नरेंद्र कवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रुक्मिणीस्वयंवर या काव्याचा कर्ता नरेंद्र कवी (नरेंद्रपंडित) हा ज्ञानेश्वरांना समकालीन होता. तो देवगिरीचा राजा रामदेवराव यादव याच्या राजसभेतील कवी होता. त्याचे दोन भाऊ साल (शैल्य) आणि नृसिंह, हेसुद्धा रामदेवाच्या राजसभेत होते. नरेंद्राने रुक्मिणीस्वयंवराची रचना केली आणि ते काव्य राजाला राजसभेत वाचून दाखवले. त्यातील रसाळपणामुळे राजाला तो ग्रंथ इतका आवडला, की त्याने तो राजाच्या नावाने प्रसिद्ध करावा असे नरेंद्राला सुचवले. त्याबद्दल त्याने नरेंद्राला भरपूर सोने देण्याची लालूच दाखविली. राजाची सूचना म्हणजे आज्ञाच. आज्ञेचे पालन करणे अटळ होते. नरेंद्र कवी स्वाभिमानी होता. कोणत्याही परिस्थितीत त्याचा ग्रंथ त्याला राजाच्या नावाने प्रसिद्ध होणे मान्य नव्हते. तो राजाला म्हणाला, "जर ग्रंथ आपल्या नावाने प्रसिद्ध करायचाच असेल, तर तो अगदी निर्दोष असला पाहिजे. त्यासाठी मला एकदा त्यावर नजर टाकून, त्यात चुकून राहिलेले दोष दूर करायला हवेत. " राजाने नरेंद्र कवीला ग्रंथ एका दिवसासाठी घरी घेऊन जाण्याची परवानगी दिली. त्याच रात्री नरेंद्र आणि त्याच्या दोन भावांनी ग्रंथाची नक्कल करावयाचे ठरवले. पण रातोरात जागूनसुद्धा ग्रंथाच्या फक्त नऊशे ओव्या लिहून झाल्या. सकाळी राजाचे दूत आले आणि त्यांनी नरेंद्राचा मूळ रुक्मिणीस्वयंवर ग्रंथ जप्त करून नेला.

राजसत्तेच्या या पशुतुल्य अनुभवामुळे नरेंद्र कवीला राजसभेचा उबग आला, आणि तो महानुभाव पंथात दाखल झाला. जाताना त्याने आपला नऊशे ओव्यांचा ग्रंथ बरोबर नेला होता. त्यामुळे महानुभाव वाङ्‌मयात मिळालेला हा अपुरा ग्रंथच आज उपलब्ध आहे. महानुभावांच्या सांकेतिक लिपीत असलेला हा रुक्मिणीस्वयंवर नामक ग्रंथ, पुढे इतिहासाचार्य राजवाडे, प्रा. कोलते, प्रा. सुरेश डोळके आदींनी सांकेतिक लिपी उलगडून बालबोध लिपीत आणला.