Jump to content

टिप्पणी नृत्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

[]प्रस्तावना :

टिप्पणी हे गुजरात राज्यातील एक लोकनृत्य आहे. गुजराथमधील सौराष्ट्र भागातील चोरवाड जिल्ह्यात या लोकनृत्याचा उगम झाला आणि पुढे ते संपूर्ण राज्यात पसरले. या भागात काम करणाऱ्या बांधकाम मजुरांच्या स्त्रियांनी आनंदासाठी तसेच उत्सव प्रसंगी हे नृत्य करण्यास सुरुवात केली. बांधकामासाठी वापरण्यात येणारी काठी जमिनीवर आपटून त्या आघातांच्या तालावर हे नृत्य केले जाते. या काठीला ‘टिप्पणी’ असे म्हणत म्हणून या नृत्याला टिप्पणी नृत्य असे नाव पडले.



नृत्य पद्धती :

      अत्यंत साधे पण जोशपूर्ण असे हे नृत्य आहे. रंगीत टिपण्या अर्थातच काठ्या हातात घेऊन त्या जमिनीवर आपटत थोडेसे वाकून हे नृत्य केले जाते. हे नृत्य मुख्यत्वे स्त्रियांद्वारे केले जाते. समोरासमोर ओळींमध्ये तर कधी गोलाकार उभे राहून विशिष्ट पद्धतीने वाकून चालत केले जाणारे हे नृत्य अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. टिप्पणी अर्थातच हातातील काठी हे या नृत्यात वापरले जाणारे एकमेव साहित्य आहे असे असूनही अत्यंत कलात्मक पद्धतीने या काठीच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारे हे नृत्य केले जाते.


वेशभूषा आणि साहित्य :

या नृत्यासाठी स्त्रिया घागरा- चोळी आणि ओढणी हा पोशाख सर्वसाधारणपणे करतात. या नृत्यासाठी वापरली जाणारी काठी छान सजवली जाते. ती साधारणपणे १७५ सेमी उंचीची असते. त्या काठीला खाली एक लोखंडी ठोकळा बसवलेला असतो, ज्यामुळे जमिनीवर आघात करून नृत्य करणे शक्य होते. थोडक्यात, बांधकामात वापरल्या जाणाऱ्या दैनंदिन गोष्टींच्या सहाय्याने हे नृत्य केले जाते हेच त्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.


वाद्ये :

या नृत्यासाठी ढोल, थाळी, तबला, मंजिऱ्या, तसेच सनई वापरून साथसंगत केली जाते.

टीप : ही माहिती ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी, डोंबिवली या संस्थेच्या ज्ञानबोली प्रकल्पांतर्गत रिद्धी करकरे यांनी प्रकाशित केली आहे.

  1. ^ "टिप्पणी नृत्य".