तक्सिन, थायलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तक्सिन (थाई:สมเด็จพระเจ้าตากสินมหาราช; सोमदेत फ्रा चाओ तक्सिन महारात; १७ एप्रिल, १७३४ - ७ एप्रिल, १७८२) हा सयामचा (आताचे थायलंड) राजा होता. हा थाई-चीनी वंशाचा होता.

तक्सिनने अठराव्या शतकात थायलंडला म्यानमारपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. अयुत्तयाच्या दुसऱ्या पाडावानंतर त्याने थायलंडमधील छोट्याछोट्या राज्यांना एकत्र आणून सयामचे राज्य स्थापन केले. त्याच्या राज्यकालादरम्यान अनेक युद्धे झाली. म्यानमारने केलेले परतहल्ले तक्सिनच्या नेतृत्वाखाली सयामने परतवले तसेच उत्तरेकडील लान्ना राज्याचा पाडाव करून त्यास सयाममध्ये शामिल करून घेतले. लाओसच्या सीमेवरील राज्यांना पादाक्रांत करून तक्सिनने लाओसला दहशत बसवली.

तक्सिनने सयामची राजधानी म्यानमारच्या सत्तेदरम्यान नष्ट झालेल्या अयुत्तया शहरातून थॉनबरी (आताच्या बॅंगकॉकजवळ) येथे हलवली.

तक्सिनला त्याचा मित्र महा क्षत्रियस्युकने पकडून त्याची हत्या केली व स्वतः सयामचे राजेपद घेतले. क्षत्रियस्युकचा चक्री राजवंश आजही थायलंडच्या राजेपदी आहे.