Jump to content

देवकीनंदन खत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देवकीनंदन खत्री हे हिंदीतील ‘तिलस्मी-ऐयारी’ या प्रकारच्या उपन्यासांचे (कादंबऱ्यांचे) प्रवर्तक होते. या प्रकारच्या कादंबऱ्यांत आकस्मिक, अतर्क्य आणि रोमांचकारी घटना–प्रसंगांची योजना करून रहस्यपूर्ण व कुतूहलवर्धक कथानके रचलेली असतात. ह्या कादंबऱ्यांचे मुख्य उद्दिष्ट मनोरंजन हेच असते. मराठीतील सोनेरी टोळी, वीर धवल  इ. अद्‌भुतरम्य कादंबऱ्यांसारखाच हा प्रकार आहे. खत्रींचा जन्म मुझफ्फरपूर (बिहार) येथे झाला. सुरुवातीस तेथेच त्यांनी उर्दू-फार्सीचे अध्ययन केले. नंतर काशी येथे जाऊन त्यांनी संस्कृत व हिंदीचा अभ्यास केला. जंगल-ठेकेदार म्हणून त्यांचा व्यवसाय होता. त्याचा त्यांच्या कांदबरीलेखनास चांगलाच उपयोग झाला.


‘तिलस्मी-ऐयारी’ प्रकारातील अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहून त्या अत्यंत लोकप्रिय केल्या.त्यांच्या कादंबऱ्यांची लोकप्रियता इतकी होती, की उर्दू वाचकांनी हिंदी शिकून त्या वाचल्या, असे सांगतात. उर्दूमधील अमीर हम्जा  किंवा अरबीतील तिलस्म-इ-होशरुबा  ह्या ग्रंथांतून त्यांनी या प्रकारातील कादंबरीलेखनाची प्रेरणा घेतली असली, तरी त्यांच्या कादंबऱ्यांत मूळ अरबी वा उर्दू साहित्यात असलेल्या कामुकतेचा गंधही नाही. तसेच त्यांची रचनाही संपूर्णपणे मौलिक व स्वतंत्र आहे. कलादृष्ट्या त्यांच्या कादंबऱ्यांना महत्त्वाचे स्थान नसले, तरी त्यांचे हिंदी साहित्येतिहासातील महत्त्व मात्र वादातीत आहे. विलक्षण गुंतागुंत असलेली कथानके अनेक भागांत सुसंगतपणे गोवण्याच्या त्यांच्या बौद्घिक कुवतीचे कौतुक केले जाते. चारित्र्यसंपन्न नायक-नायिका आणि अखेरीस त्यांचा विजय यांमुळे त्यांच्या कादंबऱ्यांत उच्च आदर्श आणि नीतिमत्ता यांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यांची चंद्रकांता (१८८८) ही पहिली कादंबरी. पुढे चंद्रकांता संतति  नावाने तिचे आणखी अकरा भाग त्यांनी प्रसिद्ध केले. या कादंबरीमुळे त्यांना अफाट लोकप्रियता लाभली. आपल्या विपुल कादंबरीलेखनाच्या प्रकाशनार्थ त्यांनी पुढे तर स्वतंत्र मु्द्रणालयच काढले. नरेंद्र मोहिनी (१८९३), कुसुमकुमारी (१८९९), नौलखा हार (१८९९), काजर की कोठरी (१९०२), अनूठी बेगम (१९०५), गुप्त गोदना (१९०६), भूतनाथ  (९ भाग, १९०६) इ. त्यांच्या कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. काशी येथे त्यांचे निधन झाले.