Jump to content

निरयन सायन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निरयन–सायन : भूगोलावर सूर्य, चंद्र, ग्रह वगैरे आकाशातील ज्योतींचे स्थान सांगण्याकरिता प्राचीन ज्योतिषशास्त्रज्ञांनी नक्षत्रांची व राशींची योजना केली, परंतु ही नक्षत्रे किंवा या राशी आकाशात मोजण्यास सुरुवात कोठून करावयाची यासाठी दोन पद्धती प्रचारात आहेत.

(१) आकाशातील विशिष्ट स्थिरबिंदू आरंभस्थान मानून तेथपासून पूर्वेकडे नक्षत्रे अगर राशी मोजण्यास सुरुवात केली, तर ती निरयन पद्धती होय. नक्षत्रे व राशी विभागात्मक मानण्यात येतात. क्रांतिवृत्तावरील (सूर्याच्या भासमान वार्षिक गतिमार्गावरील) चित्रा नक्षत्रासमोरील रेवतीचा अंत्य बिंदू हा आरंभबिंदू घेऊन तेथपासून पूर्वेकडे १३° २०′चा एकेक विभाग घेतला, तर प्रत्येक विभाग म्हणजे निरयन नक्षत्र व ३०°चा एकेक विभाग घेतला म्हणजे निरयन रास होते.

(२) खगोलीय विषुववृत्त आणि क्रांतिवृत्त जेथे छेदतात तो वसंत संपातबिंदू आरंभबिंदू घेऊन तेथपासून वरीलप्रमाणे पूर्वेकडे १३°२०′चा एकेक विभाग पाडला, तर ते सायन नक्षत्र आणि ३०°चा एकेक विभाग पाडला, तर ती सायन रास होते. अयन म्हणजे जाणे किंवा चलन. संपातबिंदूला दरवर्षी ५०·२५ विकला इतकी विलोम (उलट) गती असते. त्यामुळे संपातबिंदू २५, ८०० वर्षांत भूगोलावर एक प्रदक्षिणा पुरी करतो. अशा रीतीने हे अयन लक्षात घेऊन चलित बिंदूपासून मोजण्याची योजिलेली पद्धती ती सायन पद्धती होय.

निरयन पद्धतीप्रमाणे साधारणपणे त्या त्या नक्षत्रातील अगर राशीतील पूर्वी ठरवून ठेवलेले तारे नेहमी आकाशस्थितीशी जुळतात. दीर्घ कालांतरानंतरसुद्धा मागेपुढे होत नाहीत. उदा., चार मोठे तारे, तीन ताऱ्यांनी बनलेला बाण आणि व्याध (मृगशीर्)ष असे मृग नक्षत्र सर्वपरिचित आहे. हे असेच हजारो वर्षे राहील, परंतु या निरयन पद्धतीमुळे ऋतूंशी मुळीच मेळ बसत नाही. उदा., मृग नक्षत्रात सूर्य असताना पाऊस सुरू होणे ही घटना चिरकाल टिकणारी नाही. सुमारे ६,५०० वर्षांनी उत्तराभाद्रपदा नक्षत्रात (सूर्य असताना) पावसाळ्यास सुरुवात होईल. १३,००० वर्षांनी ज्येष्ठा नक्षत्रात पावसाळ्यात सुरुवात होईल आणि २५,८०० वर्षांनी पुन्हा मृग नक्षत्रात पाऊस सुरू होईल.

सायन पद्धतीत असा घोटाळा होणार नाही कारण ऋतू हे संपातबिंदूवरच आधारलेले असतात परंतु या पद्धतीत ताऱ्यांशी मेळ मुळीच बसणार नाही. सायन नक्षत्र म्हणजे अमुक तारे असे दाखविता येणार नाही. सध्याचा (२०२१ सालचा) संपातबिंदू उत्तराभाद्रपदा या निरयन नक्षत्रात आहे. या उत्तराभाद्रपदा (निरयन) नक्षत्राऐवजी तेथे सायन अश्विनी नक्षत्र येते. मृग नक्षत्राच्या ताऱ्यांशेजारी सायन पुनर्वसू नक्षत्र येते. २५,८०० वर्षांनी पुन्हा सध्या असलेली परिस्थिती येईल.

संपातबिंदूचे स्थिरबिंदूपासून जे अंतर त्यास अयनांश म्हणतात. ते प्रत्येक पंचांगात दिलेले असतात. महिन्या महिन्याचा बदलही दिलेला असतो. पंचांगे निरयन पद्धतीवर आधारलेली असली, तरी सूर्याचा प्रत्येक सायन राशिप्रवेश त्या त्या वेळी दाखविण्याची पद्धत आहे. उदा० मेषायन. शके १८९९ (१९७७–७८)च्या अखेरीस अयनांश २३° ३३′ १२″ होते. म्हणजे चित्रा नक्षत्राच्यासमोरील रेवतीच्या अंत्य बिंदूपासून संपातबिंदू सु. २३° ३३′ पश्चिमेस होता.

दक्षिणायन व उत्तरायण या खगोलीय घटना सायन आहेत. त्यांचा निरयन पद्धतीशी मेळ बसत नाही.

पाश्चिमात्य देशांत अश्विनी वगैरे तारका-नक्षत्र योजना नाहीत. त्यामुळे तिकडे सायन पद्धतीचा अवलंब ज्योतिषशास्त्राकरिता होतो. दोन्ही पद्धतींवर आधारलेले निरनिराळे फलज्योतिष असते. तसेच दोन्ही पद्धतींवर आधारलेली वेगवेगळी पंचांगेही असतात पण निरयन पंचांगे जास्त प्रचारात आहेत.

भारतात निरयन व सायन या दोन्ही पद्धतींचा समन्वय साधला आहे. वेध घेण्यासाठी सायन पद्धती आणि धर्मशास्त्र व मूहूर्तशास्त्र यांकरिता निरयन पद्धती स्वीकारली आहे.