Jump to content

पॅराग्लायडिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पॅराग्लायडिंग

पॅराग्लायडिंग हा हवेतील उड्डाण विषयक साहसी क्रीडा प्रकार आहे. यात विशिष्ट प्रकारच्या कापड व दोरीच्या सहाय्याने पंख ‍‍तयार करतात व ते हार्नेसला[मराठी शब्द सुचवा] जोडून चालक त्यात बसतो. हवेच्या झोतावर स्वार होऊन हे उंच भरारी घेते. ग्लायडर मध्ये कोणतेही कठीण धातू नसतात व त्याचा वेग हा हवेच्या दिशेप्रमाणे संतुलित होतो. पॅराग्लायडर कमी वेगाचे हलके व स्वस्त उड्डाणाचे साधन आहे. कोणतेही मशीन न वापरताही ग्लायडर द्वारे केवळ हवेच्या झोतावर तासनतास कित्येक हजार फुटापर्यंत हवेत उंच भरारी मारू शकते. एका मोठ्या पंखाखाली काही बेल्ट्सच्या मदतीने पायलट बसलेला असतो. पंखाचा आकार हा सस्पेंशन वायर्स आणि हवेच्या उच्च दाबामुळे व्यवस्थित राहतो.[१]

इंजिन नसतांनासुद्धा पॅराग्लायडर्स तासनतास आणि शेकडो किलोमीटर्स उडू शकतात, तरी १-२ तास आणि काही किलोमीटर्सचा प्रवासही असामान्य आहे. हवेच्या दबावाचा व्यवस्थित वापर करून पायलट काही हजार मीटरची उंची सहजपणे गाठू शकतात.

इतिहास[संपादन]

१९५२ मध्ये डोमिना जल्बर्ट, ने एक ग्लायडरचा वापर करून नियंत्रणात पुरेशी उंची गाठली होती.[२]

१९५४ मध्ये वाल्टर नेमार्क ने वर्तविले होते कि काही काळानंतर पायलट एखाद्या उंच ठिकाणी धावत जाऊन किंवा उतारावर धावून सुद्धा पॅराग्लायडिंग करू शकतील.[३]

मधल्या काळात विविध व्यक्तींनी, अभियंत्यांनी विविध प्रयोग करून त्यात सुधारणा केल्या.

१९८० पासून या साधनात अमुलाग्र बदल झाले आणि पायलट तसेच पॅराग्लायडिंगच्या ठिकाणांमध्ये बरीच वाढ झाली.

पहिल्या अनधिकृत विश्व पॅराग्लायडिंग स्पर्धेचे आयोजन १९८७मध्ये वेर्बियार स्वित्झर्लंड मध्ये आयोजित करण्यात आली होती.[४] १९८९मध्ये पहिल्या अधिकृत स्पर्धेचे आयोजन कोसेन, ऑस्ट्रिया मध्ये करण्यात आले होते.

युरोप मध्ये या खेळाची सगळ्यात जास्त वाढ झाली आहे. ज्यामध्ये एकट्या फ्रांसमध्ये २५,००० पेक्षा जास्त नोंदणीकृत सक्रीय पायलट आहेत

स्पर्धात्मक क्रीडा[संपादन]

स्पर्धात्मक पॅराग्लायडिंगचे विविध प्रकार आहेत:

क्रॉस-कंट्री फ्लाइंग: क्लब्स, विभागीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या पॅराग्लायडिंग स्पर्धांमध्ये होणारा हा एक शास्त्रीय प्रकार आहे.

एरोबॅटिक स्पर्धा: या मध्ये स्पर्धकांना विविध साहसी स्टंट करून दाखवायचे असतात. हा प्रकार एकट्याने तसेच जोडीनेही करता येतो. हा प्रकार सगळ्यात जास्त बघण्यासारखा असतो.

हाईक अँड फ्लायः या प्रकारामध्ये काही दिवस पॅराग्लायडिंग करायचे असते. रेड बुल ने अश्या प्रकारची अनधिकृत स्पर्धा २०१५मध्ये सातव्यांदा आयोजित केली होती.[५]

अश्या आयोजित केलेल्या स्पर्धांव्यतिरिक्त काही ऑनलाइन स्पर्धासुद्धा असतात ज्यामध्ये आपला पॅराग्लायडिंगचा ट्रॅक डाटा वेबसाईटवर अपलोड करायचा असतो.

सुरक्षितता[संपादन]

इतर कुठल्याही साहसी खेळाप्रमाणेच हा खेळहि संभाव्यरित्या धोकादायक आहे. उदाहरणार्थ २०१० मध्ये अमेरिकेत एक पायलट मृत पावला.[६] जो १०००० पॅराग्लायडर्समध्ये २ असा दर आहे. १९९४ ते २००० दरम्यान प्रत्त्येकी १०००० पॅराग्लायडर्समागे ७ असा पॅराग्लायडर्स जखमी होण्याचा दर होता.[७]

जखमी होण्याचा धोका योग्य अश्या प्रशिक्षण आणि धोक्याच्या व्यवस्थापनाने कमी करता येतो. योग्य अश्या साधनांचा वापर करून विशिष्ट आकाराचे आणि वजनाचे विंग्स, हेल्मेट, अतिरिक्त पॅराशूट आणि मऊ कुशन्सचा वापर करून जखमी होण्याचे प्रमाण कमी करता येते. प्रशिक्षित प्रशिक्षकाकडून घेतलेले पुरेसे प्रशिक्षण आणि आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाचे निर्णय यामुळे अपघातांचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी करता येते. बहुतांश अपघात हे प्रशिक्षणाचा अभाव आणि खराब हवामान यामुळे होतात.

प्रशिक्षण[संपादन]

पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या बहुतांश क्षेत्रात विविध राष्ट्रीय संगठनांकडून चालविली जाणारी पुष्कळ प्रमाणात नोंदणीकृत प्रशिक्षण केंद्रे चालविली जातात. विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण कालावधी थोड्याफार फरकाने वेगळा आहे, पण सामान्यपणे १० दिवसांचा प्रशिक्षण कालावधी असतो.

या प्रशिक्षणात काही महत्त्वाचे मुद्दे असतात. सुरुवातीच्या दिवसात पॅराग्लायडिंगचे मूळतत्त्वे, थेअरीस, पॅराग्लायडर्सचे कार्ये शिकविली जातात.

विद्यार्थ्यांना मग यामुळे जमिनीवर ग्लायडर नियंत्रित करणे, उड्डाण भरणे, आणि हवेत नियंत्रण ठेवणे या गोष्टी शिकता येतात. नंतर त्यांना कमी उंचीच्या टेकड्यांवरून उड्डाण भरणे आणि नियंत्रण करणे शिकविले जाते ज्यामुळे प्रशिक्षणार्थीला विविध प्रदेशांमध्ये कमी उंचावरून पॅराग्लायडिंग करण्याचा अनुभव घेता येतो.

हळू हळू जस जसे कौशल्य वाढतात तसे तसे उंचावरून प्रशिक्षण दिले जाते. ज्यामध्ये लांब प्रवास करणे, ग्लायडर वळविणे, वेग नियंत्रणात ठेवणे, ३६० अंशातून वळणे, बरोबर ठरवलेल्या जागेवरच उतरणे अशा इतर प्रगत गोष्टी शिकविल्या जातात.

बहुतांश अधिकृत प्रशिक्षण केंद्रे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीचे लायसेन्स देतात.


संदर्भ[संपादन]

  1. ^ "Four Essential Facts about the Sport of Paragliding".
  2. ^ "Who Invented Paragliding?".
  3. ^ "History of Paragliding". Archived from the original on 2009-09-13. 2017-07-20 रोजी पाहिले. no-break space character in |दिनांक= at position 8 (सहाय्य)
  4. ^ "1st FAI World Paragliding Championship". no-break space character in |दिनांक= at position 8 (सहाय्य)
  5. ^ "The Paragliding World Cup comes to Bir-Billing".
  6. ^ "2010 Paragliding Injuries Summary" (PDF). no-break space character in |दिनांक= at position 8 (सहाय्य)
  7. ^ "2011 FFVL Member Accident Report" (PDF). no-break space character in |दिनांक= at position 8 (सहाय्य)