पर्वतांचे प्रकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पर्वतांचे वर्गीकरण ज्या भूवैज्ञानिक प्रक्रियांनी त्यांची निर्मिती झाली, त्यांंनुसार करण्यात येते. पर्वतांचे प्रमुख प्रकार खाली वर्णन केल्याप्रमाणे आहेत.

वलित पर्वत : (वली पर्वत). जगातील बहुतेक मोठ्या पर्वतश्रेणींची उत्पत्ती वलीकरणाच्या वा घड्या पडण्याच्या प्रक्रियेतून झालेली आहे. अत्यंत दीर्घकाल चालणाऱ्‍या या जटिल (गुंतागुंतीच्या) प्रक्रियेला ⇨गिरिजनन असे नाव आहे. वलित (घड्या पडून निर्माण झालेल्या) पर्वतांच्या निर्मितीच्या सुरुवातीला भूखंडानजीकच्या उथळ सागराचा तळ हळूहळू खाली वाकविला जाऊन पन्हाळीसारख्या ⇨ भूद्रोणी तयार होतात व त्यांच्यात १२ ते १५ किमी. जाडीचे अवसाद (गाळ) साचविले जातात. पृथ्वीच्या कवचाच्या ज्या हालचालीमुळे भूद्रोणी निर्माण होतात त्याच हालचालींचा पर्याप्त परिणाम म्हणून पुढे त्यांतील गाळांच्या थरांवर क्षैतिज म्हणजे आडव्या दिशेने दाब येऊन त्यांना घड्या पडतात. भूद्रोणी तयार होण्यास सुरुवात होण्यापासून तो तीतील गाळांच्या थरांना घड्या पडून ते वरच्या दिशेने उंचावले जाण्यापर्यंतचा गिरिजननाचा काळ कित्येक लक्ष वर्षांचा असू शकतो. उत्तर अमेरिकेतील ॲपालॅचिअन, यूरोपातील आल्प्स व आशियातील हिमालय ही गिरिजननाने निर्माण झालेल्या वलित पर्वतांची उत्तम उदाहरणे आहेत.

विभंग-गट (ठोकळ्या) पर्वत : कित्येक मोठे पर्वत विभंगक्रियेमुळे (मोठ्या भेगा वा तडे पडण्यामुळे), विभंगप्रतलाच्या दोन्ही बाजूंचे खडकांचे गट खालीवर सरकून तयार झालेले आहेत. विभंग प्रतल तिरपे असल्यास वर सरकणारे खडकांचे गटही तिरपे झालेले असतात. कॅलिफोर्नियातील सिएरा नेव्हाडाच्या पर्वतरांगा ६५० किमी. लांबीच्या आणि ८० ते १२० किमी. रुंदीच्या, तिरप्या झालेल्या. विभंग ठोकळ्यापासून निर्माण झालेल्या आहेत. या ठोकळ्याची पूर्व बाजू उंचावली जाऊन त्याचा माथा समुद्रसपाटीपेक्षा ४,००० मी. उंच गेला आहे. हा ठोकळा मुख्यतः या प्रदेशात पूर्वी अंतर्वेशित झालेल्या ग्रॅनाइटाचा बनलेला असला, तरी मूळच्या सिएरा नेव्हाडाच्या पर्वत रांगा ज्या भूद्रोणीतील गाळांच्या वलीकरणाने तयार झाल्या, त्या थरांचे अवशेषही त्याच्यात दिसून येतात.

घुमटी पर्वत : भूकवचाच्या हालचालीमुळे जमिनीला विभंग न होता वरच्या बाजूने बाक येऊन किंवा स्तरित खडकांच्या थरात खालून शिलारस (मॅग्मा) घुसून ते थर घुमटाच्या आकाराच्या स्वरूपात उंचावले जातात. कालांतराने क्षरणाने माथ्यावरचे आच्छादनाचे खडक झिजून आतले गाभ्याचे अग्निज खडक डोंगर माथ्याच्या रूपात उघडे पडतात.

उत्तर अमेरिकेत दक्षिण यूटामधील हेन्री पर्वत छत्रक शैलांच्या (लॅकोलिथाच्या) अंतर्वेशनामुळे तयार झालेले आहेत. द. डकोटातील ब्लॅकहिल्स हे डोंगर आजूबाजूच्या सखल मैदानी प्रदेशापेक्षा कित्येक हजार मी. उंचावलेले असून १६० किमी. लांब व ८० किमी. रुंदीच्या लांबट घुमटाच्या आकाराचे आहेत. मात्र हा घुमट छत्रक शैलाच्या प्रकाराचा नाही. त्याचा उघडा पडलेला गाभ्याचा भाग ग्रॅनाइट व पेग्माइट खडकांचा बनलेला असून रॉकी पर्वताच्या गाभ्यातील अंतर्वेशनाशी त्याचा संबंध असल्याचे दिसते.

ज्वालामुखी पर्वत : पृथ्वीच्या कवचात काही किमी. खोलीवर तयार झालेल्या शिलारसाला भूपृष्ठाच्या चिरा-भेगांतून वाट मिळाली की, तो भूपृष्ठावर येतो. शिलारसात विरघळलेल्या वायूंच्या प्रमाणानुसार शिलारसाचा हा उद्रेक कमीअधिक स्फोटक स्वरूपाचा असतो, या क्रियेला ज्वालामुखी क्रिया म्हणतात. ज्वालामुखीच्या विवरातून लाव्हा आणि अग्निदलिक पदार्थ [→ अग्निदलिक खडक] बाहेर फेकले जाऊन त्यांचे आलटून पालटून थर त्या विवराभोवती साचू लागतात आणि त्यांचा शंकूच्या आकाराचा उंचवटा तयार होतो त्यांनाच ज्वालामुखी पर्वत म्हणतात [→ ज्वालामुखी–२]. लाव्हा व अग्निदलिक पदार्थ साचून त्यांची वाढ होत असल्यामुळे त्यांना संचयी पर्वत असेही म्हणतात. उद्रेकातून बाहेर पडणाऱ्‍या द्रव्यांचा जास्तीत जास्त संचय विवराभोवती होऊन तयार होणाऱ्‍या पर्वताची शंकूसारखी आकृती अनेकदा सममितीय (एखाद्या अक्षाभोवती सारखे भाग होणारी) असते. जपानमधील फूजियामा हा ज्वालामुखी त्याच्या सुबक आकृतीसाठी प्रसिद्ध आहे. इटलीतील व्हीस्यूव्हिअस, अर्जेंटिनातील ॲकन्काग्वा, आफ्रिकेतील किलिमांजारो इ. ज्वालामुखी पर्वत प्रसिद्ध आहेत. मेक्सिकोतील पारीकूटीन हा ज्वालामुखी अगदी अलीकडे (१९४३ मध्ये) निर्माण झालेला असून त्याची जन्मापासून पूर्ण वाढ होईपर्यंतची सविस्तर पाहणी करण्यात आलेली आहे.

अवशिष्ट पर्वत : कोणत्याही उंचावलेल्या पठारी प्रदेशाचे कालांतराने क्षरण होऊन डोंगराळ प्रदेशात रूपांतर होते. पठारावरून उतारांच्या दिशेने नद्या वाहू लागल्या म्हणजे त्या आपापल्या मार्गांत दऱ्‍या खोदतात. त्यामुळे दोन दऱ्‍यांच्या मधला कमी झीज झालेला भाग अवशिष्ट रूपाने उंचावलेला राहून त्यापासून डोंगर कटक, शिखरे व रांगा यांची निर्मिती होते. अवशिष्ट पर्वतांच्या प्रदेशात बहुतेक पर्वतांचे माथे जवळजवळ सारख्याच उंचीचे असतात. मूळचा पठारी प्रदेश जितका जास्त उंच आणि क्षरण घडवून आणणारे कारक जितके जास्त प्रभावी तितके वा डोंगररांगांचे व दऱ्‍यांचे स्वरूप अधिक उठावदार होते. भारतातील विंध्य, सातपुडा, सह्याद्री, पश्चिम घाट, पूर्व घाट इ. डोंगररांगा या अवशिष्ट पर्वतांचेच प्रकार आहेत. स्थलीप्राय (मैदानी) प्रदेशात एकाकी उभे राहिलेले प्रतिकारक्षम खडकांचे अवशिष्ट शैलही याच प्रकारचे होत.

सागरांतर्गत पर्वतश्रेणी : सागरी तळांचे संशोधन सुरू झाल्यापासून सागरतळावरही कित्येक जागी खऱ्‍या अर्थाने पर्वत म्हणता येतील, अशा पर्वतांच्या रांगा आढळल्या आहेत. यांपैकी अटलांटिक महासागरातील दक्षिणोत्तर दिशेने गेलेली जवळजवळ सलग अशी मध्य अटलांटिक पर्वतश्रेणी ही सर्वांत मोठी आहे. सु. १६,००० किमी. लांब व ८०० किमी. रुंद असलेली ही पर्वतरांग आइसलँडपासून सुरू होऊन थेट अंटार्क्टिकापर्यंत पोहोचते. या पर्वतरांगेतील बहुतेक शिखरे पाण्याखाली एक किंवा अधिक किमी. खोलीवर असून काही तुरळक शिखरे पाण्यावर बेटांच्या स्वरूपात डोकावतात. यांपैकी सर्वांत मोठे शिखर पीकू आल्टो हे समुद्रसपाटीपासून २,२८४ मी. उंच असून त्याचा पायथा पाण्याखाली ६,००० मी. खोल आहे.

संदर्भ[संपादन]