Jump to content

पद्मिनी (स्त्रीविशेष)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्राचीन भारतीय सौंदर्यशास्त्रानुसार तरुण स्त्रियांच्या बोलण्या-चालण्या-वागण्यावरून आणि स्वभाव-प्रवृत्तींनुरूप कल्पिलेल्या चार स्त्रीविशेषांपैकी पद्मिनी हा एक प्रकार होय. चित्रिणी, शंखिनी आणि हस्तिनी हे अनुक्रमाने अन्य तीन होत. [ संदर्भ हवा ].

पद्मिनीला सायुज्यता असेही नाव आहे. सायुज्यता ही मोक्षाची चौथी पायरी समजली जाते. सालोक्यता, सामीप्यता, व सारूप्यता या अनुक्रमाने पहिल्या तीन पायऱ्या होत.

आदि शंकराचार्यांच्या लघुवाक्यवृत्तीतले या संबंधीचे श्लोकः

देव गंधर्व यक्ष स्वर्गावासी । तेथून जरी सत्यलोकवासी । हे उत्तम गति असे जीवासी । परी संसृति न चुके ॥३३८॥ सलोकता समीपता । तिसरी ते मुक्ति स्वरूपता । चौथी सगुण ही सायुज्यता । परी भ्रमणें न चुके ॥३३९॥ सायुज्यांत जे उर्ध्व गती । तयाही म्हणावी संसृती । मा अधमत्वें जे मरती जन्मती । तेथें बोलणें नको ॥३४०॥ जोंवरी अज्ञान न फिटे । जंव स्वरूपज्ञान नव्हे गोमटें । तोंवरी संसृति न पालटे । जन्ममरणरूप ॥३४१॥

पद्मिनीचे गुणविशेष

[संपादन]

तिचा चेहरा नेहमी पूर्ण चंद्राप्रमाणे प्रफुल्लित असतो. तिचे मांसल शरीर सरसासारखे किंवा मोहरीच्या फुलांसारखे मुलायम असते. त्वचा पातळ, नाजुक आणि पीतकमलासारखी गोरी असते. ती क्वचित सावळी असली तरी काळी कुळकुळीत नसते. तिच्या सावळा रंगाला पाऊस पाडायला उत्सुक असलेल्या ढगाच्या जांभळट रंगाची तारुण्याची झळाळी असते. तिचे तेजस्वी डोळे वासराच्या डोळ्यांसारखे सुरेख, रेखीव असून डोळ्याचे कोपरे लालसर असतात. तिचे उरोज भरलेले आणि उंचसर असतात. तिचा गळा शंखाकार असून नितळ आणि पारदर्शक असतो. तिचे नाक सरळ आणि आकर्षक असते. तिच्या कमरेवर सुरकुत्यांच्या तीन घड्या असतात. ती चालताना हंसासारखी मंद चालते. तिचा आवाज हळू आणि कोकिळेच्या संगीतासारखा सुस्वर असतो. तिला पांढरे शुभ्र उंची कपडे आणि छोटी नाजुक रत्ने आनंदित करतात. तिची झोप हलकी असते. ती हुशार, चाणाक्ष आणि आतिथ्यशील असते. तिचे व्यक्तिमत्त्व आदर वाटावे असे असते. ती वृत्तीने धार्मिक असून देवपूजेत रमते. आणि म्हणूनच तिला धार्मिक विषयांवरील चर्चेत रस असतो.