जामदानी कलाकाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एक प्राचीन कलात्मक प्रकार. हातमागावर विणलेल्या या अतितलम सुतीकापडामध्ये निरनिराळ्या आकारांचे नक्षीदार वेलबुट्टीचे, आकर्षक कशिदाकाम केलेले असे. डाक्का येथील तलम मलमलीच्या जोडीचेच, पण त्यापेक्षा भारी प्रतीचे हे उत्पादन असे. जामदानी कापड राजघराण्यातील व दरबारी लोक वापरीत. ही कला पुढे साडीच्या पदरकिनारीमध्येही विकसित झाली. ठेवणीतील जामदानी वस्त्रे ही आज बंगाली घराण्यांची अमूल्य ठेव समजली जाते. जामदानी वस्त्रे बंगालमधील लोकांच्या वापरात होती, असा उल्लेख चंद्रगुप्ताच्या दरबारी येऊन गेलेल्या मीगॅस्थीनीझच्या प्रवासवर्णनात आढळतो, यावरून ही कला भारतात पुरातन काळापासून चालत आलेली आहे, असे दिसून येते. याला "चिकनकारी" असेही म्हणतात. छाया- प्रकाशाचा वेधक परिणाम साधणारा हा वस्त्रप्रकार आजही लोकप्रिय आहे.

उत्तर प्रदेशातील टांडा येथील जामदानी विणकाम पांढऱ्या कापडात त्याच प्रतीच्या पांढऱ्या धाग्यांनी करतात, त्यामुळे ते सौम्य व प्रसन्न वाटते. पुष्पाकार आकृतिबंध ठराविक अंतरावर विणलेली असतील, तर त्या वस्त्राला ‘बुट्टीदार’ म्हणतात, तिरप्या रेषेत असतील तर ‘तिरछा’ म्हणतात, सलग ओळीत असतील तर ‘झालर’ म्हणतात. जामदानी वस्त्रातील विशेष उल्लेखनीय प्रकार म्हणजे ‘पन्ना हजार’ हा होय. यातील फुलांच्या नक्षीसाठी जरीचा धागा वापरलेला असतो; त्यामुळे ती फुले चमकतात.