नॅडेप कंपोस्ट
नॅडेप कंपोस्ट किंवा नॅडेप खत (लेखन भेद: नादेपा, नादेप) हे एक शेती उपयुक्त सेंद्रिय खत असून हे सेंद्रिय तथा रासायनिक शेती या दोन्ही प्रकारात वापरले जाते. या खतामुळे जमिनीस मुख्य तथा सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. याच सोबत जमीन सजीव तथा भुसभुशीत होते. तसेच जमिनीत उपयुक्त असे नैसर्गिक सूक्ष्म जीव आणि गांडुळांची संख्येत लक्षणीय वाढ होते.
नॅडेप कंपोस्ट तयार करण्याची पद्धत ही यवमाळमधील शेतकरी तथा गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक नारायणराव देवराव पांढरीपांडे (नॅडेप काका) यांनी विकसित केली आहे. त्यांच्या पूर्ण नावाची इंग्रजीतील आद्याक्षरे NADEPA वरून महात्मा गांधी यांनी त्यांचे नामकरण नॅडेप असे केले होते.[१][२]
नॅडेप पद्धतीत शेतातील अवशेष, माती आणि शेण यांचे समप्रमाणात मिश्रण करून जमिनीच्या पृष्ठभागावर टाके तयार करून त्यात कंपोस्ट खत तयार केले जाते. या पद्धतीने एक किलो शेणापासून चार महिन्यांत तीस किलो खत तयार केले जाते. या पद्धतीचा मुख्य फायदा म्हणजे कमी शेणात जवळपास त्याच दर्जाचे कंपोस्ट खत निर्मिती करता येते. नॅडेप कंपोस्ट खालील प्रक्रियेद्वारे तयार केले जाते.
टाकी/हौद बनवणे
[संपादन]नाडेप कंपोस्टचा टाका अशा ठिकाणी बनवावा जिथे जमीन सपाट असेल आणि पाणी साचण्याची समस्या नसेल. टाकी बांधण्यासाठी अंतर्गत माप १० फूट लांब, ६ फूट रुंद व ३ फूट खोल असे असावे. अशा प्रकारे टाकीचे आकारमान १८० घनफूट होते. टाकीची भिंत ९ इंच रुंद ठेवावी. ही भिंत बनवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. भिंत बनवताना प्रत्येक ओळीत मधोमध छिद्र सोडले जातात. जेणेकरून टाकीमध्ये हवा खेळती राहील आणि कंपोस्ट प्रक्रिया सहज घडून येईल. प्रत्येक दोन विटांनंतर, तिसरी वीट जोडताना ७ इंच छिद्र सोडले जाते. प्रथम ३ फूट उंच भिंतीत, तिसऱ्या, सहाव्या आणि नवव्या पंक्तीमध्ये भोकं ठेवले पाहिजेत. भिंतीचा आतील आणि बाहेरील भाग गाईच्या किंवा म्हशीच्या शेणाने प्लॅस्टर केला जातो. हा थर चांगला सुकू द्यावा लागतो. या प्रकारच्या टंकामध्ये नाडेप खत तयार करण्यासाठी प्रामुख्याने चार गोष्टींची आवश्यकता असते.
- टाकाऊ पदार्थ किंवा कचरा - जसे की हिरवी पाने, साली, देठ, मुळे, बारीक फांद्या आणि टाकाऊ खत व पदार्थ इत्यादी. यात प्लास्टिक, पॉलिथीन, दगड आणि काच अशा न कुजणाऱ्या पदार्थांचा समावेश नसावा याची विशेष काळजी घ्यावी. या प्रक्रिये करीता १५०० किलो इतका कचरा आवश्यक आहे.
- ताजे ओले शेण - १०० किलोग्रॅम गायीचे किंवा म्हशीचे शेण किंवा गोबर गॅस प्लांटमधून बाहेर पडलेली शेणाची स्लरी.
- कोरडी माती -१७५० किलो पर्यंत कोरडी बारीक चाळलेली तलावातील किंवा शेतातील माती. गाय किंवा बैल बांधलेल्या ठिकाणची माती याकरिता उत्कृष्ट ठरते.
- पाणी - यात पाण्याची गरज ऋतुमानानुसार असते. जिथे पावसाळ्यात अल्प प्रमाणात तर उन्हाळ्यात जास्त प्रमाणात पाणी लागते. एकूण अंदाजे १५०० ते २००० लिटर पाणी लागते. गोमूत्र किंवा इतर प्राण्यांचे मूत्र मिसळल्यास नॅडेप खताची गुणवत्ता वाढेल.
टाकी भरणे
[संपादन]टाके भरताना घ्यावयाची विशेष काळजी म्हणजे, भरण्याची प्रक्रिया एकाच दिवसात पूर्ण झाली पाहिजे. यासाठी किमान दोन टाक्या बांधणे आवश्यक आहे जेणेकरून सर्व साहित्य जमा झाल्यावर टाकी भरण्याची प्रक्रिया एकाच दिवसात पूर्ण होईल. टाकी भरण्याचा क्रम खालीलप्रमाणे आहे.
पहिला थर - ६ इंच उंचीपर्यंत टाकाऊ पदार्थ, जसेकी कडी कचरा भरणे. अशाप्रकारे ३० घनफूट टाकाऊ पदार्थासाठी सुमारे एक क्विंटल कचरा लागतो आवश्यक आहे.
दुसरा थर - हा शेणाच्या द्रावणाचा असतो. यासाठी १५० लिटर पाण्यात ४ किलो शेण कालवने किंवा बायोगॅस प्लांटमधून मिळणाऱ्या स्लरीत अडीच पट अधिक पाणी वापरून घेणे. हे द्रावण टाकाऊ पदार्थांद्वारे तयार केलेल्या पहिल्या थरावर टाकून त्याला पूर्णपणे भिजवून घेणे.
तिसरा थर - चाळलेल्या कोरड्या मातीचा अर्धा इंच जाडीचा थर दुसऱ्या थराच्या वर पसरून सपाट केला जातो.
चौथा थर - या थराला थर म्हणण्याऐवजी पाण्याचा शिडकावा म्हणता येईल. याद्वारे टाकीमध्ये भरलेले तिन्ही थर व्यवस्थित बसणे आवश्यक आहे. टाकी पूर्ण भरेपर्यंत या थरांची पुनरावृत्ती केली जाते. टाकी भरल्यानंतर शेवटी ती २.५ फूट उंच झोपडीच्या आकारात भरली जाते. अशाप्रकारे टाकी भरल्यानंतर त्यावर शेण आणि ओल्या मातीच्या मिश्रणाचा लेप केला जातो. यासाठी १० किंवा १२ थर भरावे लागतात.
जर नॅडेप कंपोस्टची गुणवत्ता अधिक वाढवून हवी असेल तर त्यात, १.५ किलो जिप्सम, १.५ किलो रॉक फॉस्फेट आणि १ किलो युरिया यांचे मिश्रण अर्धा इंच मातीच्या थरांवर, १०० ग्रॅम प्रति थर वर विखुरले जाते. टाकी भरल्यानंतर ६० ते ७० दिवसांनी, ऱ्हायझोबियम + पी.एस.बी + अझॅटोबॅक्टर चे कल्चर बनवले जाते आणि ते छिद्रातून सोडले जाते.
टाकी भरल्यानंतर १५ ते २० दिवसांनी भरावस तडे जाण्यास सुरुवात होते आणि विघटन क्रियेमुळे मिश्रण टाकीमध्ये खाली उतरते. अशा स्थितीत वर नमूद केलेल्या पद्धतीने अजून काही थर पुन्हा भरावेत. टाकीतील आर्द्रतेची पातळी नेहमी ६० टक्के राखली जाणे आवश्यक आहे. अशा प्रकारे नडेप कंपोस्ट ९० ते ११० दिवसांत वापरासाठी तयार होते. प्रति टाकी सुमारे ३ ते ३.२५ टन नॅडेप कंपोस्ट मिळते आणि ते ३.५ टन प्रति हेक्टर दराने शेतात वापरण्यासाठी पुरेसे आहे. या कंपोस्टमध्ये पोषक घटकांचे प्रमाण नायट्रोजन ०.५ ते १.५%, फॉस्फरस ०.५ ते ०.९% आणि पोटॅश १.२ ते १.४ % असते. नॅडेपची सदरील टाकी दहा वर्षे कंपोस्ट तयार करण्यास चांगली कामी येते. नंतर तिची थोडी बहुत डागडुग करून परत उत्तम प्रकारे वापरता येते.[३]
फायदे
[संपादन]- ९०-१२० दिवसांच्या कमी कालावधीत कंपोस्ट तयार होते ज्यामध्ये पारंपारिक खड्डा पद्धतीसाठी १-२ वर्षे लागतात.
- रासायनिक खतावरील खर्च कमी होतो, जमिनीची सुपीकता वाढते, उत्पादनात वाढ होते.
- सेंद्रिय पीक उत्पादनास अत्यंत उपयुक्त ठरते, बाहेरील निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करते.
- प्रत्येक नॅडेप टाकीमधून अंदाजे ३ टन कंपोस्ट ९०-१२० दिवसांत तयार होते.
- कंपोस्टच्या वापरामुळे रासायनिक खताची गरज कमी होते त्यामुळे उत्पादन खर्च आणि बाहेरील अवलंबित्व कमी होते.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ "नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत निर्मिती". अग्रोवोन. १४ मार्च २०२३ रोजी पाहिले.
- ^ "नॅडेप कंपोस्ट खत". विकासपिडिया. १४ मार्च २०२३ रोजी पाहिले.
- ^ "नादेप कम्पोस्ट तैयार करने की विधि,महत्व उपयोगिता जाने". खेती किसानी. 2023-03-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ मार्च २०२३ रोजी पाहिले.
- ^ "How to Prepare NADEP Compost?". krishijagran.com. १४ मार्च २०२३ रोजी पाहिले.