राखी तित्तीर
राखी तित्तीर किंवा तित्तूर (शास्त्रीय नाव: फ्रॅंकोलिनस पॉंडिसेरिॲनस) हा गावठी कोंबडीच्या आकाराचा पक्षी आहे.
ओळखण
[संपादन]साधारण ६० सेमी आकाराच्या या पक्ष्याचे अंग तपकिरी रंग असून अंगावर ठिपके, रेघा आणि पट्टे याचं मिश्रण असतं. त्याची शेपूट भुंडी(आखूड) असते. शेपटीचा रंग तांबूस तपकिरी असतो. नर आणि मादी सारखे दिसतात. नराच्या दोन्ही पायांवर आऱ्या (छोट्या आकारची नख असलेली बोटे) असतात. त्याने पळताना उपयोग होतो. आऱ्यांचा उपयोग नर मादीसाठी झुंजताना करतात. या पक्ष्यांच्या मुद्दामहूनही झुंजी लावल्या जातात.
पहाट झाली की झाडांवर झोपलेले तित्तीर जागे होतात आणि पंखांचा फडफडाट करत जमिनीवर उतरतात व कोंबडयांसारखे माना खाली घालून पायांना असलेल्या नख्यांनी जमिनी उकरतात. त्यातून सापडलेले दाणे व कीटक ते खातात. याशिवाय ते धान्याचे दाणे, बिया, वाळव्या, शेणकिडे, ढालकीटक वेचून खातात. या पक्ष्याचा घरटे करण्याचा काळ निश्चित नसतो. स्थानिक परिस्थितीप्रमाणे, म्हणजे पावसाचं प्रमाण, पिके घेण्याच्या पद्धती आणि खाद्याच्या उपलब्धतेप्रमाणे त्यांची वीण होते. पक्षीनिरीक्षिकांना जवळ जवळ वर्षभर याची घरटी सापडली आहेत. काटेरी झुडपांच्या मोकळ्या प्रदेशात किंवा शेताच्या आसपास आडबाजूला एक खळगा करून मादी त्यात सुमारे ४ ते ८ अंडी घालते. अंडी दुधावरच्या सायीच्या रंगाची असतात.
इंग्लिशमध्ये ग्रे पार्ट्रिज हे नाव असलेले तित्तीर पक्षी पाळले जातात.
इतर नावे
[संपादन]- मराठी: गाव तीतीर, बरडा तितर, तांबडा तितूर, तीतीर, गाव तित्तिर, चित्तर
- इंग्रजी: ग्रे फ्रॅंकोलीन, ग्रे पार्ट्रिज
- हिंदी: गोरा तितर, तितर, राम तितर
वितरण
[संपादन]हा पक्षी भारतीय द्वीपकल्पात सहसा खेड्यापाडयांच्या आसपास, शेतीच्या आणि गवताळ प्रदेशात दिसतो. काटेरी झुडापांचा आणि कमी पावसाचा प्रदेश या पक्ष्याला अधिक मानवतो.