चर्चा:श्रीधर कृष्ण कुलकर्णी रेठरेकर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पठ्ठे बापूरावांचे नांव श्रीधर कृष्ण कुलकर्णी. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८६ रोजी रेठरेहरणाक्ष ता. वाळवा, जि. सांगली येथे झाला. लहानपणापासून श्रीधरला तमाशाचा नाद लागला. त्यांची घरची परिस्थिती जेमतेम होती. आई-वडिलांनी श्रीधरला शाळेत घातले. त्याचवेळी त्याला कविता करण्याचा छंद लागला व त्याचा गळाही गात राहिला. ग्रामीण भागात गायल्या जाणार्‍या जात्यावरच्या ओव्यां ऐकूनऐकून त्यांनी त्यात ही नवे बदल केले. त्यांनाही `श्रीधरची गाणी ` लोकप्रियता मिळाली. त्याचा परिणाम औंधच्या राजांनी दखल घेऊन श्रीधरला आपल्याकडे बोलवून घेतले. श्रीधरचे पुढील शिक्षण औंध येथे झाले. पुढे राणी साहेबांनी श्रीधरला बडोद्यास नेले. तेथे संस्कृत बरोबर यंत्र दुरुस्तीचे शिक्षण ही घेतले. नोकरीही केली. अवघ्या सतराव्या वर्षी पठ्ठे बापूरावांवर संकट आले. आई-वडिलांचे कृपा छत्र हरविले. शेवटी बडोद्याची नोकरी सोडून श्रीधर परत आला.

गावी घरासमोर असलेल्या वाड्यातच तमाशाचा फड चालायचा. श्रीधरच्या कानावर त्या वाड्यातल्या तमाशाचे सूर येत. पण ब्राह्मण आणि कुलकर्णीपद त्यामुळे रात्री पटकन उठून तमाशाला जाऊन बसायचे धाडस त्यांना होईना. मनातली तळमळही त्यांना गप्प बसू देईना. बापू चोरुन तमाशाला जाऊ लागले. तमासगीरांना त्यांनी अनेक लावण्या लिहून दिल्या. तमाशात बापूरावाच्या लावण्या आणि कवने गायली जाऊ लागली. `श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी ! सोवळे ठेवले घालूनी घडी !! मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी !! ` ह्या जिद्दीने `कुबेराला लाजवील असे वैभव तमाशाच्या जोरावर पायाशी लोळवीन `हा संकल्प करुनच बापूराव घराबाहेर पडले. गावोगावी तमाशाचा फड उभे राहू लागे. बापूरावांचे स्वत:चे काव्य, योग्यसाथ, पहाडी आवाज आणि लावणीतील शृंगाराने तमाशा बदलला. त्यातून श्रीधरची वाहवा मिळता मिळता `पठ्ठेबापूराव ` म्हणून ते प्रसिद्धीला आले. ` दोन लक्ष आम्ही केली लावणी केवढी म्हणावी मात बडी `असा स्वत:च्या काव्य लेखनाचा निर्देश करणारा हा शाहीर, मुंबईत आला, बटाट्याच्या चाळीत राहू लागले. तिथेही तमाशाच्या फडात जाऊन त्यांना लावण्या रचून देण्याचे काम त्यांनी काही दिवस केले. याच काळात त्यांना नामाधुळवडकरांच्या फडातील पवळा, नामचंद पवळा भेटली. तिला काहीजण `मस्तानी ` ची उपमा द्यायचे. बापूरावांची काव्य प्रतिभा पवळाच्या सान्निध्यात बहरली. बापूरावांचे काव्य अन पवळा बाईच्या गोड गळ्याने व ठसकेबाज नृत्याने ती रसिकांच्यासमोर सादर केली बापूराव आणि पवळा यांची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पसरली. १९०८-०९ साली छ. शाहू महाराजांसमोर त्यांनी `मिठाराणी' चा वग पठ्ठे बापूरावनी सादर केला. पण पुढे त्या दोघांवर सर्वांनी बहिष्कार टाकला. तमाशाचा फड बंद पडला. आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे बापूराव व पवळा या जोडीने स्वत:ला ९०० रुपयांचा करार करून स्वत:चा लिलाव केला. मुंबईच्या अबू शेठनी लिलाव घेतला. मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरवर पवळा पठ्ठे बापूराव यांना पाहण्यासाठी तिकीट लावले. दोन आण्याच्या तिकिटावर दररोज चारशे रुपयांचा गल्ला जमत असे. असं नामदेव व्हटकरांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. पण पुढे पवळा बेबनावामुळे पठ्ठे बापूरावांचा फड सोडून निघून गेली. पठ्ठे बापूरावांनी दुसर्‍या स्त्रीला घेऊन त्यांनी तमाशाचा फड चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. ` कली युगाचा ऐका दाखला ! पठ्ठे बापूराव भुलला पवळीला ` असे ठामपणे सांगणारा हा शाहीर पुहा एकदा `शाहीर पठ्ठे बापूराव आणि नामचंद पवळाबाई यांचा ढोलकीतील तमाशा या नावाने नव्या जोमाने सुरु झाला. खर्‍या अर्थाने पवळा बापूरावांशी एकरुप झाली होती. ६ डिसेंबर १९३९ साली पवळा काळाच्या पडद्याआड गेली. लक्ष्मी गेली, लोकप्रियता गेली. एकेकाळचा तमाशा सम्राटाला अखेरचे दिवस विपन्नावस्थेत कंठावे लागले. त्यांच्याच तमाशात काम करणार्‍या `ताई परिंचेकर' ह्या बाईने त्यांना शेवटपर्यंत सांभाळले. याच काळात पुण्यातील बापूसाहेब जिंतीकर यांनी बापूरावंना आधार दिला. त्यातूनच या जिंतीकरांनी बापूरावांच्या कवनाचे संकलन केले. १९४२ साली श्रीमंत आबासाहेबांच्या हस्ते जॉन स्मॉल मेमोरियल पुणे येथे जाहीर सत्कार झाला. श्रेष्ठ कवीने २२ डिसेंबर १९४५ रोजी आपली इहलोकीची यात्रा संपविली. हा शाहीर सांगली जिल्ह्याचे भूषण होता. आजही रातधुंदीत जागवा म्हणत त्यांची कवने गात शाहीर रात्री जागवितात. असा हा शाहीर त्यांच्या कवनातून आजही आपल्यात आहे.