॅथोलिक ख्रिस्तमहामंडळात परत आलेली नाहीत. तरी त्यांतील काही लहान मंडळे कॅथोलिक महामंडळात सामील झाली आहेत. त्यांची यादी खालीलप्रमाणे : सीरियन कॅथोलिक मंडळ, सिरो मलन्कार मंडळ (भारत), मारोनाईट कॅथोलिक मंडळ, खाल्डियन कॅथोलिक मंडळ, सिरो मलबार कॅथोलिक मंडळ (भारत), कॉप्टिक कॅथोलिक मंडळ, अबिसिनियान कॅथोलिक मंडळ, आर्मेनियन कॅथोलिक मंडळ, ग्रीक कॅथोलिक मंडळ, अरेबिअन कॅथोलिक मंडळ, स्लाव्हिक कॅथोलिक मंडळ इत्यादी. []

पूर्वेकडील ऑर्थोडॉक्स मंडळांचा इतिहास

[संपादन]

प्रारंभीच्या ख्रिस्तसभेचा जसजसा प्रसार होत गेला, तसतसे ख्रिस्तसभेमध्ये प्रेषितांच्या पठडीत तयार झालेले नेतृत्व विकसित होत गेले. प्रभू येशूचा एकच संदेश विविध भाषांत, प्रांतांत आणि संस्कृतींत मूळ धरू लागला, तसा त्या संदेशावर त्या त्या ठिकाणच्या संस्कृतीचा पगडा दिसू लागला. त्यातूनच रोमच्या नेतृत्वाखाली पाश्चिमात्य ख्रिस्तमंडळे फोफावू लागली. रोमन साम्राज्य फक्त इटली आणि रोमपर्यंतच मर्यादित नव्हते. ग्रीक रोमन संस्कृतीचा पगडा इटलीच्या भोवती पसरलेल्या व रोमन साम्राज्याच्या अंमलाखाली असलेल्या अनेक प्रांतांत दिसून येत होता. रोमन साम्राज्याच्या पूर्वेकडील भागात ग्रीक भाषा आणि संस्कृती इतर भागांपेक्षा अधिक प्रमाणात पसरलेली होती. या इतर भागांत लॅटिन भाषेचे प्राबल्य होते. एकीकडे ख्रिस्तसभेचा प्रसार होत होता तर दुसरीकडे याच ख्रिस्तसभेच्या उदरात पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील ख्रिस्तमहामंडळांचा अंकुर वाढत होता.

रोमन साम्राज्याच्या पूर्वेकडील भागात कॉन्स्टॅन्टिनोपाल (इस्तंबूल, तुर्कस्तान), अलेक्झान्ड्रिया. अन्तीयोक, पर्शिया आणि आर्मेनिया या ठिकाणी उदयास आलेल्या मंडळाना पौर्वात्य चर्च अशा नावाने ओळखले जाऊ लागले. तिथेच अलेक्झांड्रियन, अन्तिओखिअन (किवा पश्चिम सीरियन ), बिझान्ताईन, पूर्व सीरियन आणि आर्मेनियन या पाच मूलभूत उपासना विधीचा उगम झाला. दरम्यानच्या काळात रोम हे शहर पश्चिमात्य भागातील ख्रिस्तमंडळाची राजधानी म्हणून उदयास आली. तेथील चर्चेसनी लॅटिन ही आपली भाषा प्रमाणभूत मानली. त्यातही रोमन सम्राट कॉन्स्टॅनटाईन द ग्रेट याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यामुळे (इसवी सन ३१३) राजाश्रय मिळालेला हा धर्म रोमपासून कॉन्स्टॅन्टिनोपालपर्यंत वेगाने पसरत गेला. मात्र त्याच्या आयुष्याच्या अखेरीस रोमन साम्राज्याचे दोन तुकडे पडले. पूर्वेकडील कॉन्स्टॅन्टिनोपाल तर पश्चिमेकडे रोम अशा स्वतंत्र सत्ता उदयास आल्या. ग्रीक आणि लॅटिन भाषा, पवित्र आत्म्याविषयी शिकवण, धर्मगुरूंचे ब्रम्हचर्य, दृढीकरण सॅक्रॅमेन्टचे विधिचालक अशा विविध विषयांवर दोन्ही ख्रिस्त्यांमध्ये वाद सुरू झाले. शेवटी इसवी सन १०५४ मध्ये पूर्वेकडील चर्चेस आणि लॅटिन कॅथोलिक चर्च यांच्यात मोठी फूट पडली. (The Great Schism). पूर्वेकडील ऑर्थोडॉक्स चर्च यांनी रोममधील पोपची सत्ता अमान्य केली. मात्र पौर्वात्य उपासनेची परंपरा खंडित न करता काही चर्चेस रोमच्या अधिकाराखाली ख्रिस्ती जीवन जगत राहिली. याचा परिणाम म्हणजे या चर्चेसनी रोमन कॅथोलिक चर्चच्या पोपची सत्ता मान्य करीत असताना धर्मगुरूंना विवाहाची परवानगी देणे सुरूच ठेवले. या चर्चना ईस्टन कॅथोलिक चर्चेस असे (पूर्वेकडील ऑर्थोडॉक्स मंडळे) म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या सर्वोच्च धर्माधिकाऱ्यांना पॅट्रिआर्क या नावाने ओळखले जाते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ म. रा. लेदर्ले. ख्रिस्तमहामंडळाचा संक्षिप्त इतिहास.
  2. ^ फादर (डॉ.) रॉंबट डिसोजा. द्वितीय वाटीकन विश्वपरिषद (दस्तऐवजांचा गोषवारा).