धवळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विवाहात गायल्या जाणाऱ्या नवरदेवाविषयीच्या गीतांना '"धवले"' किंवा धवळे असे म्हणतात..[१][२]

शब्दाची व्युत्पत्ती[संपादन]

धवळा किंवा ढवळा हा विशिष्ट गीतवाचक मराठी शब्द ‘धवल’ या संस्कृत शब्दावरून तयार झालेला आहे. धवल – (धव = वर, ल = स्वार्थे) [१] छंदोनुशासनातील हेमचंद्राने केलेल्या व्याख्येनुसार, ‘‘ज्या गीतात सुपुरुषाचे वर्णन केले जाते, त्याला धवलगीत म्हटले जाते." या ठिकाणी सुपुरुष या शब्दाला परमेश्‍वर आणि वर असे दोन अर्थ सांगितले आहेत. [१] म.ना. पाटील धवले शब्दाची व्युत्पत्ती 'धवलागार' (संस्कृत) म्हणजे मंगलोत्सवाचा प्रारंभ या शब्दाचा अपभ्रंश 'धवळार' असा देतात. [२]

इतिहास[संपादन]

छंदोनुशासन, मानसोल्लास व संगीत रत्‍नाकर या ग्रंथांमध्ये धवल गीतांचा उल्लेख धवल मंगल या जोडनावाने अनेकदा दिलेला आढळतो. धवलांप्रमाणे मंगलाष्टकेसुद्धा विवाहविषयक होती. प्राध्यापक सुभाष पवार यांच्या मतानुसार, उत्तरकालीन मंगलाष्टके या मंगल गीतातूनच उदय पावली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो. [१] दैनिक लोकसत्ता मधील 'आगरी लोकगीतांतील चांदुनी रात' या लेखात लेखक म.ना. पाटील धवले गीतांची सुरुवात श्रीकृष्ण विवाहापासून झाली असल्याच्या आख्यायिकेचा उल्लेख करतात.[२]

संत कवींनी रचलेले धवळे[संपादन]

धवळे जसे लौकिक विवाहप्रसंगी गायिले जात, तसेच ते भक्तांनी कौतुकाने साजऱ्या केलेल्या देवांच्या विवाहप्रसंगीही गायले जात. महदंबेने रचलेले धवळे स्त्रीसुलभ भावनांनी रंगलेले असून त्यांची रचनासुद्धा सुंदर वाटते. त्या धवळ्यातील सुरुवातीच्या काही ओळी अश्या आहेत – ‘‘श्री चक्रधराचे सीरी धरौनिया श्रीचरणां | मग धवळी गाइनु गोविंद राणा॥ जेणे रुकुमीणी हरीएली | जेणे जगी पवाडे केले अती बहुतु ॥ पाविजे परमा गती | भक्ती आइकीतां श्रीकृष्णचरित्रु ॥ याप्रमाणे महादंबेच्या धवळ्यांचे छंदविशेष आहेत. एकनाथांचे धवळे असे – ‘‘लग्ना येरे दिसी उटणे मांडले | धवळे आरंभिले संभ्रमेसी ॥ धवळामाजी गाणी गाईले रामनाम | एकोनिया प्रेम बरा आले ॥ दासोपंतांच्या धवळ्यांची रचना पुढीलप्रमाणे – ‘‘प्रकृतिपुरुषे दोन्ही बोवलां स्वस्थानी | चिन्मात्री निर्गुणी बैसविली ॥ तेथे आलीया वऱ्हाडिणी हरिद्रा घेऊनि | कुंकुमे मर्दुनी योग केला ॥ नाथांचे व दासोपंतांचे धवळे धनश्री रागातील रचले आहेत.[१]

समर्थ रामदास[संपादन]

आतां राहो द्या गलबला । महादेव लग्नासि चालिला ।

पार्वतीचा विवाह जाला । कोणेपरी ॥१॥

गळां साजुक सीसाळे । थबथबां रक्त गळे ।

शंखपाळे धवळे । व्याळ वळवळिती ॥४॥ [३]

आगरी समाजाच्या विवाहातील धवले[संपादन]

आगरी समाजात विवाहातील हळदी, वराची मिरवणूक, अतिसुलग्न आणि लग्न लागल्यानंतर वरातीची मिरवणूक, नृत्य अशा प्रसंगी धवलारणी (धवल गीते गाणारी स्त्री)[४] आणि करवल्या धवले गातात. [२][५]

चाऊल रासाच्या वेळचा धवला

चाऊल रासताना

पापानि उखला खयरी मुसला कोनाचे भारज चाऊल रासियले लक्षूमन भरताऊ जेलं उंबई शाराला तनशी हानली सारी-चोली नेसबाय गो सारी-चोली घाल भारज इनी फनी चल भारज मुक्या घरी चाऊल रासु मुकिया पुसशी सरल का येन चाऊल

नंतरचा धवला चून दलताना

चून दलताना

सोर घोरे घोरीचा दावा त्या गोऱ्या स्वार झालं ग लणीमन पाटलू जेले ग निंगरे बंदरा बऱ्या बऱ्या मेरी साठा मंडपाला मंडपाचे मंडपमेरी मुरुताचे मुरुतमेरी मुरतामेरी बसते नवरे सिंधू बाये धरतरी फोरून उबदाण तारुला ते गो तारावरी कशियाचा भारुला ते गो तारावरी पातीयाचा भारुला ते गो पातीयाच्या इनिल्या मांदऱ्या वर बसते राजीया गनपती देवू तुमच्या रान्या र घालती इंजनू वारा तुमच्या रान्या र घालती पालवी वारा हातीचा इंजुना ढीलू परुला श्रीकिसना देवाला राधा घाली इंजनू वारा श्रीकिसना देवाला डोला त्याचे भरतारा डोला लागला निन्गुन गेला बयनीचे गावा नामू बाय बयनीनी बंधवाला दुरून वलखिल कसा बंधवार येना झाला आमचे घरी हाय लेकीचा सोला सोलीया कारना बयनी तुला आलू नेवाला

थापनी करतानाचा धवला

मांडव थापनी

मांडव थापनी कशीयाची होत हो मांडव थापनी तीली चाऊलाची हो मांडव थापनी हलदी कुंकवाची हो आंबा पुसत जांबूलीला हो कोनाचे मंडपी जावा हो आंबा जनमला निरमले भूमी हो जांबूल जनमली तलीयाचे पाली हो उंबर जनमला रानी का वनी हो उंबर जनमला करे का कपारी हो आसा उंबरू कपटी फुलला मदाने राती हो देवाई घातील्या बाजा नाय मिल उंबराचा फुलू हो


घाटावरशी आला पाथरवटू

घाटावरशी आला पाथरवटू आधी लावला पाट्याचा कामू हो आधी घरविली पाट्याची पाठू हो मग घरविला पाट्याचा पोटु हो तो पाटाशोभिवंत दिसे हो


घाटावरशी आला पाथरवटू त्यांनी लाविला मालत्याचा कामू हो आधी घरविली मालत्याची पाठू हो मग घरविला मालत्याचा पोटु हो तो मालटा शोभिवंत दिसे होचून दळण्याचे गीत

धवला नंदी शिनगारीला गला घागुरांच्या माला.....||धृ||


तो नंदी धारीला बहिरी देवाच्या द्वारी तो नंदी धारीला मुर्ता चुणू दलायला बहिरी देवाने धारीली जोगेश्वरी मुर्ता चुणू दलायला धवला नंदी शिनगारीला.....||धृ||


तो नंदी धारीला शंकर देवाच्या द्वारी शंकर देवाने धारीली पार्वती मुर्ता चुणू दलायला धवला नंदी शिनगारीला.....||धृ||


तो नंदी धारीला गणपती देवाच्या द्वारी गणपती देवाने धारीली सरस्वती मुर्ता चुणू दलायला या गोऱ्या येती ग या गोऱ्या येती ग चुना दलुनी देती ग वृंदा बायच्या चुनाला गोऱ्या आऊख दती ग धवला नंदी शिनगारीला.....||धृ||

"नवरी शृंगारतानाचे गीत"

न्हातली धुतली गो बाय बावली बसली गो पूसिते आपले मामा कवा येतील मामा तुझी ती बाशिंगा कवा येतील कवा येतील मामा तुझ्या त्या कोलसाऱ्या कवा येतील

वारली समाजाच्या विवाहातील गीते[संपादन]

वारली समाजात विवाहांचे पौरोहीत्य विवाहगीते गाणाऱ्या धवलेरी स्त्रीयांकडून केले जाते.[६]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c d e प्राध्यापक सुभाष पवार. "मंगल गीतांचा प्राचीन प्रकार – धवळे". ११ सप्टेंबर २०१३ भाप्रवे सायं १४.४५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b c d म.ना.पाटील. "आगरी लोकगीतांतील चांदुनी रात". १० जुलै २०१५ भाप्रवे सायं १६.४५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ समर्थ रामदास. "समर्थ रामदास साहित्य- ११५९". ११ सप्टेंबर २०१३ भाप्रवे सायं १४.४५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/land_and_people/L%20&%20P%20pdf/Chapter%20II/2%20Major%20Castes%20and%20Tribes.pdf
  5. ^ http://amodpatil.blogspot.in/2011/07/blog-post_25.html
  6. ^ बोलीः आपला सामाईक वारसा -डॉ. नीलिमा गुंडी; प्रकाशन तारीख Feb 17, 2013, 03.00 AM IST प्रकाशक: http://maharashtratimes.indiatimes.com/edit/article/-/articleshow/18536408.cms?