Jump to content

धूळपाटी/अणुबॉम्ब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विज्ञानात भराभर प्रगती घडवून आणण्यात आणि या नव्या ज्ञानाच्या आधारे नवी-नवी तंत्रज्ञाने विकसित करण्यात हार्वर्ड-एम आय टी किंवा केंब्रिज-ऑक्सफर्ड सारख्या विद्यापीठांचा हात कोणीच धरू शकणार नाही. अमेरिका-इंग्लंड सारखे देश नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करत युद्धात आणि व्यापारात इतरांवर कुरघोडी करत आलेले आहेत. अणुबॉम्ब हे याचे खास डोळ्यात भरणारे उदाहरण आहे. पदार्थाचे ऊर्जेत रूपांतर होऊ शकते ह्या आईन्स्टाईनच्या मूलगामी निष्कर्षाच्या आधारे अणुबॉम्ब विकसित केला गेला. हिटलरच्या जर्मनीतून पळून आलेला आईन्स्टाईन प्रिन्स्टनच्या इन्स्टिट्यूट फॉर अॅडव्हान्सड स्टडी या संस्थेत काम करत होता. येथे जगातले उत्तमोत्तम वैज्ञानिक त्यांच्यावर दुसरी काहीही जबाबदारी न टाकता आपापले काम करायला मोकळे होते. १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर हिटलर अणुबॉम्ब बनवेल आणि जगाला आपल्या कब्जात आणेल अशी भीती आईनस्टाईनला आणि इतर अनेक अग्रगण्य वैज्ञानिकांना वाटू लागली. तेव्हा त्यांनी अमेरिकेने तातडीने हे अस्त्र विकसित करावे असे राष्ट्राध्यक्ष रुजवेल्टला कळवले. याचा पाठपुरावा करत रुजवेल्टने लॉस आलामोस नॅशनल लॅबोरेटटरीमध्ये मॅनहॅटन प्रकल्पात रॉबर्ट ओपेनहायमर याच्या नेतृत्वाखाली जगातले अग्रगण्य भौतिकशास्त्रज्ञ एकत्र आणून अतिशय गुप्तता राखून अणुबॉम्ब विकसित केला.

१९४५ पर्यंत अणुबॉम्ब तयार होता. परंतु अजूनही हिटलरच्या जर्मनीबरोबर लढणारा जपान पराभव पत्करायला तयार नव्हता. तेव्हा अमेरिकी सैन्याने बॉम्बेचा वापर करून युद्ध भरकन आटोपायचे असे ठरवले. माणुसकी जागृत असलेल्या आईन्स्टाईन, ओपेनहायमर सारख्या अनेक शास्त्रज्ञांनी हा बॉम्ब जपान जवळ समुद्रात टाकावा म्हणजे त्याची शक्ती पाहून जपान शरणागती पत्करेल असे सुचवले. अमेरिकी सैन्याच्या दृष्टीने हा सल्ला म्हणजे देशद्रोह होता, आणि त्यांनी दोन शहरांवर बॉम्ब फेकायचे ठरवले. ६ ऑगस्ट १९४५ ला अमेरिकेच्या वायुसेनेने लिटल बॉय नावाचा युरेनियम गन पद्धतीचा फिशन बॉम्ब हिरोशिमावर आणि नंतर तीन दिवसांनी फॅट मॅन नावाचा प्लुटोनियम इम्प्लोजन पद्धतीचा फिशन बॉम्ब नागासाकीवर टाकला. या स्फोटांत दोन लक्ष लोकांचा तत्क्षणी मृत्यू झाला आणि लक्षावधी लोक दशकानुदशके दुष्परिणामांनी पीडित राहिले.

[]

  1. ^ "Buy Sahyachala Ani Mee | सह्याचला आणि मी - एक प्रेमकहाणी by Madhav Gadgil | माधव गाडगीळ online from original publisher Rajhans Prakashan". www.rajhansprakashan.com. 2024-05-14 रोजी पाहिले.