पिस्ता
पिस्ता (इंग्लिश: Pistachio किंवा Green Almond) हे छोटय़ा आकाराचे चविष्ट व कठीण कवचाचे पौष्टिक फळ आहे.
पिस्त्याचे कवच टणक, परंतु द्विदल असते. त्याच्या गरावर एक साल असते. आतील गराचा रंग हिरवट पिवळा असतो. पिस्त्याचे झाड आकाराने खूप मोठे व डौलदार असते. त्याच्या फांद्या समांतर व सर्व बाजूंनी सारख्या असून पानांनी बहरलेल्या असतात. पिस्त्याची झाडे इराण, अफगाणिस्तान, फ्रांस, अमेरिका, तुर्कस्तान या भागामध्ये जास्त आढळतात.
पिस्त्याला संस्कृतमध्ये म्युकुलका, निकोटक किंवा निकोचक म्हणतात. याचे शास्त्रीय नाव पिस्ताशिया व्हेरा (Pistacia vera) आहे.
गुणधर्म
[संपादन]पिस्ता चवीला मधुर, किंचित कडवट, उष्ण वीर्यात्मक असून पित्तकर व कफ-वातघ्न आहे. तो पचायला जड व धातूंचे पोषण करणारा, रक्तदोष नाहीसे करणारा आहे. पिस्त्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ आणि जीवनसत्त्वे हे सर्व घटक भरपूर प्रमाणात असतात.