जनार्दन मुनेश्वर
डॉ. जनार्दन किशनराव मुनेश्वर (जन्म : सिरंजनी-नांदेड जिल्हा, इ.स. १९४३, निधन: २५.१०.२०२० (पुणे, महाराष्ट्र) हे पुण्याजवळील निगडी येथे राहणारे फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आहेत. व्यवसायाने ते डॉक्टर आहेत. निजामशाहीतील सिरंजनी येथे त्यांचा जन्म झाला आणि बालपण गेले. गावात शाळा नव्हती. १९५३साली गाडगे बाबा त्या गावात आले आणि जनार्दनरावांच्या आईला म्हणाले, ’तुहे पोरा लिव्हण शिकीव’; आणि वयाच्या १०व्या वर्षी ज.कि. मुनेश्वर बालवाडीत जाऊ लागले. ही शाळा सिरंजनीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या हिमायतनगर या गावी होती. शाळेत पायी जावे लागे. त्या शाळेतून ते वयाच्या १७व्या वर्षी सातवी पास झाले, पुढील शिक्षणासाठी नांदेडला आले, आणि १९६२साली मॅट्रिक होऊन उच्च शिक्षणासाठी मुंबईला आले.
मुंबईचे वातावरण न आवडल्याने मुनेश्वर पुण्यात आले, इंटर सायन्स होऊन बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले आणि एम.बी.बी.एस.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. कुटुंबनियोजन, माताबालसंगोपन, लसीकरण, पल्सपोलिओ, मलेरिया-क्षयरोग-कुष्ठरोग निवारण, अंधत्व निवारण आदी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
डॉ. जनार्दन मुनेश्वर यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रमात उत्कृष्ट काम केल्याबद्दल डॉ. जनार्दन मुनेश्वर यांचा राज्याच्या आरोग्यमंत्र्याकडून तीन वेळा सत्कार झाला. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ’आदर्श वैद्यकीय अधिकारी’ हा पुरस्कारही मिळाला आहे. डॉ. मुनेश्वर हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.
शालेय शिक्षण सुरू असतानाच ते आपल्या मामाबरोबर नागपूरला आले. १४ ऑक्टोबर १९५६ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर पाच लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली तेव्हा ते तेथे हजर होते. त्याचा परिणाम होऊन मुनेश्वर त्या वर्षापासूनच सामाजिक कार्यात भाग घेऊ लागले.
पुढील आयुष्यात डॉ.जनार्दन मुनेश्वर यांनी, गौतम बुद्ध, सम्राट अशोक, फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आदी राज्यांत व्याख्यानांच्या माधमातून पोहोचविण्याचे काम केले.
२०११ सालात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी श्रीलंकेत ’डलाडा मेलिगवा’ आंतरराष्ट्रीय म्युझियमचे उद्घाटन होणार होते. त्या समारंभासाठी जाणारे, पुण्यातील अशोक सर्वांगीण विकास सोसायटीचे अध्यक्ष अशोक शीलवंत, यांच्याबरोबर डॉ. मुनेश्वरही श्रीलंकेला गेले. त्यांनी त्या प्रवासवर्णनाचे पुस्तक लिहिले आहे.
डॉ. जनार्दन मुनेश्वर यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- दर्शन बुद्धत्वाचे (श्रीलंकेचे प्रवासवर्णन)
पुरस्कार
[संपादन]- दिल्लीच्या भारतीय दलित साहित्य अकादमीचा डॉ. बाबासाहेब विशिष्ट सेवा पुरस्कार (२०१३)
(अपूर्ण)