डॅम इट अनू गोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

‘डॅम इट अनू गोरे’ हे प्रेमानंद गज्वी यांनी लिहिलेले एक मराठी नाटक आहे.

नाटकाचे कथानक[संपादन]

भारत सरकार सह्य़ाद्रीच्या खोऱ्यात ‘सह्य़ाद्री जल प्रकल्प’ या नावाचे एक धरण बांधू इच्छिते. हा प्रकल्प पूर्ण करण्याचं काम भारतीय कंपनी ‘गंगोत्री’ करणार असते, पण नेहमीप्रमाणेच माशी शिंकते आणि ते काम ‘कोलंबस वॉटर प्रोजेक्ट’ नावाच्या अमेरिकन कंपनीला दिले जाते. या धरणासोबतच भारतातील सर्व नद्या कालवे काढून एकमेकींना जोडल्या जाणार होत्या. असे केल्यामुळे एखाद्या भागात पाऊस पडला नाही तर या कालव्यातून त्या पाणीग्रस्त भागाला पाणी पोहोचवता येईल, अशी कल्पना होती.

धरणाचे भूमिपूजन ठरते आणि नेमके त्याच वेळी ‘जनराज्य गण परिषद’ हा चळवळ्या पक्ष अनू गोरेच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्त आदिवासींच्या हितासाठीधरणाला विरोध सुरू करतो. प्रकरण न्यायालयात जाते, न्यायालय धरण बांधायला परवानगी देते. तरीही अनू गोरेचा विरोध, मोर्चे निदर्शनांच्या रूपात सुरूच असतो. धरणाची उंची वाढवू नये म्हणून ती पुन्हा पुन्हा न्यायालयात जाते, पण दर वेळी कोर्ट ‘कोलंबस वॉटर प्रोजेक्ट’ला धरणाची उंची वाढविण्याची परवानगी देते. दरम्यान विरोध करणाऱ्या अनू गोरेला अटक होते. खटला चालतो आणि न्यायालय अनू गोरेला धरणकामात अडथळा आणते म्हणून देशद्रोही ठरवते व तुरुंगामध्ये पाठवते.

जेव्हा धरणाचा ९० मीटरचा पहिला टप्पा बांधून पूर्ण होतो, तेव्हा अनू गोरेची निर्दोष सुटका होते, पण अनू गोरेचे आंदोलन फसते. हे अपयश झाकण्यासाठी ऐन पावसाळ्यात अनू जलसमाधीची घोषणा करते. कशी सूत्रे फिरतात कुणास ठाऊक? पण ‘आदिवासींची मायमाऊली’ म्हणून अमेरिका, अनूला एक कोटीचा ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ हा पुरस्कार जाहीर करते आणि त्याच वेळी ‘गंगोत्री’ला ‘कोलंबस वॉटर प्रोजेक्ट’मध्ये समाविष्ट केलं जाते. अर्थात धरणाचे पुढचे सगळे काम बिनबोभाट पूर्ण होते.

या नाटकात एक व्यक्ती आहे, प्रेमाचा त्रिकोण आहे, तीन आदिवासी व्यक्तिरेखा आहेत आणि एक पोलीस इन्स्पेक्टर आहे.

यावर या नाटकातील ‘व्यक्ती’ म्हणते, ‘‘पाणी निसर्गाची देन, पण तेही विकत देण्याचीनी विकत घेण्याची सवय लावली या दुष्टांनी. धरणे बांधली जातील, कालवे काढले जातील, नद्या जोडल्या जातील. अमेरिकाच सर्व जोडून देईल, पण सारा खर्च वसूल होईपर्यंत पाण्याचा थेंबन् थेंब वेठीस धरला जाईल.’’

या नाटकाचा पहिला प्रयोग ‘असीम एन्टरटेन्मेट’ने १५ जानेवारी २०१०ला सादर केला. अजित भुरेंनी त्या प्रयोगाचे दिग्दर्शन केले होते. अनूच्या मुख्य भूमिकेत शीतल क्षीरसागर होती

नाटकाचे मूळ नाव ‘व्याकरण’, ते बदलून ‘डॅम इट अनू गोरे’ केले गेले.

या नाटकातल्या नायिकेने अमेरिकेचा पुरस्कार स्वीकारला म्हणून लेखक प्रेमानंद गज्वी यांना निषेधाला तोंड द्यावे लागले.