झपूर्झा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झपूर्झा ही ''आधुनिक मराठी काव्याचे जनक" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवी केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले यांची लोकप्रिय व गाजलेली कविता आहे.

अर्थाचा वाद[संपादन]

‘झपूर्झा’ चा नेमका अर्थ काय असावा, या बद्दल वाद आहेत. हा शब्द केशवसुतांनी 'प्रत्यानंदाच्या सीमेचा वाचक' याअर्थी रूढ केला, अशी माहिती "म" विभागात 'ट्रान्सलिटरेशन फौंडेशन' या शब्दकोशात दिली आहे. [१] त्यावरून ‘झपूर्झा’ म्हणजे 'झपाटलेपणाने जगणे' असा अर्थ अनिल किणीकर यांनी निष्पन्न केला आहे.[२] केशवसुत यांनी या शब्दाचा वापर उन्मनी अवस्थेचे वर्णन करण्यासाठी १८९३ साली ‘झपूर्झा’ शीर्षकाच्या कवितेत सर्वप्रथम केला, असे किणीकर यांनी म्हंटले आहे.

"जा पोरी जा" हे वाक्य झपाटयानें उच्चारल्यास 'झपुर्झा' असा शब्द ऐकल्याचा भास होतो, तसा ध्वनि होतो, असेही हा संबंधित 'ट्रान्सलिटरेशन फौंडेशन' शब्दकोश नमूद करतो. केशवसुतांनी एकदा काही मुलींना पिंगा घालताना आणि “जपून जा पोरी जपून जा”असे म्हणत गोल फिरत होत्या, असे पाहिले होते. तसे सतत म्हणत गेल्यास फिरताना हळूहळू अंगात लय भिनून त्याची जणू गुंगी येते. कवीने त्याच अर्थाने “झपूर्झा गडे झपूर्झा” अशी शब्दरचना केली असावी, असे अभ्यासकांचे[३] मत आहे.

‘झपूर्झा’ ची भर[संपादन]

हरी नारायण आपटे यांनी १९१७ साली ‘केशवसुतांची कविता’ नावाने त्यांचा संग्रह काढला होता. त्यात केशवसुतांच्या सर्व कविता नव्हत्या, 'झपूर्झा' ही त्यात समाविष्ट नव्हती. आणि १९२० सालच्या आवृत्तीत झपूर्झा’ कविता प्रथम छापली गेली तेव्हा ‘झपूर्झा गडे झपूर्झा’ हे पालूपद छापले गेले नव्हते. पण ते मूळ हस्तलिखितात होते, असे केशवसुतांवर आणि त्यांच्या कवितांवर प्रेम करणाऱ्या काशीनाथ शंकर गर्गे उर्फ नाट्यछटाकार दिवाकर यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब केशवसुतांचे कनिष्ठ बंधू सीमाराम केशव दामले यांच्या नजरेस आणून दिली. नंतर १९२१ साली अधिक कवितांची भर घालून तसेच थोडी चरित्रात्मक माहिती देऊन सीमाराम केशव दामले यांनी कविता संग्रह प्रसिद्ध केला, अशी माहिती अभ्यासक आशा साठे त्यांच्या "कवी केशवसुत – एका नव्या युगाचा प्रारंभ" या लेखात[४] देतात.

कवितेतील तात्त्विक विचार[संपादन]

भारतीय तत्त्वज्ञानाच्या भाषेत 'झपूर्झा' ही कविता "सांख्य दर्शनातील पुरुष-प्रकृति" सिद्धांत मांडते. सांख्य दर्शनाच्या मते, विश्वाची निर्मिती 'पुरुष आणि प्रकृति' या दोन तत्त्वांच्या आधारे झाली आहे. 'प्रकृति' मुळात सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांनी बनली असून ती विश्वाचा पसारा 'पुरुषा' साठी निर्माण करते. तिची ही पुरुषाच्या भोगाची आणि त्याच्या मुक्तिची क्रीडा सतत चालू असते. प्रकृति संख्येने एक आहे तर पुरुष अनंत आहेत. येथे 'पुरुष' याचा अर्थ स्त्री-पुरुष अशा लिंगभेदानुसारचा 'पुरुष' नाही तर जगातील कोणताही माणूस, कोणताही मानवप्राणी. केशवसुत एका कडव्यात म्हणतात,-

पुरुषांशी त्या रम्य अति

नित्य प्रकृति क्रीडा करती

स्वरसंगम त्या क्रीडांचा ओळखणे

हा ज्ञानाचा हेतू

त्याची सुंदरता व्हाया

प्रत ती ज्ञाता

वाडें कोडें गा आता

झपूर्झा ! गडे झपूर्झा !![संपादन]

हेही वाचा[संपादन]

१. झपूर्झा नाट्यचळवळ

२. संपूर्ण केशवसुत इंग्लिशमध्ये १९६६ सालचे इंग्लिश भाषांतर येथे उपलब्ध आहे.

३. ‘हेरिटेज ते मॉडर्न आर्ट’ : कला-संस्कृतीचे झपूर्झा संग्रहालय

४. झपूर्झा’ कला व संस्कृतीचे संग्रहालय

येथे भेट द्या[संपादन]

झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालय, पुणे Archived 2023-03-01 at the Wayback Machine.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "झपूर्झा - Dictionary Definition". TransLiteral Foundation. 2023-02-28 रोजी पाहिले.
  2. ^ "जगण्याचा अर्थ सांगणारे 'झपूर्झा'". Maharashtra Times. 2023-02-28 रोजी पाहिले.
  3. ^ Bawankar, Hemant (2020-12-05). "मराठी साहित्य – काव्यानंद ☆ झपूर्झा ☆ कवी स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे - साहित्य एवं कला विमर्श % काव्यानंद % Posts" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2023-02-28. 2023-02-28 रोजी पाहिले.
  4. ^ "विश्रांती » कवी केशवसुत – एका नव्या युगाचा प्रारंभ". Archived from the original on 2023-03-01. 2023-03-01 रोजी पाहिले.