जे. कृष्णमूर्ती यांचे तत्त्वज्ञान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जे. कृष्णमूर्ती हे आधुनिक भारतातील एक विचारवंत होते. १९व्या शतकाच्या अखेरीस आंध्र प्रदेशातील मदनपल्ली या चित्तूर जिल्ह्यात असलेल्या गावी असणाऱ्या एका तेलुगु ब्राह्मण कुटुंबातील जन्म झालेल्या कृष्णमूर्तींची बालवायमध्येच थिओसोफिकल पंथाशी संबंध आला. हिमालयातील हजारो वर्षांपासून जिवंत असणाऱ्या महात्मा देवापि किंवा कुथुमी या नावाचा योगी पुरुषावर थिओसॉफी लोकांची श्रद्धा होती. त्यांची अशी ही श्रद्धा होती की या देवपीचा आत्मा कृष्णमूर्तींच्या शरीरात प्रवेश करून सर्व जगाला आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे आहेत. म्हणून सर्व थिओसॉफी पंथाचे लोक कृष्णमूर्तीकडे भावी जगद्गुरू म्हणून पाहत होते. वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत कृष्णमूर्ती थिओसॉफी पंथाच्या वर्तुळामध्ये वावरले. परंतु पुढे त्यांनी त्या पंथाची असलेला आपला संबंध मोडला. आपण जगद्गुरू नसून एक सामान्य माणूस आहोत व आपल्यामध्ये कोणत्याही तथाकथित अजर अमर योगी पुरुषाच्या आत्म्याने प्रवेश केलेला नाही. अशी घोषणा करून कृष्णमूर्ती थिओसॉफी पंथाहून बाहेर पडले. मनुष्याला निःपक्षपाती अनाग्रही बुद्धीच्या सहाय्याने सत्य समजून घ्यावे लागेल व त्याद्वारेच स्वतःची मुक्ती साधावी लागेल, सत्यदर्शन, मुक्ती यांच्यासाठी तथाकथित देव, गुरू, धर्म, पंथ यांचे माध्यम स्वीकारण्याची गरज नाही, किंबहुना असे मध्यस्थ हे सत्य दर्शनातील अडथळेच मानले पाहिजे, असा मोठा क्रांतिकारक विचार कृष्णमूर्तींनी मांडला व हाच विचार मूलभूत धरून जवळजवळ ६०-७० वर्षे जगभर प्रवचने व्याख्याने देत कृष्णमूर्ती हिंडले.