जॉन गॉल्सवर्दी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन गॉल्सवर्दी यांचा जन्म ऑगस्ट १४ १८६७ साली लंडन जवळच्या किंगस्टन येथे झाला. त्यांचे वडील लंडनचे प्रख्यात वकील होते. जॉन यांचे शालेय शिक्षण हॅरो स्कुल येथे झाले तर न्यु कॉलेज ऑक्सफॉर्ड येथून त्यांनी १८९० साली कायद्याची पदवी प्राप्त केली. घरचे अतिशय श्रीमंत असलेल्या जॉन यांना कमाई करण्याची काही गरज नव्हती, त्यांनी वकील म्हणून कधीही काम केले नाही. जहाजाने प्रशांत महासागरापासून तर दूर पूर्वेपर्यंत प्रवास करणे त्यांना अतिशय आवडे. एका प्रवासाहून परतत असतांना जॉन यांची गाठ प्रसिद्ध लेखक जोसेफ कॉनरॅड यांच्याशी पडली. पुढे या दोघांची मैत्री जमली.

जॉन गॉल्सवर्दी यांनी सुरुवातिला काही काळ लंडन शहरातील गरीबांच्या वस्तीत घालविला. तेथील लोकांची परिस्थिती, त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार यामुळे जॉन गॉल्सवर्दी अतिशय निराश झाले. पुढे त्या लोकांच्या सुधारणांसाठी जॉन यांनी बरेच काम केले.

जॉन गॉल्सवर्दी यांना त्यांच्या चुलत भावाची पत्नी ॲडा गॉल्सवर्दी अतिशय आवडे. ॲडाचे तिच्या नवऱ्याशी निट जमत नसल्याने तिला जॉनचा आधार हवासा वाटू लागला, त्यांचे एकमेकांवर मनापासून प्रेम होते. त्या काळात घटस्फोट हा विषय अतिशय दबलेल्या आवाजात बोलल्या जाई. जॉन आणि ॲडाचे प्रेम जॉनच्या वडिलांना आवडणार नाही आणि नवऱ्याशी घटस्फोट घेऊन जॉनशी विवाह करणे तेव्हा ॲडाला शक्य नसल्याने त्या दोघांनी तब्बल दहा वर्षे लग्न केले नाही. मात्र जॉन यांच्या वडिलांच्या मृत्युनंतर ॲडा आणि जॉन यांनी १९०५ साली विवाह केला.

ॲडाच्या उत्तेजनामुळेच जॉन लिखाण कामाकडे वळले. जॉन आपल्या शैलीत जे लिहीत ते सर्व ॲडा टाईप करून देई. ॲडा एक उत्तम पियानो वादक होती, त्या दोघांनाही संगीत अतिशय आवडे. तसेच दोघेही दूरच्या प्रवासाला जात. जॉन गॉल्सवर्दी यांना कुत्रे आणि घोड्यांविष्यीही विशेष प्रेम होते. जॉन गॉल्सवर्दी यांना लेखक म्हणून समाजात बराच मान होता. त्यांनी लिहिलेल्या नाटकांची चर्चा शहरभर होत असे.

जॉन गॉल्सवर्दी आपल्या कमाईतला खूप मोठा भाग गरीब, गरजू लोकांना वाटून स्वतः अतिशय कमी पैशात आपले घर चालवित. जॉन आणि ॲडा दोघांनाही सामाजिक कामांमध्ये खूप आवड होती. त्यांनी झोपडपट्टीतील लोकांसाठी, तुरूंगातील लोकांसाठी, मानवाधिकारासाठी काम केले. तसेच किमान वेतनाची निश्चिती, घटस्फोट, महिलांना मतदानाचे अधिकार या विषयांवरही काम केले. जॉनने आपल्या कमाईतील मोठा भाग नेहमीच दान केला तरी त्यासंबंधी कधीही वाच्यता केली नाही. जानेवारी ३१ १९३३ रोजी हॅम्पस्टेड, उत्तर लंडन येथे जॉन गॉल्सवर्दी यांनी शेवटचा श्वास घेतला.


साहित्य


जॉन गॉल्सवर्दी यांनी एकूण २० पूर्ण लांबीची नाटके शिवाय काही लघु नाटके, निबंध वगैरे लिखाण काम केले आहे. त्यांच्या द सिलव्हर बॉक्स आणि जस्टीस या नाटकांची विशेष दखल घेतल्या गेली. त्यांची सगळीच नाटके विचार करायला लावणारी आहेत.

जॉन गॉल्सवर्दी यांनी सरकार तर्फे देण्यात येणारी नाईटहुड ही पदवी घेण्यास नकार दिला मात्र इंग्लंडचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ मेरिट त्यांनी स्वीकारला (१९२९) तसेच अनेक विद्यापीठांनी त्यांने डोक्टरेट देऊन गौरविले. साहित्यासाठी नोबेल पारितोषिक त्यांना १९३२ साली देण्यात आले. जॉन गॉल्सवर्दी यांच्या जस्टीस नाटकात न्याय प्रक्रियेतील दोषांमुळे नायकावर होणऱ्या अन्यायाचे चित्रण आणि तुरूंगातील वातावरण वगैरेची चिड आणणारी वास्तवादी परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने कैद्यांचे हक्क, तुरुंगातील व्यवस्था मध्ये आमूलाग्र बदल केले. ५०० वर्षांच्या नाटकाच्या इतिहासात अशी एकमात्र घटना घडली. गॉल्सवर्दी यांचे महत्त्वाचे साहित्य :

From The Four Winds (1897) Short Stories

The Island Pharisees (1904) Novel

The Man Of Property (1906) Novel

The Forsyte Saga (1922) Novel

A Modern Comedy (1929) Novel

End Of Chapter (1935) Novel

The Silver Box (1906) Play

Strife (1909) Play

Justice (1910) Play

Loayalties (1922) Play

Escape (1926) Play


समकालीन लेखक / कवी


जॉर्ज बर्नार्ड शॉ , यीट्स, ग्रॅनविल, डडली बार्कर, गिलबर्ट, मुरे, जॉन मॅसफिल्ड.