नेल्सन डेब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नेल्सन डेब हा आसाममधील ३४ वर्षांचा तरुण स्त्रियांच्या मासिक पाळीसंदर्भातली निगा आणि व्यवस्थापन, सुविधा आणि प्रबोधन यात पुढाकार घेऊन हा विषय २०१३ सालापासून सतत ऐरणीवर आणत आहे. अरुणाचलम मुरुगनंतम यानंतरचा हा नवीन ‘पॅडमॅन’ आहे.

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळील बोकाखाट या कसब्यात राहाणाऱ्या नेल्सनचे शालेय शिक्षण तेजपूर (आसाम) येथील एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शाळेत झाले. पुढील शिक्षणासाठी २००२ मध्ये तो बंगलोरला गेला. अ‍ॅनिमेशन आणि मल्टिमीडिया तसेच फॅशन डिझाईन यांबद्दलचे दोन पदविका अभ्यासक्रम त्याने केले. पुढे इंग्रजी विषय घेऊन पदवीधर झाल्यानंतर त्याला एका ऑस्ट्रेलियन कंपनीत वेब डिझाइनिंगचे काम मिळाले. तीन वर्ष तिथे काम केल्यानंतर नेल्सनच्या मनात इंटरनेटच्या आभासी दुनियेद्वारा लोकांशी ‘कनेक्ट’ होण्यापेक्षा लोकांसाठी प्रत्यक्ष वेळ देऊन काहीतरी वेगळं करण्याची ऊर्मी निर्माण झाली. बंगलोरला तेव्हा सामाजिक उद्योजकतेची (सोशल आँत्रप्रेन्युअरशिप) चर्चा जोरात सुरू झाली होती. यादरम्यान २०१० मध्ये एका परिषदेत नेल्सनने अरुणाचलम मुरुगनंतम या तमिळनाडूतील ‘पॅडमॅन’चे वक्तव्य ऐकले. त्याने भारावून त्यांच्याविषयी, सामाजिक उद्योजकतेविषयी अधिक वाचन केले. या क्षेत्रातील लोकांनाही तो भेटला. नाताळच्या सुटीत घरी आल्यावर नेल्सनने आईवडिलांना सॅनिटरी पॅड निर्मितीचा लघुउद्योग सुरू करण्याचा मनोदय सांगितला. वडिलांनी त्याला अरुणाचलम यांचे काम जवळून पाहाण्यासाठी प्रोत्साहित केले, उद्योग सुरू करण्यासाठी लागणारे भांडवलही देऊ केले. २०११ मध्ये नेल्सन कोइम्बतूर येथे अरुणाचलम यांच्या कारखान्याला भेट द्यावयास गेला.

साधी राहाणी असणाऱ्या, उद्यमशील अरुणाचलम आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर नेल्सनने आपली भावी दिशा निश्चित केली. दशकभर बंगलोर येथे वास्तव्य केल्यानंतर तो आसामला परतला. सामाजिक उद्योग म्हणून त्याने ‘दि इको हब’ची रीतसर नोंदणी केली. ‘डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड’ निर्मितीसाठी २०१२ मध्ये स्वतः राहात असलेल्या इमारतीतच निर्मिती केंद्र सुरू केले. अरुणाचलम यांच्या फॅक्टरीतून ४-५ मशीन्स विकत घेतली. दहा गरजू स्त्रियांना शिफ्ट डय़ूटीमध्ये नोकरी दिली. प्लॅस्टिकचा दुरुपयोग थांबावा या उद्देशाने कागदी पिशव्यांची निर्मिती सुरू केली. ‘लेडी केर’ या नावाने काढलेल्या सॅनिटरी पॅडची विक्री करण्यासाठी नेल्सन ५-६ स्वयंसेविकांना घेऊन गावागावांतील किराणा दुकाने, फार्मसी शॉप्स, हॉस्पिटल्स येथे जनसंपर्क वाढवू लागला. घरात हस्तकलेचे काम करणाऱ्या स्त्री कारागिरांना बरोबर घेऊन त्याने फॅशन डिझाइनिंगच्या पूर्वी शिकलेल्या कौशल्याचा वापर केला. हातानं विणलेल्या सुरेख कांथा एम्ब्रॉयडरीचे कापड, कुर्ते, फाईल कव्हर्स यांची विक्री डिपार्टमेंटल स्टोर्स, मॉल्स, ब्युटिक्स यांना भेट देऊन करू लागला. अनेक नातलगांनी त्याला सॅनिटरी पॅडच्या विक्रीकरिता साहाय्य केले.

जनन आरोग्य आणि संबंधित मुद्द्य़ांवर नेल्सन अधिक अभ्यास करू लागला. ऑरोविल (तमिळनाडू) येथे कॅथी वॉकिंग या ‘इको फेम’ नावाची सामाजिक संस्था चालवणाऱ्या प्रशिक्षकाकडून त्याला नवा दृष्टिकोन मिळाला. रसायनयुक्त डिस्पोझेबल पॅड हे पर्यावरणस्नेही नसून पुनर्वापर करता येईल असे जैव-विघटनशील कापडी सॅनिटरी पॅड हा उत्तम पर्याय असल्याचे त्याच्या लक्षात आले. २०१७ अखेरीस केंद्र सरकारच्या एका प्रकल्पांतर्गत नेल्सनला त्रिपुरा, सिक्कीम, मिझोराम, मणिपूर येथे जाऊन कापडी पॅड निर्मिती युनिट सुरू करण्याची संधी मिळाली. महिला स्वयंसहाय्य गटांद्वारे हे केंद्र सुरू करून ते ईशान्येकडील अनेक राज्यांत चालवण्यासाठी तो प्रशिक्षण देऊ लागला. केंद्र सरकारने मग नेल्सनच्या ‘दि इको हब’ला आसाम येथे कापडी पॅड तयार करण्यासाठी लागणारी तीन मशीन्स दिली.

उद्योगात जम बसल्यावर नेल्सनच्या लक्षात आले, की स्वस्त सॅनिटरी पॅड स्त्रियांना मिळवून देण्याबरोबरच संबंधित विषयावर शास्त्रीय शिक्षण द्यायला हवे. त्यासाठी आसाममधील शाळा-महाविद्यालये, चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या मुलींना भेटून तो जाणीव जागृती करू लागला. २०१८ मध्ये ‘बोधना ट्रस्ट’ स्थापन करून या कामाला गती देण्यासाठी कष्ट घेऊ लागला. मासिक पाळी संदर्भातली लाज, लांच्छन दूर सारून या निषिद्ध समजल्या जाणाऱ्या विषयावर तो शाळांमधील मुलग्यांशीही संवाद करू लागला. आतापर्यंत १५,०००हून अधिक मुली आणि मुलग्यांना संवेदनशील करण्याचे काम ‘बोधना’ने केले आहे.

२०१९ मध्ये गोहत्तीच्या ‘रोटरी इंटरनॅशनल- जिल्हा ३२४०’ विभागाने बोधना ट्रस्टबरोबर एक महत्त्वाचा उपक्रम राबवला. आसामबरोबरच ईशान्येकडील १४० शाळांमध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन आणि वापरलेल्या पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी भट्ट्य़ा (इन्सिनरेटर्स) उभारणे, प्रजननसंस्थेचे आरोग्य आणि हात स्वच्छ धुण्यासंबंधीच्या जाणीव जागृतीचा कार्यक्रम, यांचा त्यांत समावेश आहे.

‘पिरियड ॲन्ड ऑफ सेन्टेन्स.’ या ‘ऑस्कर’ पुरस्कार विजेत्या बोलपटाच्या टीमने संपर्क केल्यावर नेल्सनच्या कामाला भरारी आणि लौकिक मिळाला. मासिक पाळीच्या विषयावर बेतलेल्या या बोलपटाद्वारे ‘दि पॅड प्रोजेक्ट’ या संस्थेची अमेरिकेत स्थापना झाली आणि त्याच्या प्रवर्तक मेलिसा बर्टन यांनी नेल्सनची सामाजिक बांधिलकी आणि उद्यमशीलता टिपली आणि त्यांनी नागालँड येथील डिमापूर जिल्ह्यात डिस्पोजेबल पॅड निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी ‘दि इको हब’ला अर्थसहाय्य दिलेे.