द चॅलेंज ऑफ लोकल फेमिनिझम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

'चॅलेंज ऑफ लोकल फेमिनिझम्स' हे पुस्तक १९९५ सालच्या बीजिंग परिषदेसाठी गठित करण्यात आले. हे पुस्तक अमृता बसू यांनी १९९५ साली नवी दिल्ली येथील काली फॉर विमेन या प्रकाशन संस्थेद्वारा प्रसिद्ध केले.

प्रस्तावना[संपादन]

१९९५ सालच्या बीजिंग परिषदेसाठी निर्माण करण्यात आलेल्या या संकलनाला संपादक अमृता बसू यांनी सी. एलिझाबेथ मॅक्गोरी यांच्या साहाय्याने विस्तृत प्रस्तावना लिहिली आहे. या प्रस्तावनेत त्यांनी अभ्यासकांचा दृष्टिकोन, राजकीय दृष्टिकोन, स्त्रीवादाची संकल्पनात्मक मांडणी, स्त्री चळवळींचा उगम, स्त्रीवादातील मुद्दे, स्त्रीवादी चळवळीच्या यशाचे पैलू, स्थानिक भगिनीभाव/ जागतिक भगिनीभाव अशा मुद्द्यांवर प्रस्तुत पुस्तकातील संकलित लेखांचे विश्लेषण केले आहे. या संपादनाचे भौगोलिक दृष्ट्या चार विभाग करण्यात आले आहेत. यातील पहिल्या विभागात चीन, भारत, बांग्लादेश आणि फिलिपाईन्स या देशातील स्त्रीवादी चळवळी व पर्यावरणाचा आढावा घेतला आहे. दुसऱ्या विभागात आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील स्त्रीवादी चळवळींचा आढावा घेणारे लेख आहेत. तिसऱ्या विभागात दक्षिण अमेरिका तर चौथ्या विभागात रशिया, युरोप आणि अमेरिका येथील स्त्रीवादी चळवळींविषयी लेख आहेत.

ठळक मुद्दे[संपादन]

  1. भारतातील स्त्रीवादी चळवळ गुंतागुंतीची, बहुक्षेत्रीय आहे. काम, वेतन, पर्यावरण, ग्राहक हक्क, आरोग्य, नागरी हक्क, लैंगिकता, जात, वर्ग, आणि सामाजिक हितसंबंध या सर्वांना स्पर्श करणारी ही एकमेव चळवळ असावी.
  2. बांग्लादेशातील स्त्रीवादी चळवळ जाहीर करते की, ते जिथवर पोहोचले आहेत तिथून ते माघारी फिरणार नाहीत. आफ्रिका आणि मध्यपूर्वेत स्त्रीवादाची नवी पहाट उगवली असून स्त्रीवादी असणे म्हणजे राष्ट्रवादी असणे अशी नवी व्याख्या तयार झाली आहे.
  3. दक्षिण अमेरिकेत पेरू, चिली, मेक्सिको आणि ब्राझिल अशा ठिकाणांहून स्त्रिया चूल सोडून रस्त्यावर येत आहेत आणि स्वातंत्र्य व समतेसाठी झगडत आहेत. रशिया मध्ये स्त्रियांच्या सहभागाशिवाय लोकशाही अस्तित्वात येणे शक्य नाही असे स्त्रीवादी चळवळीने जाहीर केले आहे.
  4. मध्य युरोपातील कम्युनिस्ट राजवटी नंतरच्या अवकाशात स्त्रीवादी चळवळ स्वतःचा आवाज शोधण्याचा प्रयत्न करीत आहे तर पश्चिम युरोपात युरोपियन महासंघाची निर्मिती हे स्त्रीवादी चळवळी पुढील संकट आणि संधी दोन्ही आहेत. त्यामुळे महासंघाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
  5. अमेरिकेमध्ये स्त्रीवादी चळवळींसमोर बहुसांस्कृतिक स्त्रीवादी चळवळ उभे करण्याचे आव्हान आहे. एकंदरीत स्त्रीवादी चळवळीचा विचार राष्ट्र या संकल्पनेतून करता येणार नाही.
  6. या संपादनातील सर्व लेखक स्त्रीवादी चळवळ राष्ट्राच्या संदर्भात मोजण्यास नकार देतात शिवाय स्त्रीवाद हा युरोपातील मध्यमवर्गीय स्त्रियांची कल्पना आहे या गृहीतकालाही छेद देतात.

प्रतिसाद आणि योगदान[संपादन]

  1. व्हॅलेंटाईन एम. मुकादम यांनी ‘जर्नल ऑफ एशियन स्टडीज’ च्या फेब्रुवारी १९९६च्या अंकात या पुस्तकाचे परीक्षण लिहिले आहे. १९९५ सालच्या बीजिंग परिषदेसाठी या पुस्तकाची निर्मिती झाल्याचे नमूद करून या पुस्तकाची प्रस्तावना वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे म्हंटले आहे.
  2. चंद्रा मोहन तळपदे यांनी ‘फेमिनिझम विदाऊट बॉर्डर’ या पुस्तकामध्ये सदर पुस्तकाचा उल्लेख केला असून मॉर्गन यांच्या प्रतिपादनानुसार भगिनीभावाचे जागतिकीकरण करण्याऐवजी या पुस्तकात वैश्विक स्त्रीवादी चळवळीतील समान सूत्र शोधण्याचा प्रयत्न केला आहे असे म्हंटले आहे.
  3. नीरा युवाल-डेव्हिस हिने ‘विमेन सिटिझनशिप ॲन्ड डिफरन्सेस’ या पुस्तकामध्ये नागरी हक्कांच्या परिप्रेक्षात स्त्रीवादाची मांडणी करण्यासाठी या पुस्तकातील काही लेखांचा आधार घेतला आहे.