Jump to content

महादेवशास्त्री जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पं. महादेव शास्त्री जोशी या पानावरून पुनर्निर्देशित)
महादेवशास्त्री जोशी
जन्म नाव महादेवशास्त्री सीताराम जोशी
जन्म जानेवारी १२, इ.स. १९०६
मृत्यू डिसेंबर १२, इ.स. १९९२
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कोशवाङ्मय, कथा
प्रसिद्ध साहित्यकृती भारतीय संस्कृतिकोश, कन्यादान, धर्मकन्या, वैशाख वणवा, मानिनी, जिव्हाळा

महादेवशास्त्री सीताराम जोशी (जन्म : आंबेडे गोवा, १२ जानेवारी १९०६; - १२ डिसेंबर १९९२) हे मराठी भाषेतील लेखक व कोशकार होते. वेदान्त, व्याकरण, ज्योतिष, काव्यशास्त्र यांचे पारंपरिक पद्धतीने अध्ययन करून त्यांनी शास्त्री ही पदवी संपादन केली. यानंतर गोव्यामध्ये 'सत्तरी शिक्षण संस्थे'ची स्थापना करून स्वतःला शैक्षणिक कार्यात वाहून घेतले. चैतन्य मासिकाचे ते संपादक होते. त्या मासिकातच 'राव्याचे बंड, ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. 'वेलविस्तार' हा त्यांच्या पहिला कथासंग्रह. यानंतर त्यांचे 'खडकातील पाझर', 'विराणी', 'कल्पवृक्ष' मिळून १६ कथासंग्रह प्रसिद्ध झाले. ते गोव्याचे असल्याने गोमंतकीय प्रदेशातल्या चालीरीतींसह जगणाऱ्या चांगल्या वाईट माणसांची जिवंत आणि रसरसीत वर्णने, रसाळ भाषा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य समजले जाते. त्यांच्या काही कथांवर 'कन्यादान', 'धर्मकन्या', वै'शाख वणवा', 'मानिनी', 'जिव्हाळा', 'थांब लक्ष्मी कुंकू लावते' हे चित्रपट तयार झाले.

१९५७ साली स्थापन झालेल्या भारतीय संस्कृती कोश मंडळाचे ते संपादक होते. या संस्थेसाठी भारतीय संस्कृतिकोशाचे दहा खंड लिहून त्यांनी पूर्ण केले. याशिवाय चार खंडांचा मुलांचा संस्कृती कोशही त्यांनी तयार केला.

भारतदर्शन ही प्रवासवर्णनमाला, आईच्या आठवणी हे बालसाहित्य, मुलांचा नित्यपाठ, श्री आद्य शंकराचार्य आदी साहित्य त्यांच्या नावावर जमा आहे. 'आत्मपुराण, आणि 'आमचा वानप्रस्थाश्रम ' या नावाने त्यांनी आत्मचरित्र लिहिले. महादेव शास्त्री जोशी ह्यांचा गोवा मुक्ती संग्रामात महत्वाचा वाटा होता.ते v त्यांच्या पत्नी सुधाताई यांनी अनेक सत्याग्रह केले. महादेव शास्त्री जोशींनी धावे चा सत्याग्रह व्हावा यासाठी प्रयत्न केले.

महादेवशास्त्री जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • आईच्या आठवणी (बालसाहित्य)
  • आत्मपुराण (आत्मवरित्रपर)
  • श्री आद्य शंकराचार्य (चरित्र व कार्य)
  • आमचा वानप्रस्थाश्रम (आत्मचरित्रपर)
  • कल्पवृक्ष (कथासंग्रह)
  • खदकातील पाझर (कथासंग्रह)
  • तीर्थरूप महाराष्ट्र (अनेक भाग, महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांची माहिती )
  • भारतदर्शन (प्रवासवर्णनमाला)
  • भारतीय संस्कृतिकोश (दहा खंड)
  • मुलांचा संस्कृतिकोश (चार खंड)
  • विराणी (कथासंग्रह)
  • वेलविस्तार (कथासंग्रह)

सन्मान

[संपादन]
  • महादेवशास्त्री जोशी हे १९८० च्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

कुटुंबीय

[संपादन]

महादेवशास्त्रींच्या पत्नी सुधाताई जोशी यांनी गोव्याच्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेऊन तीन वर्षे तुरुंगवास भोगला. महादेवशास्त्रींनी पुण्यात धायरी येथे घर व शेती विकत घेतली होती. त्यांचे सुपुत्र अशोक जोशी यांना त्यामुळे शेतीमध्ये रस निर्माण झाला. शेतीत त्यांनी अनेक प्रयोग राबविले. आपल्या वडिलांचा कोशनिर्मितीचा वसा अशोक जोशी यांनी पुढे चालू ठेवला. त्यांच्या २५-२-२०१४ रोजी वयाच्या ७४व्या वर्षी .झालेल्या निधनापूर्वी अशोक जोशींनी ’कृषी विज्ञान कोश’ या ग्रंथाच्या १५ खंडापैकी ८ खंड प्रकाशित केले. ’अ’पासून ते ’क’ अक्षरापर्यंतचे काम त्यांनी पूर्ण केले आहे.