दिनकरराव गोविंदराव पवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दिनकरराव गोविंदराव पवार ऊर्फ अप्पासाहेब पवार ( १९३०; - १६ एप्रिल, २०००) हे एक शेतकरी होते. त्यांचा जन्म बारामती तालुक्यातल्या काटेवाडी या छोट्याशा खेड्यात झाला. ते बी.एजी. होते. महाराष्ट्राचे राजकारणी नेते शरद पवार यांचे ते वडील बंधू होत. शेतीचे खास ज्ञान मिळविण्यासाठी ते विद्यार्थी असतानाच इस्रायलला गेले होते. कृषी पदवीधर झाल्यावर केवळ पेसे व सुखसोयी यांच्या मागे न  लागता स्वतःला शेतकऱ्यांसाठी वाहून घेतले.

अप्पासाहेब पवारांनी आपले ज्ञान ज्या रीतीने प्रत्यक्ष शेतीत वापरले, निरनिराळे प्रयोग यशस्वी केले ते थक्क करणारे होते. त्यामुळे बारामती परिसराचा चेहरामोहराच पालटून गेला. इस्रायलसारख्या छोट्या देशाने शेतीत मारलेला पल्ला अप्पासाहेबांनी प्रत्यक्ष पाहिला आणि हे आपल्या भूमीत का होऊ शकणार नाही, अशा जिद्दीने कामाला जुंपून घेतले.

बारामतीचे कृषी-विकास प्रतिष्ठान म्हणजे अप्पासाहेबांची सृजनशील अशी प्रयोगशाळाच होती. कृषी-विकास प्रतिष्ठानाच्या माध्यमातून अप्पासाहेब यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग सुरू केले. कमी पाण्यात शेती पिकवायचे शिक्षण दुष्काळी भागाला मिळेल असे प्रयोग अप्पासाहेब यांनी केले.

विविध पिके वेगवेगळ्या हंगामात कशी पिकवावीत याची प्रात्यक्षिके त्यांनी दाखवली. शेतीला जोडून दूध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन, मधमाश्या पालन करून जोडधंदा कसा करावा याचे प्रशिक्षण त्यांनी e दिले. विदेशातील दुधाळ गाई या देशात निर्माण करण्यासाठी देशी गायींवर परदेशी वळूचा संकर करून दुधाचे उत्पादन त्यांनी वाढवून दाखवले. जमिनीतील तणावर उपाययोजना करण्यासाठी प्लास्टिकचा कागद जमिनीवर टाकून तणे वाढत नाहीत हा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला.

इस्रायलच्या भेटीनंतर शेतीला पाणी देणाऱ्या परंपरागत पद्धतीत बदल करून ठिबक सिंचन करून उत्तम पीक काढता येते हे त्यांनी अनेक प्रयोग करून दाखवले.

तेथे प्रत्येक धडपडणाऱ्या, नवीन विचार करणाऱ्या शेतकऱ्याचे स्वागत होते. आता शेतीत सर्रास वापरले जाणारे ठिबक सिंचन तंत्रज्ञान अप्पासाहेबांनी बारामतीत कित्येक वर्षांपूर्वीच यशस्वी केले.

नारळाचे देशावर फारसे उत्पन्न न देणारे फळझाड बारामतीत रुजविले, त्यासाठी आपल्या सार्वजनिक जीवनात धडपडणाऱ्या धाकट्या भावाला-शरद पवार यांना, कोकणात पाठविले. तेथून मासळीच्या खताचा वापर आणि इतर गोष्टी आत्मसात करायला लावल्या. हा धाकटा भाऊ पुढे खूप मोठा झाला तरी अप्पासाहेबांच्या कर्तृत्वाचा आधार आणि सावली त्यांच्यामागे उभी असे.

अपार कष्ट करून अप्पासाहेबांनी बारामतीच्या दुष्काळी भागात छोट्या बंधाऱ्यांनी क्रांती केली. तालुक्यातील गो-पालन, कुक्कुटपालन, फळबागा या साऱ्यांचा नजरेत भरणारा विकास हे अप्पासाहेबांच्या दूरदृष्टीचे फळ होते.

अप्पासाहेब पवार सामाजिक कामातही रस घेत असत. शेतमजुरांच्या समस्या सोडविण्यास ते झटत. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी अनेक संस्था उभारल्या. समाजात मुलींना शिक्षणाच्या आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी १९८९-९० मध्ये मातोश्री शारदाबाई यांच्या नावे शारदानगरमध्ये स्वतंत्र संकुल उभारण्यात आले. त्यात कनिष्ठ-वरिष्ठ महाविद्यालय, व्यायामशाळा, शारीरिक शिक्षण, शिक्षणशास्त्र यांची महाविद्यालये, परिचारिका प्रशिक्षण केंद्र वगैरेंचा समावेश आहे. आज त्यांनी लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्ष रूपांतर झालेले आहे ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून बारामती व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते कृषी प्रात्यक्षिके व कृषी प्रदर्शन या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती संबंधीचे ज्ञान उपलब्ध करून दिले जाते

अप्पासाहेब पवार यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

 • पाणी - २१ व्या शतकातील संघर्षाची ठिणगी

चरित्र[संपादन]

 • शिवाजी ठोंबरे यांनी ’कृषीभगीरथ अप्पासाहेब पवार’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

राष्ट्रीय पुरस्कार : भारत सरकार.

 1. पद्मश्री सन. १९९० भारताचे राष्ट्रपती श्री. आर. वेकंटरमण याच्या हस्ते.
 2. राष्ट्रीय पुरस्कार: १९८२मध्ये

इतर पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

 1. महाराष्ट्र सरकारचा कृषिभूषण पुरस्कार (१९८८)
 2. कृषी व ग्रामीण पुरस्कार १९८६ मध्ये
 3. कृषी रत्न पुरस्कार १९९० साली अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठाकडून.
 4. महात्मा फुले विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद उपाधी (१९९२)
 5. पुणे विद्यापीठाची डी.लिट. ही मानद उपाधी (१९९३)
 6. दादासाहेब शेबेकर पुरस्कार. १९९३मध्ये पुणे विद्यापीठाकडून.
 7. जमनालाल बजाज पुरस्कार १९९३
 8. रामशास्त्री प्रभुणे पुरस्कार सातारा.

डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या नावाने ’आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार’ देण्यात येतो.