Jump to content

डच ईस्ट इंडिया कंपनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डच ईस्ट ईंडिया कंपनी या पानावरून पुनर्निर्देशित)
वेरीनिग्ड ऊस्टइंडिश कोंपान्ये
(डच ईस्ट इंडिया कंपनी)
Vereenigde Oost-Indische Compagnie
प्रकार सार्वजनिक कंपनी
उद्योग क्षेत्र व्यापार
स्थापना मार्च २०, इ.स. १६०२
विघटन मार्च १७, इ.स. १७९८
मुख्यालय अ‍ॅम्स्टरडॅम, नेदरलँड्स

वेरीनिग्ड ऊस्टइंडिश कोंपान्ये ऊर्फ डच ईस्ट इंडिया कंपनी (डच: Vereenigde Oost-Indische Compagnie; अर्थ: संयुक्त पूर्व भारतीय कंपनी ;) ही इ.स. १६०२ साली स्थापन झालेली नेदरलँड्सस्थित व्यापारी कंपनी होती.

इ.स. १६०२ साली नेदरलँड्सने या कंपनीला आशियामध्ये वसाहती निर्माण करण्याचा २१ वर्षांचा मक्ता दिला. ही जगातील सर्वप्रथम बहुराष्ट्रीय कंपनी होती. डच ईस्ट इंडिया कंपनी रोखे विकणारी जगातील सर्वप्रथम कंपनी होती. कंपनीला वसाहती वसवणे, युद्ध करणे, तह अथवा करार करणे, अपराध्यांना कारावास अथवा देहदंडाच्या शिक्षा ठोठावणे, स्वतःच्या टांकसाळी उघडून नाणी पाडणे यांसारखे एखाद्या सार्वभौम शासनाच्या तोडीचे अधिकार होते.

आकडेवारीच्या दृष्टीने पाहता, आशियातील व्यापारात डच ईस्ट इंडिया कंपनीने इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांना मागे टाकले होते. इ.स. १६०२ ते इ.स. १७९६ या काळात कंपनीने जवळपास दहा लाख युरोपीय लोकांना आशियातल्या व्यापारासाठी ४, ७८५ जहाजांमध्ये धाडले आणि २५ लाख टनांपेक्षा जास्त आशियाई व्यापारी मालाचा व्यवहार त्यांच्यामार्फत झाला. त्या तुलनेत पाहता, उर्वरित युरोपातून सर्व मिळून केवळ ८८२, ४१२ लोक इ.स. १५०० ते इ.स. १७९५ यादरम्यान व्यापारासाठी पाठवले. डच ईस्ट इंडिया कंपनीची मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांच्या ताफ्यात केवळ् २,६९० जहाजे होती आणि एकंदरीत व्यापारी माल डच ईस्ट इंडिया कंपनीच्या मालाच्या एक पंचमांश होता. सतराव्या शतकात आपल्या मसाल्यांच्या व्यापारातील एकाधिकारशाहीमुळे डच ईस्ट इंडिया कंपनीने भरपूर नफा कमावला.

बटाव्हिया प्रांतातील एका बंदरात (आजचे जकार्ता) कंपनीने इ.स. १६१९ साली मालुकु बेटांवरील मसाल्याच्या व्यापारातून फायदा मिळवण्यासाठी राजधानी स्थापन केली. पुढील दोन शतकांत कंपनीने आणखी बंदरे व्यापारी तळ म्हणून ताब्यात घेतली व त्या बंदरांच्या आसपासचा भूभाग स्वतःच्या आधिपत्याखाली आणून स्वतःचे स्थान बळकट केले. हा व्यापारातला महत्त्वाचा भाग होता आणि दरवर्षी १८ टक्के दराने लाभांश कंपनीला यातून जवळपास २०० वर्षे मिळत होता. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात, भ्रष्टाचारामुळे पोखरल्याने कंपनीचे दिवाळे निघाले आणि इ.स. १८०० साली कंपनी विसर्जित झाली. तिचे कर्ज आणि मालकीहक्क डच बटाव्हियन रिपब्लिकाच्या सरकारकडे गेले. डच ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातील भूभाग पुढे डच ईस्ट इंडीज म्हणून ओळखला जाऊ लागला. इ.स.च्या १९व्या शतकात इंडोनेशिया द्वीपसमूहाला सामावून घेत हा भाग विस्तारला आणि इ.स.च्या २०व्या शतकात यातूनच इंडोनेशिया निर्माण झाला.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: