नरहर बाळकृष्ण देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रावबहादुर नरहर बाळकृष्ण देशमुख ऊर्फ अप्पासाहेब देशमुख (जन्म : पुणे, ८ जुलै १८७२; - )हे अहमदनगरमधील एक प्रख्यात वकील होते.

बालपण व शिक्षण[संपादन]

अप्पासाहेब देशमुखांना दोन भाऊ आणि दोन बहिणी होत्या. त्यांचे आजोबा नागेश कृष्ण देशमुख हे ग्वाल्हेरच्या महाराणी बायजाबाई शिंद्यांचे सचिव होते, तर वडील सांगली संस्थानात दरबारी वकील होते. लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यामुळे अप्पासाहेबांचा सांभाळ त्यांच्या मामांनी केला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यातील नेटिव्ह इन्स्टिट्यूशनमध्ये झाले. पुढे मॅट्रिक झाल्यावर नरहर बाळकृष्ण देशमुख यांनी लोकमान्य टिळकांनी चालवलेल्या कायद्याच्या शाळेत नाव घातले. त्या शाळेत त्यांचा नंबर वर्गात नेहमीच पहिला येई.

कारकीर्द[संपादन]

जिल्हा वकिलीची परीक्षा १८८९मध्ये पास केल्यावर अप्पासाहेब देशमुखांनी अहमदनगरमध्ये ऑगस्ट १८९३पासून वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली. इसवी सन १९०४ ते १९३४ या काळात देशमुख अहमदनगरमधले सरकारी पब्लिक प्रॉसिक्यूटर (सरकारी वकील-अभियोक्ता) होते. ती कारकीर्द चालू असतानाच त्यांनी दोन वर्षांसाठी धुळे आणि बेळगाव कोर्टांत उप जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश म्हणून काम पाहिले. ते अनेक वर्षे अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आणि अहमदगर नगरपालिकेच्या व्यवस्थापन समितीचे प्रमुख होते. नगर-नासिक वाङ्‌मय मंडळाचे सचिव, हरिजन सेवा संघाचे अध्यक्ष, आणि बाळ संगोपनाला वाहिलेल्या एका संस्थेचे ते उपाध्यक्ष होते. अप्पासाहेब देशमुख हे ग्रामीणविकासाच्या चळवळीशी जोडले गेले होते. ते सोमवंशीय अनाथ वसतीगृह आणि अहमदनगर अनाथ विद्यार्थी गृह या दोन्ही संस्थांचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली १९३२साली अहमदनगरला एक देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण संमेलन भरले होते.

पुरस्कार[संपादन]

ब्रिटिश सरकारने अप्पासाहेब देशमुखांना त्याच्या समाजकार्याबद्दल रावबहादुर या उपाधीने सन्मानित केले होते.

लेखन[संपादन]

रावबहादुर नरहर बाळकृष्ण ऊर्फ अप्पासाहेब देशमुख यांनी ‘श्री ज्ञानेश्वर दर्शन’ नावाचा एक दोन-खंडी ग्रंथ लिहिला आहे..