नैषधीय
नैषध, नैषधीय किंवा नैषधीयचरित या संस्कृत काव्याचा कर्ता श्रीहर्ष. तो इसवी सनाच्या बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात कनोजच्या विजयचंद्र आणि जय(न्त)चंद्र राजांच्या राजवटीत होऊन गेला. हे नैषधीय नामक काव्य, संस्कृत भाषेतील पंचमहाकाव्यांपैकी एक समजले जाते. पंचमहाकाव्यातील इतर महाकाव्ये - कुमारसंभव, किरार्तार्जुनीय, रघुवंश आणि शिशुपालवध. (रामायण आणि महाभारत या काव्यांना जुन्या काळी इतिहास समजले जाई, महाकाव्य नाही! )
या नैषधीय महाकाव्यात नल-दमयंतीची कथा आली आहे. हे २२ सर्गांचे काव्य आहे. महाभारतातल्या मूळ कथेप्रमाणेच या काव्यात नल-दमयंतीचे प्रेम, नल व हंसाची भेट, हंसाचे दूत होणे, स्वयंवर, नलाने केलेली लोकपालाची अयशस्वी वकिली, स्वयंवरात सर्वच जण नलासारखे दिसत असल्याने दमयंतीची झालेली पंचाईत, दमयंतीची हुशारी आणि शेवटी नल-दमयंती विवाह आदि प्रसंग आले आहेत. शेवटच्या चार पाच सर्गात नलाचे विवाहोत्तर दैनिक जीवन सांगितले आहे. अखेरच्या सर्गात दमयंतीचे चंद्रोदयवर्णन सांगून काव्य संपवले आहे.
या नैषधीय काव्याचा तेलुगू अनुवाद आंध्र प्रदेशातील काव्यप्रबंध काळातील कवी श्रीनाथ याने केला आहे. मराठीत रघुनाथपंडिताने लिहिलेले नलदमयंतीस्वयंवर नावाचे काव्य याच नैषधीयवर बेतलेले आहे.