चिकू
चिकू एक तांबूस रंगाचे गोड फळ आहे. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. भारतातील बहुतेक भाषांमध्ये या फळास चिकू असेच संबोधले जाते. याचे शास्त्रीय नाव मैनिलकारा जपोटा (manikara zapota) असे आहे. याचे कुळ सैपोटेसी (sapotaceae) हे आहे. चिकूच्या पाकविलेल्या फोडी, जॅम, स्क्वॅश, फोडी हवाबंद करणे, भुकटी हे पदार्थ तयार करता येतात. हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली गोड फळे घ्यावीत. फळे स्वच्छ धुवावीत. साल काढावी. बिया काढून टाकाव्यात. फोडी कराव्यात.
चिकू लागवड
[संपादन]चिकू पिकाच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, उत्तम निचरा होणारी, बारमाही पाण्याची सोय असणारी जमीन चांगली असते. भारी जमिनीत चर खोदून पाण्याचा निचरा करणे गरजेचे आहे. दमट आणि कोरड्या हवामानात चिकूची वाढ चांगली होते.
चिकूची लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेट बॉल या चांगल्या उत्पादन देणाऱ्या जाती आहेत. एप्रिल - मे महिन्यांत कलमांच्या लागवडीसाठी १० बाय १० मीटर अंतरावर १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे खणून वाळवीच्या नियंत्रणासाठी मिथिल पॅराथिऑन किंवा ५ टक्के कार्बारिल भुकटी मिसळावी.
त्यानंतर खड्डे चांगली माती, चार घमेली शेणखत, २.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरावेत. लागवडीसाठी सरकारमान्य रोपवाटिका किंवा कृषी विद्यापीठातूनच कलमे खरेदी करावीत. लागवड जुलै-ऑगस्ट महिन्यांत करावी. कलमांना लागवडीनंतर काठीचा आधार द्यावा. सुरुवातीला पहिल्या दोन वर्षांत खुंटावरील वारंवार येणारी फूट काढून टाकावी. कलमांची पूर्ण वाढ होण्यास ८ वर्षांचा कालावधी लागतो. पहिल्या सहा वर्षांच्या कालावधीत चिकू लागवडीमध्ये आंतर पीक म्हणून भाजीपाला, फुलझाडे, कडधान्यांचे पीक घेता येते.
लागवडीनंतर पहिल्या वर्षी प्रत्येक कलमास एक घमेले शेणखत, ३०० ग्रॅम युरिया, ९०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, ३०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश दोन हप्त्यात सम प्रमाणात द्यावे. पहिला हप्ता ऑगस्टमध्ये व दुसरा हप्ता जानेवारी महिन्यात द्यावा. दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षीच्या दुप्पट मात्रा द्यावी. कलमांना आळे पद्धतीने पाणी देताना झाडाच्या विस्ताराच्या आकाराचे गोल आळे करावे. झाडाला सतत पाणी मिळेल, परंतु पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबरीने तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा देखील वापर करता येतो.
चिकूपासून बनवले जाणारे पदार्थ
[संपादन]पाकविलेल्या चिकूच्या फोडी
[संपादन]चिकूची व्यवस्थित पिकलेली, गोड चवीची फळे निरीक्षणपूर्वक निवडून घ्यावीत. फळे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. त्याचे चार तुकडे (लांबीप्रमाणे) करून बी पूर्णपणे काढून टाकावे. मिठाच्या दोन टक्के द्रावणामध्ये फळांचे तुकडे ३ ते ४ मिनिटे बुडवून ठेवावेत. नंतर फोडी ड्रायरमध्ये (४० अंश सेल्सियस) किंवा सूर्यप्रकाशात पूर्ण एक दिवस वाळवाव्यात. दुसऱ्या दिवशी फळांचे तुकडे ४० अंश ब्रिक्स साखरेच्या पाकात पाच मिनिटे शिजवावेत. फोडी द्रावणातून बाहेर काढून पुन्हा सूर्यप्रकाशात अथवा ड्रायरमध्ये (४० अंश सेल्सियस) तापमानात वाळवाव्यात. त्यापुढील दिवशी अनुक्रमे ५५ व ६५ अंश ब्रिक्स पाकामध्ये शिजवून वाळवाव्यात. नंतर फोडी चांगल्या वाळवाव्यात. कोरड्या फोडी प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून सीलबंद कराव्यात.
चिकू स्क्वॅश
[संपादन]चिकूच्या फोडी मिक्सर/ पल्परमध्ये घालून चांगला लगदा तयार करून घ्यावा. लगदा मलमलच्या कापडाने गाळून त्यातला रस काढून घ्यावा. एफपीओ प्रमाणीकरणानुसार (२५ टक्के रस, ४५ ते ५० टक्के एकूण विद्राव्य घटक व ०.७५ ते १ टक्का आम्ल) घटक पदार्थ घ्यावेत.
घटक पदार्थांचे प्रमाण चिकू रस - १ किलो पाणी - १ लिटर साखर - १ किलो सायट्रिक आम्ल - ४० ग्रॅम चिकू रस, साखर, पाणी, सायट्रिक ॲसिड यांचे एकजीव मिश्रण तयार करावे. हे मिश्रण गाळून घ्यावे. स्क्वॅश ८० ते ८२ अंश सेल्सियस तापमानापर्यंत गरम करावा. पोटॅशियम मेटाबाय सल्फाइट ७१० मिलिग्रॅम/ किलो स्क्वॅश किंवा सोडियम बेन्झोएट ६०० मिलिग्रॅम/ किलो स्क्वॅश या प्रमाणात थोड्या स्क्वॅशमध्ये एकजीव करून संपूर्ण स्क्वॅशमध्ये घालावे. गरम स्क्वॅश बाटल्यांमध्ये भरावा. झाकणे बसवावीत. स्क्वॅश थंड व कोरड्या जागेत ठेवावा. स्क्वॅश सहा महिने टिकतो.
चिकू भुकटी
[संपादन]चिकूची पक्व फळे धुऊन, साल व बी काढून घ्यावीत. फळांचे आठ तुकडे (लांबीप्रमाणे) करून सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रात (५५ - ६० अंश सेल्सियस, पाण्याचे प्रमाण ७-८ टक्के कमी होईपर्यंत) वाळवावेत. त्यानंतर यंत्राच्या साह्याने फोडींची भुकटी करावी. भुकटी २५० गेजच्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सीलबंद साठवून ठेवावी.या भुकटीपासून मिल्कशेक तयार करता येते. मिठाई, आइस्क्रीम तयार करण्यासाठीसुद्धा वापर करता येतो.
चिकू जॅम
[संपादन]चिकूची पिकलेली फळे धुऊन, साल व बी काढावे. फळाचे तुकडे करून मिक्सर/ पल्परच्या साह्याने गर तयार करावा. प्रमाणीकरणानुसार (४५ टक्के गर, ६८ अंश ब्रिक्स घनपदार्थ, १ टक्का आम्ल) घटक पदार्थ घ्यावेत.
घटक पदार्थ प्रमाण -चिकू गर - २ किलो साखर - १.५ किलो पाणी - २५० मि.लि. सायट्रिक आम्ल - १५ ग्रॅम पेक्टीन - १० ग्रॅम गर, साखर, पाणी एकत्र करावे. मिश्रण शिजवावे. शिजविताना हळूहळू ढवळावे. जॅम आचेवरून उतरविण्यापूर्वी सायट्रिक आम्ल व पेक्टीन (थोड्या पाण्यामध्ये मिसळवून) घालावे. मिश्रणाचे तापमान १०५ अंश सेल्सियस, विद्राव्य घटक ६८ अंश ब्रिक्स एवढे झाल्यावर जॅम तयार होतो. इतर चाचण्या (फ्लेक चाचणी, साखरेच्या दीडपट वजन) घेऊन जॅम तयार झाल्यावर गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या बाटलीमध्ये भरावा. थंड झाल्यावर बाटली सीलबंद करावी.
चिकू शेक
[संपादन]चिकूपासून चांगल्या प्रतीचा शेक तयार होतो. शेक तयार करण्यासाठी चिकूचा गर अथवा फोडींचे अतिशय बारीक-बारीक तुकडे करावेत.
घटक पदार्थ -चिकूचा गर/तुकडे - १०० ग्रॅम साखर - १३६ ग्रॅम - १५० ग्रॅम दूध - ७५० - ८०० ग्रॅम स्टीलच्या पातेल्यामध्ये दूध गरम करावे. थंड झाल्यावर साय काढावी. दुधामध्ये साखर विरघळवून घ्यावी. नंतर त्यात चिकूचा गर अथवा तुकडे टाकावेत. हे मिश्रण मिक्सरमध्ये टाकून एकजीव करावे. शेक थंड होण्यास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावा. आवडीनुसार बर्फाचा चुरा टाकून शेक पिण्यास वापरावा.
संदर्भ
[संपादन][चिक्कू]
https://aaqua.persistent.co.in/aaqua/forum/viewthread?thread=12346