पालक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पालक एक पालेभाजी आहे.

पालक

पालकचे शास्त्रीय नाव स्पिनॅसिया ओलेरोसिया असे आहे.

मध्य व आग्नेय आशियातून आलेले हे झाड साधारण ३० से.मी. (१ फूट) उंचीचे होते. याचा आयुष्यकाल साधारण एक वर्ष असतो. युरोप, अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि आशियातील अनेक भागांत पालकची लागवड केली जाते. भारतामध्ये प्राचीन काळापासून पालकाची लागवड केली जाते. पालकाच्या पानांच्या रंग, पोत आणि आकारानुसार पालक मुख्यता तीन जातीचे असतात. भारतीय आहारात पालक परोठया पासून ते पालक पनीर पर्यंत अनेक पाककृती आपल्याला पाहायला मिळतात. पालक हा त्यात असणा-या लोहामुळे उपयुक्त आहे. सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच औषधी गुणधर्म असल्यामुळे आरोग्यदायीसुद्धा आहे. भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून पालकची लागवड केली जाते. पालकाची पाने ही फिकट हिरवी, टोकाकडे निमुळती, गुळगुळीत व पसरट अशी असतात. पालक भाजी चेनोपोडिएसी या कुळातील वनस्पती आहे. पालकाचे देशी पालक आणि विलायती पालक असे दोन प्रकार पडतात. भारतामध्ये सहसा देशी पालकच आहारामध्ये वापरतो. विलायती पालक हा प्रकार आशियामध्ये आढळतो.

स्वरूप[संपादन]

पालकाच्या भाजीत जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिनलोह असते. पालक रक्तातील रक्तकणांची वाढ करते. पालकमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन निर्माण करणारे अ‍ॅमिनो अ‍ॅसिड असते.

लागवड[संपादन]

समशीतोष्ण कटिबंध हवामानात बाराही महिने पालकाचे उत्पन्न निघते. खरीप हंगामातील लागवड जून – जूलैमध्‍ये आणि रब्‍बी हंगामातील लागवड सप्‍टेबर आक्‍टोबरमध्‍ये केली जाते. भाजीचा सतत पुरवठा होण्‍यासाठी 10 ते 15 दिवसांच्‍या अंतराने हप्‍त्‍या हप्‍त्‍याने बियांची पेरणी करावी. पालक हे कमी दिवसात तयार होणारे पीक असल्‍यामुळे जमिनीच्‍या मगदुरानुसार योग्‍य आकाराचे सपाट वाफे तयार करून बी फेकून पेरावे आणि नंतर बी मातीत मिसळून हलके पाणी द्यावे. जमीन भारी असल्‍यास वापसा आल्‍यावर पेरणी करावी. फार दाट लागवड केल्‍यास पिकाची वाढ कमजोर होवून पानांचा आकार लहान राहतो आणि पिकांचा दर्जा खालावतो. पालकावर मर रोग, पानांवरील ठिपके, तांबेरा आणि केवडा या रोगांचा प्रादुर्भाव होतो. मर रोगामुळे उगवण झाल्‍यावर रोपांची मर होण्‍यास सुरुवात होते. हया रोगाच्‍या नियंत्रणासाठी पाण्‍याचा योग्‍य निचरा करावा आणि पेरणीपूर्वी बियाण्‍यावर थायरम हया बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. हवेतील आर्दता वाढल्‍यास पानांवर गोल करडया रंगाचे बांगडीच्‍या आकाराचे डाग पडतात.

जमीन[संपादन]

पालकाचे पीक विविध प्रकारच्‍या जमिनीत घेता येते. खारवट जमिनीतही पालकाचे पीक चांगले येऊ शकते. ज्‍या खारवट जमिनीत इतर पिके येऊ शकत नाहीत तेथे पालक घेता येते.

हवामान[संपादन]

पालक हे कमी दिवसांत तयार होणारे हिवाळी पीक असल्‍यामुळे महाराष्‍ट्रात कडक उन्‍हाळयाचे एक दोन महिने वगळून वर्षभर पालकाची लागवड करता येते. थंड हवामानात पालकाचे उत्‍पादन जास्‍त येऊन दर्जा चांगला राहतो. तर तापमान वाढल्‍यास पीक लवकर फूलो-यावर येते आणि दर्जा खालावतो

उपयोग[संपादन]

 • पालकाच्या बियांचा औषधासाठी उपयोग होतो. पालकच्या भाजीपासून अनेक पदार्थ तयार करता येतात.
 • पालकाच्या भाजीत लोह व तांब्याचा (कॉपर) अंश असल्याने रक्ताल्पता (अ‍ॅनिमया) या आजारावर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे. हिच्यामध्ये रक्तवर्धक गुणधर्म असल्याने रक्तकण निर्माण होण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते. तसेच पालक रक्त शुद्ध करतो व हांडाना मजबूत बनविण्याचे काम करतो.
 • आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टीने शाकाहार करणाऱ्या व्यक्तींनी पालकाच्या भाजीचे नियमित सेवन करावे. कारण मटन, चिकन, अंडी, मासे, यांच्या मासांतून जेवढय़ा प्रमाणात प्रथिने मिळतात, अगदी तेवढय़ाच प्रमाणात पालकाच्या भाजीतून मिळतात. म्हणून मासांहर न घेणाऱ्यांसाठी पालक सेवन हे वरदानच आहे.
 • पालकाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
 • पालकामध्ये रक्तशोधक गुणधर्म असल्यामुळे यकृताचे विकार, कावीळ, पित्तविकार यामध्ये उपयुक्त आहे.
 • आतडय़ांची ताकद वाढविण्यासाठी व त्यांना क्रियाशील बनविण्यासाठी पालकाचा एक ग्लासभर रस अनुशापोटी नियमितपणे सेवन करावा याच्या सेवनाने आतडय़ांतील मलाचे निस्सारण होण्यास मदत होते व शौचास साफ होऊन पोट स्वच्छ राहते.
 • शहाळ्याच्या पाण्यातून ताजा पालक रस दिवसातून दोन वेळा १-१ कप घेतल्यास मूत्र प्रमाण वाढून मूत्रातील आम्लता कमी होते व त्यामुळे लघवीला जळजळ, थेंब थेंब लघवी होणे अशी लक्षणे नाहीशी होतात.
 • पालक ही भाजी जीवनशक्तीचे मूलस्रोत आहे. त्यामुळे एखाद्या स्तन्यपान देणाऱ्या मातेला पुरेसे दूध येत नसेल तर अशा वेळी बालकाच्या वाढीसाठी बाळ चार महिन्यांचे झाल्यानंतर पालक पानांचे सूप करून बाळाला पाजावे. यामुळे बाळाची वाढ चांगली होते.
 • अनेक गर्भवती स्त्रियांमध्ये थकवा वाटणे, धाप लागणे, वजन कमी होणे, जुलाब लागणे ही लक्षणे जाणवतात. असे होऊ नये म्हणून गर्भवती स्त्रीने पोषक आहार म्हणून पालकाचा नियमितपणे वापर करावा.

औषधी गुणधर्म[संपादन]

 • अ जीवनसत्त्वाने परिपूर्ण अशी पालक भाजी खाल्ल्याने डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात. तसेच रातांधळेपणा या विकारावर पालक हे एक उत्तम परिपूर्ण औषध आहे.
 • पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो अ‍ॅसिड, प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असते.
 • आयुर्वेदानुसार पालक ही शितल, मूत्रल, सारक, वायुकारक, पचण्यास जड, पित्तशामक, रोचक व वेदनाहारी आहे.

हे करू नका[संपादन]

 • अतिपाणी घालून पालक भाजी शिजवू नये तसेच भाजी शिजल्यानंतर ते पाणी फेकून देऊ नये. यामुळे त्यामध्ये असणारे पोषक घटक वाया जाणार नाहीत. पालकाची भाजी स्वच्छ धुऊन पानांमध्ये जेवढे पाणी शिल्लक राहील तेवढेच पाणी भाजी शिजवताना वापरावे.
 • पावसाळ्यामध्ये पालकाच्या भाजीवर कीड पडते तसेच पालक हा वात प्रकोपक असल्याने सहसा पावसाळ्यात पालक भाजी खाऊ नये किंवा भाजी खायचीच असेल तर ती प्रथम स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन काढावी.

संदर्भ[संपादन]

http://www.marathiworld.com/muktangan-m/netbhet-jan2

https://www.loksatta.com/lifestyle-news/health-tips-in-marathi-spinach-use-and-health-benefits-1592393/

https://www.loksatta.com/lekh-news/health-benefits-of-spinach-1168382/

http://infoinmarathi.blogspot.in/2013/05/information-on-vegetables-in-marathi.html

http://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production/vegetables/palak-veg


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.