पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर
पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर (२८ डिसेंबर, इ.स. १९०३ - ??) हे एक मराठी पोवाडेकार होते. स्वतःचे लिहिलेले पोवाडे ते रंगमंचावर गाऊन सादर करीत.
ख्यातनाम मराठी शाहीर व महाराष्ट्रातील शाहिरीकलेचा इतिहास लिहिणारे इतिहासकार. पूर्ण नाव पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर. स्वातंत्र्यपूर्व भारतातल्या सांगली संस्थानातील उगार खुर्द नावाच्या गावी खाडिलकरांचा जन्म झाला. खाडिलकरांचे वडील सरकारी नोकर असल्यामुळे खाडिलकर कुटुंबाच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत बदल्या होत असत. त्यामुळे खाडिलकरांना बालपणापासून विविध ठिकाणचे वेगवेगळे वातावरण अनुभवायला मिळाले. खाडिलकर लहान असतानाच प्लेगादी आजारांच्या साथीमुळे त्यांच्या माता-पित्यांचे दुःखद निधन झाले.[१]
विद्यार्थीदशेपासून खाडिलकरांना शिक्षणात रस होता, वाचनाची आवड होती. त्यामुळे त्यांनी सांगली येथील विलिंग्डन कॉलेज, वाई येथील प्राज्ञ पाठशाळा, कोल्हापूर येथील ताराराणी टिचर्स ट्रेनिंग कॉलेज ह्या शैक्षणिक संस्थांमधून विविध विषयांचे शिक्षण घेतले आणि बी. ए., एम. ए., बी. टी. ह्या पदव्या प्राप्त केल्या. केवलानंद स्वामी हे खाडिलकरांचे गुरू होते. वाई येथे शिकत असताना छत्रपतींच्या छत्री समारंभास उपस्थित राहण्यासाठी खाडिलकर वाईवरून रायगडला पायी चालत गेले. रायगडावर विविध शाहिरांचे वीरश्रीयुक्त पोवाडे त्यांनी ऐकले. ह्या पोवाड्यांतील वीररस भावल्याने खाडिलकरांना स्फूर्ती मिळाली आणि त्यांनी वीररत्नश तानाजी मालुसरेंच्या शौर्यगाथेवर एक दीर्घ पोवाडा रचून गायला. ह्या पोवाड्यापासून उदयोन्मुख शाहीर म्हणून पांडुरंग खाडिलकर प्रकाशझोतात आले. त्यानंतर त्यांनी अल्पकाळात अनेक पोवाडे रचले.
पां.द. खाडिलकरांनी रचलेले पोवाडे
[संपादन]- कल्याणचा खजिना लूट (शपथ घेतली शिवराजानं राज्य हिंदवी करण्याची।..)
- झाशीच्या राणीचा पोवाडा
- ठकास महाठक (महाठक ठका भेटला। अजब युक्तीला।...)
- वीररत्न तानाजीराव मालुसरे (स्वातंत्र्यसंगरीं अर्पुनि शिरकमलाला, स्वातंत्र्यदेविच्या पदीं लीन जो झाला...)
- ताब्यात आला गड परी सिंह तो गेला! ॥ (तानाजीचा आणखी एक पोवाडा)
- प्रतापगडचा रणसंग्राम (धन्य ! धन्य ! शिवराय जाहला धर्मरक्षणा अवतार।...)
- वीरमणि बाजीप्रभु देशपांडे (धन्य धन्य बाजी रणवीर। धन्य अवतार।... )
- वीराग्रणी मुरारबाजी देशपांडे अर्थात् पुरंदरचा वेढा (ज्याच्या कबंधानं भूतळी । तीनशें जण बळी । घेतले पुरंदरीं । मुरारबाजी धन्य धन्य सरदार ॥...)
- राजमाता जिजाबाई (सिंदखेडराजाला झाला जन्म जिजाई मातेचा।...)
- शाहिस्तेखानाचा पराभव (नाश कराया शिवरायाचा आला शाहिस्ताखान...)
- शिवप्रतिज्ञा (शिव छत्रपतीची कीर्ती। गाऊ दिनराती ।येईल मग स्फूर्ती । जाई भयभीति सारी विलयाला ! ॥
- शिवरायांचे पुण्यस्मरण (पन्नास वर्षे अखंड झुंजुनि राज्य हिंदवी स्थापियलें।...)
- संभाजी महाराजांचा पोवाडा
- स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पोवाडा
- नेताजी सुभाषचंद्र बोसांचा पोवाडा
- ^ "पांडुरंग खाडिलकर (Pandurang Khadilkar)". मराठी विश्वकोश. 2018-12-17. 2024-11-20 रोजी पाहिले.