Jump to content

द.श्री. खटावकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डी.एस,.खटावकर, पूर्ण नाव - दत्तात्रेय श्रीधर खटावकर (जन्म: पुणे, ४ एप्रिल, इ.स. १९२९; - पुणे, २३ जानेवारी, इ.स. २०१६) हे पुण्यातले एक शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार होते.

१९५३मध्ये तुळशीबाग सार्वजनिक गणेश मंडळाचा "श्रीरामाचा नौकाप्रवास‘ हा पहिला देखावा त्यांनी तयार केली. वेगळा देखावा उभारायचा, हा विचार समोर ठेवूनच सादर केलेल्या या कलाकृतीची सर्वत्र चर्चा झाली. त्यानंतर या मंडळाचा देखावा करायचा तर खटावकरांनीच, असा पायंडाही पडला. पुण्यातील या तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचेे आणि सजावटीचे काम त्यांनी सलग ५५ वर्षे केले. या मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे खटावकरांनी सजवलेले कलात्मक आणि नेत्रदीपक रथ हा पुणेकरांचा अभिमानाचा आणि कौतुकाचा विषय असे.

ज्या गणेशमंडळांना शंभर वर्षे पूर्ण झाली असे हत्ती गणपती मंडळ, अखिल मंडई मंडळ, भाऊ रंगारी गणपती, लाकडी गणपती मंडळ अशा मंडळांच्या सजावटी आणि गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीचे चित्ररथ साकारणे हे त्यांचेच काम असे.

गणेशोत्सवातील देखाव्यांतून समाजापुढे संस्कृती मांडण्याचा सातत्याने प्रयत्‍न करणारे, आकर्षक शिल्पाबरोबरच वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैलीने अनेकांचे लक्ष वेधून घेणारे खटावकर हे श्रेष्ठ चित्रकार-शिल्पकार होते.

पुण्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सवात धार्मिक, पौराणिक आणि हलत्या देखाव्यांची परंपरा रुजविण्यात डी.एस. खटावकर यांचा मोठा वाटा होता. त्यांनी साकारलेले कीचकवध, गणेशरूपी राम, श्रीकृष्णाचं विश्‍वरूपदर्शन असे महत्त्वपूर्ण देखावे खूप गाजले. ‘जाणता राजा’ या समूहनाट्याचे कलादिग्दर्शक म्हणूनही त्यांची ओळख होती.

खटावकरांनी पुण्यातील मानाचा चौथा गणपती असलेल्या या तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाची फायबरची मूर्ती १९७५मध्ये तयार केली. ही देशातील गणपतीची पहिली फायबरची मूर्ती समजली जाते.

प्राथमिक कलाशिक्षण[संपादन]

खटावकरांना शालेय शिक्षणात फारसा रस नव्हता. नाना वाडा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला. शाळेतूनच ते १९४२ च्या ‘चले जाव’च्या चळवळीत भाग घेतला. चौथी-पाचवी शिकत असतानाच चित्रकार-शिल्पकार व्हायचे, हे स्वप्न खटावकर यांनी पाहिले होते. चार भिंतीतील बंदिस्त शिक्षणापेक्षा त्यांना बाहेरचा निसर्ग खुणावत होता. निसर्गातील रंग लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे ते रंगात, मातीत रमू लागले. पुढे वेगवेगळ्या टप्प्यांवर दादासाहेब केळकर, बाबासाहेब पुरंदरे, एन. न. वाघ, बी.आर. खेडकर, प्राचार्य व्यंकटेश के. पाटील असे गुरू मिळत गेले आणि त्यांच्यातील कलागुण फुलत गेले.

खटावकर १३ वर्षांचे असताना त्यांच्याकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी किल्ल्यात मांडण्यासाठी विविध प्रकारची चित्रे काढून घेतली. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरे हे आपल्या कलेतील पहिले गुरू, असेही डी. एस. खटावकर सांगत असत.

उच्च शिक्षण== कलेच्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील 'इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न आर्ट'मध्ये, म्हणजे आताच्या अभिनव महाविद्यालयात प्रवेश घेतला. नंतर त्यांनी दिल्लीहून कला-शिक्षकाचा अभ्यासक्रम, व मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून कलाविषयक अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे गव्हर्नमेंट बॉम्बे प्रॉव्हिन्समध्ये डिप्लोमा फाइन आर्ट (पेंटिंग), याच केंद्रातून आर्ट मास्टरची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुण्याच्या केंद्रातून क्राप्ट टीचर्स सर्टिफिकेट परीक्षाही ते पास झाले.

शिष्यवृत्ती आणि परदेशगमन[संपादन]

हिंदुस्थानातील वास्तुशिल्प आणि चित्रांच्या निरीक्षणासाठी त्यांना केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. खटावकरांनी परदेशांतील कलेचे निरीक्षण आणि अभ्यास केला. यामध्ये अ‍ॅमस्टरडॅम, लंडन, फ्रॅंकफर्ट, रोम, व्हॅटिकन, फ्लोरेन्स (इटली) आणि फ्रान्समधील काही शहरांचा समावेश होता.

व्यवसाय[संपादन]

कला शिक्षण पूर्ण केल्यावर, खटावकरांनी लोणी काळभोरमधील गव्हर्नमेंट बेसिक ट्रेनिंग सेंटर-शासकीय प्राथमिक शिक्षण केंद (अध्यापक महाविद्यालय) येथे इ.स. १९५३ पासून कलाशिक्षक म्हणून अध्यापनास सुरुवात केली. १नंतर १९५६ ते १९६३ या कालावधीत त्यांनी पुण्यातील आगरकर हायस्कूल या शाळेमध्ये कला अध्यापकाची भूमिका बजावली. या शाळेनंतर त्यांनी १९६३ ते १९८९ या कालावधीत पुण्यामधील अभिनव कला कॉलेजमध्ये ज्ञानदानाचे काम केले. अभिनव कॉलेजच्या उपप्राचार्यपदावरून ते निवृत्त झाले.

मार्गदर्शकाचे कार्य[संपादन]

खटावकरांनी सुमारे ३५ वर्षांत हजारो विद्यार्थी घडवले. अनेक नामवंत चित्रकार, शिल्पकार, सिने कला दिग्दर्शक, नेपथ्यकार, सजावटकार आणि कलाशिक्षक यांना त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. अशोक ताम्हणकर, अरुण पाथरे, मुरली लाहोटी, सुदाम डोके, रजनी फणसळकर, श्याम भूतकर, विजय दिक्षित, मुरलीधर नांगरे, माधुरी पुरंदरे यांसारख्या अनेक कलावंतांना डी. एस. खटावकर यांचे मार्गदर्शन लाभले.

’परीक्षा संपल्यावर दर शनिवारी-रविवारी माझ्याकडे या. दोन तास काम केले तरी सराव होतो. एकही पैसा खर्च करायचा नाही. मी माती आणि साहित्य देईन. तुम्ही फक्त शिकण्याची तयारी ठेवा.’ असे खटावकर म्हणत.

दुसरी पिढी[संपादन]

द.शी. खटावकरांनंतर त्यांचेे चित्रकला पारंगत पुत्र विवेक खटावकर हेदेखील या क्षेत्रात काम करत आहेत.

खटावकरांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • पुणे फेस्टिव्हलमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला.
  • राज्य शासनाने २००७ साली जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांचा सत्कार केला.
  • महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रकाराचा पुरस्कार (२००७)
  • विद्या सहकारी बँकेतर्फे देण्यात येणारा 'विद्या व्यास पुरस्कार' (२००८)
  • बॉम्बे आर्ट सोसायटी प्रदर्शनात त्यांना ४ वेळा पारितोषिके मिळाली.
  • हैदराबाद आर्ट सोसायटी, नाशिक कला निकेतन, टिळक स्मारक आदी संस्थांनी भरवलेल्या चित्र प्रदर्शनांमध्ये त्यांचा यशस्वी सहभाग असे.
  • महाराष्ट्र शासनाच्या कला महाविद्यालयातर्फे त्यांची ‘कलातज्ज्ञ’ म्हणून नेमणूक करण्यात आली. सात वर्षे कला महाविद्यालयांची तपासणी करण्याची संधी त्यांना मिळाली.
  • २००० साली तुळशीबाग गणेशोत्सवाच्या शताब्दी महोत्सवाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.
  • पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सजावट स्पर्धेचे परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले.