चांद बावडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चांद बावडी राजस्थानच्या आभानेरी गावातील बावडी आहे. जगातली सर्वात मोठी आणि खोल बावडी मानली जाते. ९व्या शतकातल्या निकुंभ राजवटीतल्या चांद नावाच्या राजाने ही बांधवून घेतली. ही बावडी इतकी अद्भुत आहे की हिला पहायला दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात. गावातल्या हर्षित मातेच्या मंदिरासमोर ही बावडी आहे.

बावडी म्हणजे पायऱ्यापायऱ्यांची विहीर. या विहीरी सहसा अनेक मजली खोल आणि शिल्पसौंदर्याने नटलेल्या अशा असतात. अशा अनेक विहिरी गुजरात आणि राजस्थानात आहेत.

आभानेरी हे गाव जयपूरपासून ९५ किलोमीटर अंतरावर आहे.

चांद बावडीच्या तळापर्यंत पायऱ्या आहेत. बावडी कितीही पाण्याने भरली तरी या विहिरीतून पाणी भरून आणता येते. मात्र आज, या पाण्याचा वापर होत नाही. या बावडिला अंधार-उजेडाची विहीर म्हणता येईल. चांदण्या रात्री ही झळाळून निघते.

या विहिरीत राजासाठी होणारे नृत्याचे कार्यक्रम पाहण्यासाठी १७ किलोमीटर लांबीचे भुयार आहे. बावडीच्या पायऱ्या कलेचे अद्भुत दर्शन घडवितात. या पायऱ्या इतक्या खास आहेत की खाली उतरलेला माणूस भुलभुलैय्या सापडल्यासारखा होतो. ज्या पायऱ्या तो उतरून खाली जातो त्या पायऱ्या त्याला येताना क्वचितच सापडतात.