Jump to content

चाचेगिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चाचेगिरी : समुद्रावरील लुटीचा धंदा. खुल्या समुद्रावरून हक्कदारांच्या ताब्यातून गलबते किंवा त्यांतील माल पळवून अशी लूट करण्यात येते. अरबी समुद्रात काठेवाडनजीक चाचनामक बेटावरील रहिवासी अशी लूट करीत असल्यामुळे या धंद्याला चाचेगिरी नाव पडले असावे किंवा चाचे लोक वापरीत असलेल्या चोचीवजा टोकदार पगडीवरून हे नाव पडले असावे.

सुमारे २,००० वर्षांपूर्वी रोमन साम्राज्यातही भूमध्य समुद्रात चाचेगिरी चालत असे. नॉर्वे, स्पेन, इंग्लंड, फ्रान्स आदी देशांतील दर्यावर्दी व्यक्ती किंवा संघटित टोळ्या हे साहस करीत. पुढे भूमध्य समुद्रात चाचेगिरीला पायबंद बसल्यावर त्यांनी आपला व्याप तांबडा समुद्र, मादागास्कर (मॅलॅगॅसी), वेस्ट इंडीज, अमेरिका आदींचा सागरी परिसर व भारताचा शोध लागल्यावर हिंदी महासागरापर्यंत वाढविला.

वाफेच्या एंजिनचा शोध लागल्यानंतर चाचेगिरीला आळा घालण्यास मदत झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर हा चाचेगिरीचा प्रकार समुद्रावरील लुटीपुरताच मर्यादित न राहता त्याची व्याप्ती वाढली. १९५८ च्या खुल्या समुद्रवरील सर्वसाधारण अभिसंधीच्या पंधराव्या अनुच्छेदात दिलेल्या चाचेगिरीच्या व्याख्येप्रमाणे, खासगी आगबोटी किंवा विमाने यांच्यातील कर्मचाऱ्यांनी किंवा उतारूंनी, स्वतःच्या लाभासाठी खुल्या समुद्रावरील किंवा राष्ट्राच्या अधिकारितेच्या बाहेरील, दुसऱ्या आगबोटीविरुद्ध किंवा विमानाविरुद्ध केलेली स्थानबद्धता, हिंसाचार किंवा लूट चाचेगिरीत मोडते. अलीकडे हवाई चाचेगिरीला म्हणजे विमाने पळवून नेण्यास सुरुवात झाली आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये रशियाने पूर्व जर्मनी, हंगेरी इ. पूर्व यूरोपमधील देश पादाक्रांत केल्यानंतर कम्युनिस्ट राष्ट्रांत राहू न इच्छिणाऱ्या त्या देशांतील काही लोकांनी हवाई चाचेगिरी करण्याचा उपक्रम प्रथम १९४८ साली केला. १९६० मध्ये हा मार्ग अमेरिकेत फरारी लोकांनी माफी मिळविण्यासाठी अनुसरला. तेच तंत्र पॅलेस्टाइन-मुक्तीसाठी व विशेषतः पॅलेस्टाईनच्या दुर्दशेकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी, प्रदेश मिळविण्यासाठी, विमान पळव्यांना सोडविण्यासाठी आणि इझ्राएलला मदत करणाऱ्यांना धडा शिकवावा म्हणून स्थापना झालेल्या राजकीय संघटनांनी वापरले. १९७१ मध्ये एक भारतीय विमान पळविण्यात येऊन लाहोरला जाळण्यात आले. काश्मीर समस्येकडे जगाचे लक्ष वेधावे हा त्याचा दर्शनी हेतू होता.

अशा हवाई चाचेगिरीचे गुन्हे प्रमाणाबाहेर वाढल्याने नागरी विमान संघटनेच्या सदस्यांना १९७० मध्ये अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अभिसंधी करावा लागला.