Jump to content

पी. विठ्ठल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पी .विठ्ठल या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. पी. विठ्ठल ( जन्म : १ जून १९७५) (शिक्षण: एम.ए., नेट, पीएच.डी.) हे नांदेड विद्यापीठातील भाषा संकुलात मराठीचे विषयाचे प्राध्यापक आहेत. तसेच ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे माजी संचालक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन न व अभ्यास केंद्राचे प्रमुखही आहेत. नांदेडला येण्यापूर्वी पी. विठ्ठल हे औरंगाबाद येथील मराठवाड़ा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी महाविद्यालयात १६ डिसेंबर २००४ ते २८ जानेवारी २००९ पर्यंत पूर्णवेळ व्याख्याता होते. त्याआधी २००१ पासून त्यांनी शिवछत्रपती महाविद्यालयात अध्यापन केले आहे.

नांदेड विद्यापीठात मराठी विषयात पीएच.डी. आणि एम.फिल. करणाऱ्यासाठी डाॅ. पी. विठ्ठल हे संशोधक मार्गदर्शक आहेत. त्यांच्याकडे आठ विद्यार्थ्यांनी पीएच.डी केली आहे, तर सहा विद्यार्थ्यांनी एम.फिल केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे आणि शासन व्यवहारकोश उपसमितीचे ते सदस्य आहेत. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या आणि स्वायत्त महाविद्यालयांच्या अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत.

एकोणीसशे नव्वदनंतरच्या पिढीतील एक महत्त्वाचे कवी म्हणून पी. विठ्ठल यांची ओळख आहे. त्यांना बडोदा येथील अभिरुची गौरव पुरस्कार, अहमदनगर येथील संजीवनी खोजे काव्य पुरस्कार, नांदेड येथील प्रसाद बन ग्रंथ गौरव पुरस्कार, अमरावती येथील स्व. सूर्यकांतादेवी पोटे पुरस्कार. कोल्हापूर येथील धम्मपाल रत्नाकर पुरस्कार, महारष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा गदिमा पुरस्कार, पुणे , मनोरमा साहित्य पुरस्कार, सोलापूर, विदर्भ साहित्य संघाचा कवी श्रीधर शनवारे काव्य पुरस्कार, जळगाव येथील स्व. गणेश चौधरी काव्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शंकर पाटील पुरस्कार, आपटे वाचन मंदिराचा सर्वोत्तम कादंबरी पुरस्कारासह अनेक महत्त्वाचे सन्मान मिळाले आहेत.

प्रकाशित पुस्तके

[संपादन]
  • 'माझ्या वर्तमानाची नोंद' (कवितासंग्रह, गोदा प्रकाशन, औरंगाबाद,२०११ दुसरी आवृत्ती, लोकवाड्मयगृह मुंबई, २०१७ ) कवितासंग्रह
  • 'शून्य एक मी' (कवितासंग्रह, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे,२०१७) कवितासंग्रह
  • मी सार्वकालिक सर्वत्र (कवितासंग्रह , गोल्डनपेज पब्लिकेशन्स, पुणे, २०२२ कवितासंग्रह
  • 'करुणेचा अंतःस्वर' (लेखसंग्रह, कैलास पब्लिकेशन्स, औरंगाबाद, २०१६) लेखसंग्रह
  • 'जनवादी साहित्यिक : अण्णा भाऊ साठे' (संपादित, डायमंड प्रकाशन, पुणे २०१७) संपादन
  • 'जागतिकीकरण, बदलते सामाजिक वास्तव आणि समकालीन मराठी कविता' (पुस्तिका) (अक्षरवाङ्‌मय प्रकाशन, पुणे, २०१७) समीक्षा
  • 'वाङ्मयीन प्रवृत्ती : तत्त्वशोध' (प्रतिमा प्रकाशन, पुणे २००७) संपादन
  • 'विशाखा : एक परिशीलन' (संपादित, चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद, २००७) संपादन
  • 'संदर्भ : मराठी भाषा' (लेखसंग्रह, २०१४ मीरा बुक्स, औरंगाबाद ) लेखसंग्रह
  • 'मराठी कविता: समकालीन परिदृश्य', (समीक्षा, कैलाश पब्लिकेशन्स, औरंगाबाद, २०१९) समीक्षा
  • 'सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर' (संपादित, डायमंड प्रकाशन, पुणे २०१६) संपादन
  • वर्तमानाचा उच्चार, (लेखसंग्रह, गोल्डनपेज पब्लिकेशन, पुणे २०२१) लेखसंग्रह
  • समन्वयाचे क्षेत्र, (लेखसंग्रह, इसाप प्रकाशन, नांदेड २०२१) लेखसंग्रह
  • समकालीन मराठी कविता: दोन लेख, (समीक्षा, सौरव प्रकाशन औरंगाबाद, २०२१) समीक्षा
  • वैचारिक साहित्य (संपादन, अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव २०२१) संपादन
  • विश्लेषण, वैचारिक लेखसंग्रह (ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, २०२२ ) समीक्षा
  • 'संभ्रमाची' गोष्ट (राजहंस प्रकाशन, पुणे २०२३ ) कादंबरी

इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत.

पी. विठ्ठल यांनी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आणि नांदेड विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या काही पुस्तकांचे लेखन केले आहे. औरंगाबाद विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितेचा समावेश होता. याशिवाय मुंबई, अमरावती, जळगाव, गडचिरोली, नांदेड येथील विद्यापीठात त्यांच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. काही काळ त्यांनी विश्वकोशाचे (कुमार चरित्र -अपूर्ण राहिले) अभ्यागत संपादक म्हणूनही काम केले आहे.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या 'आशय' या मुखपत्राचे ते पहिले संपादक आहेत. याशिवाय 'भाषाभान' या त्रैमासिकाचे त्यांनी काही काळ संपादन केले आहे. पी. विठ्ठल हे मराठी भाषा अध्यापक परिषदेचे सहसचिव असून, मराठीतील बहुतेक सर्वच महत्त्वाच्या वाङ्‌मयीन नियतकालिकांमधून व वर्तमानपत्रांतून (उदा० अस्मितादर्श, आशय, ऊर्मी, कविता-रती, काव्याग्रह, खेळ, दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, पंचधारा, परिवर्तनाचा वाटसरू, पुण्यनगरी, प्रतिष्ठान, महाराष्ट्र टाइम्स, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, मौज, युगवाणी, लोकमत, लोकसत्ता, सकाळ, सांकृतिक कालनिर्णय, साक्षात, वगैरे) त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. साहित्य अकादमीच्या Indian Literatureच्या ३०१ व्या अंकात त्यांच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. याशिवाय त्यांच्या काही कवितांचे हिंदी अनुवादही (अनुवादकः प्रकाश भातंब्रेकर, सुनिता डागा, युवराज सोनटक्के, महेश लीला पंडित ) प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय डॉ. सतपाल भिकी यांनी त्यांच्या कवितांचे अनुवाद पंजाबी भाषेत केला आहे. विविध विद्यापीठातील उजळणी वर्गांत आणि विविध चर्चासत्रांत त्यांनी व्याख्याने दिली आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेकदा कवी व वक्ता म्हणून पी. विठ्ठल यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या www.mahanews.gov.in वेबपोर्टलवर त्यांनी 'आपली मराठी' या नावाखाली केलेले लिखाण आणि, दैनिक पुण्यनगरीच्या मराठवाडा आवृत्तीत 'करुणेचा अंतःस्वर' व दैनिक सकाळ मध्ये 'सम-विषम' ही सदरे सदर प्रचंड वाचकप्रिय ठरली होती. दैनिक आपलं महानगर (मुंबई ) या वर्तमानपत्रातील 'वर्तमानाचा उच्चार' हे त्यांचे सदरही वाचकप्रिय ठरले आहे.

सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक - २०२२, नाशिक