पाणी पुरवठा स्थानांचे संरक्षण
जलशुद्धीकरण केंद्रावरील परिचालकांना पाणी पुरवठ्याच्या जागा दूषित होऊ नयेत म्हणून फारच थोड्या प्रमाणात नियंत्रण ठेवता येते. कारण पाणी दूषित करणाऱ्या सर्व गोष्टींवर तसे नियंत्रण ठेवणे शक्य नसते. पाणथळाचे क्षेत्र (पांणथळ किंवा अपवाह क्षेत्र - पावसाचे पाणी जेवढ्या भागातून वाहात येऊन जलाशयास वा नदीस मिळते त्या सर्व भागाचे क्षेत्रफळ म्हणजे पाणथळ होय.) विकत घेण्यास परवडेल एवढे लहान असेल व त्याचा उपयोग पाणी पुरवठ्यासाठीच राखून ठेवता येत असेल किंवा विहिरी व झरे यांचा उपयोग फक्त पाणी पुरवठ्यासाठी करणे शक्य असेल तरच पाणी दूषित होऊ नये म्हणून थोडीफार खबरदारी घेता येते परंतु अशावेळी सुद्धा जर रासायनिक दृष्ट्या दूषित अशा पाण्याच्या दूरच्या साठ्यातून पाणी झिरपून विहिरीच्या पाण्यात मिसळले तर असे नियंत्रण ठेवणे अशक्य होते. सर्वसाधारणपणे सांगायचे झाले तर पाण्याच्या प्रदूषणास प्रतिबंध करण्यासाठी शासकीय यंत्रणेवर अवलंबून राहणे आवश्यक आहे. तसेच कमीत कमी खर्चात व जास्तीत जास्त प्रभावी शुद्धीकरण होण्याच्या दृष्टीने पाण्याच्या उपलब्ध साठ्याचे असे संरक्षण होणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.[१] पाण्याच्या प्रदूषणास आळा घालणे
पाण्याच्या साठ्याचे संरक्षण हे पाणीपुरवठ्यासकट सर्व साधनसंपत्तीचा विनियोग करणाऱ्या शासनसंस्थेकडे सोपविण्याची सध्याची पद्धत असते. म्हणून खाली दिलेल्या कार्याकरिता निश्चित योजना तयार कराव्या लागतात.
अ)विद्यमान प्रदूषणाच्या जागा व प्रदूषणाची कारणे शोधून काढणे ब) दूषित झालेले पाणी ठराविक गुणवत्तेपर्यंत शुद्ध करण्यासाठी किंवा ते जास्त दूषित होऊ नये म्हणून शहरातील मलजल तसेच कारखान्यातील उत्सर्जित पाणी शुद्ध करण्यासाठी यंत्रणा उभारणे. क) विद्यमान व संभाव्य अशा कारणांकरिता पाण्याचा उपयोग करणे.
साधारणपणे लोकांच्या गरजेनुसार, या सर्व उपयोगांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या वापरास अग्रक्रम दिला जातो. जलशुद्धीकरण केंद्रावरील परिचालकांना शासनाने आखलेल्या योजनेविषयी सर्व माहिती असणे जरूर असते. कारण त्यामुळे त्यांच्या अखत्यारीतील पाण्याच्या साठ्याची देखभाल करण्याच्या कामात, जरूर पडल्यास योग्य प्रकारे सहभागी होता येते. यासंबंधीचे नियम व योग्य कसोट्या समजून घेण्यासाठी पृष्ठभागावरील जलप्रदूषणावरील तांत्रिक समितीचा अहवाल, आंतरराष्टीय पाणीपुरवठासंघटना १९६१, ही नियमपुस्तिका वाचावी.
पाणथळाचे क्षेत्र लहान असेल व त्याची किंमत अल्प असेल तर ते विकत घेणे शक्य असते व अशा स्वतःच्या मालकीच्या सर्व क्षेत्रावर नियंत्रण ठेवणे व प्रदूषणाची उगमस्थाने नाहीशी करणे शक्य होते. शिवाय जंगलांची वाढ करून मातीची धूप थांबविता येते. आणि दलदलीच्या प्रदेशातील पाण्याचा निचरा करून रंगद्रव्ये तयार होण्यासारखी परिस्थिती उद्भवणार नाही अशी काळजी घेता येते. (रंगद्रव्ये - वनस्पतीतील रंगभरण करणारी द्रव्ये. उदा. क्लोरोफिल). वनस्पतीच्या कुजण्यामुळे त्या भागातून वाहणाऱ्या पाण्यात वनस्पतिज रंगद्रव्ये मिसळलेली असतात. दलदलीच्या जागेचा निचरा केल्यास उथळ डबकी नाहीशी होतात. अशा उथळ डबक्यात शेवाळयाच्या वाढीस अनुकूल परिस्थिती असते. व त्यामुळे तेथे शेवाळयाची वाढ होते. (शेवाळे - पाण्यात वाढणाऱ्या हिरव्या वनस्पती. डोळयाने सहज दिसणाऱ्या वनस्पतींना आपण शेवाळे म्हणतो. त्यासारख्याच अतिसूक्ष्म वनस्पतीही पाण्यात असल्याने त्यांनाही शेवाळे हाच शब्द वापरला आहे. )पाण्याच्या प्रवाहाबरोबर हे शेवाळे पाण्याच्या साठ्यात मिसळले जाऊन त्याचा जलाशयात बीज म्हणून उपयोग होण्याची शक्यता असते. उथळ डबकी नाहीशी झाली की आपोआपच पुढच्या गोष्टी टळतात. पाण्याला दुर्गंधी येऊ नये व पाणी बेचव होऊ नये यासाठी जलाशयातील शेवाळयाच्या वाढीवर नियंत्रण ठेवणे हा योजण्यात येणाऱ्या इतर उपायातील पहिला टप्पा आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ "संग्रहित प्रत". 2015-12-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-02 रोजी पाहिले.