Jump to content

चर्चा:प्रदर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रदर स्त्रियांच्या योनिमार्गातून येणाऱ्या अपसामान्य पांढऱ्या स्त्रावाला ‘प्रदर’ म्हणतात. सर्वसाधारण भाषेत स्त्रिया याचा ‘अंगावर जाते’ असा उल्लेख करतात. कधीकधी स्त्रीरोगात नेहमी आढळणाऱ्या या लक्षणाला ‘श्वेत प्रदर’ किंवा पांढरी धुपणी या संज्ञाही लावतात. सर्वसाधारणपणे प्रमाणापेक्षा जास्त श्लेष्मल (बुळबुळीत) किंवा पूयुक्त व योनिमार्गावाटे बाहेर पडणाऱ्या स्रावाला प्रदर म्हणतात.

प्रत्येक स्त्रीच्या जननमार्गाचे काही प्राकृतिक (स्वाभाविक) स्त्राव असतात. योनिमार्ग प्रकोष्ठावर (प्रवेशद्वाराजवळील पोकळीवर) असलेल्या बार्थोलिन ग्रंथीचा (सी. बार्थोलिन या डॅनिश शरीरविज्ञांच्या नावावरुन ओळखण्यात येणाऱ्या ग्रंथीचा) स्राव, गर्भाशयाच्या ग्रीवेतील (मानेसारख्या भागातील) ग्रंथींचा स्त्राव, योनिभित्तीतील ग्रंथींचा स्त्राव व गर्भाशय-भिंत्तीचा स्त्राव हे सर्व प्राकृतिक स्त्राव होत. त्यांचा उद्देश जननमार्ग ओलसर ठेवण्याचा असतो आणि त्यांची स्त्रीस जाणीवही नसते. गर्भाशय ग्रीवेच्या स्त्रावाचे प्रमाण निरनिराळे असते व प्रत्येक स्त्रीमध्ये ऋतुचक्राप्रमाणे त्यात बदल होतो. गर्भारपण, लैंगिक व मानसिक उद्दीपन आणि अंडमोचनाच्या (परिपक्व अंड म्हणजे प्रजोत्पत्तिक्षम पेशी अंडकोशातून बाहेर पडण्याच्या) वेळी स्त्रावाधिक्य आढळते. या शरीरक्रियात्मक स्त्रावामुळे योनिमार्गाच्या संमुख भित्तीचे पृष्ठभाग एकमेकांजवळ असूनही घर्षणविरहित राहतात. याशिवाय या स्त्रावाची अम्लता [pH मूल्य ४ ⟶ पीएच मूल्य] सूक्ष्मजंतूची वाढ रोखण्यास मदत करते. योनिमार्ग-भित्तीच्या उपकला अस्तराच्या (पातळ अस्तराच्या) कोशिकांचे (पेशींचे) सतत विशल्कन (झडून पडणे) चालू असते. या कोशिकांतील ग्लायकोजेनापासून योनिमार्गात नेहमी असणारे डीडरलीन सूक्ष्मजंतू (ए. डीडरलीन या जर्मन स्त्रीरोगतज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारे सूक्ष्मजंतू) लॅक्टीक अम्ल तयार करीत असतात. ही क्रिया रक्तातील स्त्रीमदजन या हॉर्मोनामुळे (उत्तेजक स्त्रावामुळे) नियंत्रित केली जाते. लहान मुली व वयोवृद्ध स्त्रियांमध्ये लॅक्टिक अम्लाचे संरक्षण कमी पडल्यामुळे या वयोगटात योनिमार्गशोथाची (योनिमार्गाला दाहयुक्त सूज येण्याची) शक्यता अधिक असते.

रोगनिदान व चिकित्सा[संपादन]

निदानाकरिता संपूर्ण रोग-इतिहास, सार्वदेहिक तपासणी, जननमार्ग तपासणी व काही विशिष्ट तपासण्या कराव्या लागतात. प्रदराविषयी शक्य तेवढी माहिती, विशेषेकरून त्याचा काळ, प्रथमच की प्रत्यावर्ती (कालांतराने पुनःपुन्हा होणारा) आणि त्यामुळे कोणता त्रास होतो, ही माहिती मिळविणे जरूर असते. स्त्रावाची सूक्ष्मदर्शकीय तपासणी, तसेच मल परीक्षा, मूत्र परीक्षा व रक्त परीक्षा या प्रयोगशालीय परीक्षा आवश्यक असतात. यांशिवाय जी. एन्. पापानिकोलाऊ या ग्रीक शारीरविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणारी ‘पापानिकोलाऊ परीक्षा’ ही विशिष्ट परीक्षा करतात. या परीक्षेकरिता ग्रैव स्त्राव पिचकारीने शोषून घेऊन तो काचपट्टीवर ठेऊन सूक्ष्मदर्शकीय तपासणी करतात. याचा वेळी बाह्य गर्भाशय मुखाजवळचे खरवडून घेतलेले ऊतकही तपासतात. काचपट्टीवरील या आलेपाला ‘पॅप आलेप’ म्हणतात. सूक्ष्मजंतु-संक्रामण व कर्करोग यांच्या निदानाकरिता ही एक अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे.

नवजात अर्भकातील स्त्रावाकरिता कोणत्याही उपचारांची गरज नसते. ऋतुकालपूर्व स्त्रावाकरिता विटपाच्या (मांड्यांच्या मधल्या धडाच्या खालच्या भागाच्या) स्वच्छतेविषयीच्या सूचना व इतर गोष्टी समजावून सांगणे पुरते. इतर सर्व वयोगटांतील प्रदराचे कारण शोधून त्यावर इलाज करतात. अती उत्साही व चोखंदळ स्त्रियांच्या बाबतीत योनिमार्गात पूतिरोधक औषधांचे फवारे वारंवार मारून घेण्याने प्रदर बरा होण्याऐवजी वृद्धिंगत होण्याची किंवा नसल्यास सुरू होण्याचीच शक्यता असते. वयोवृद्ध स्त्रियांमध्ये कर्करोग आणि विशिष्ट सूक्ष्मजंतु-संसर्ग नसल्याची खात्री करून घेतल्यानंतर ५०० मिली. पाण्यात २० ते ४० मिली. लॅक्टिक अम्ल घालून योनिमार्ग फवारल्यास प्रदर कमी होतो. रक्तमिश्रित प्रदराचे विलंब न लावता निदान करणे आवश्यक असते व त्याकरिता स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घेणे जरूर असते. ट्रिकोमोनासजन्य प्रदर ही संभोगजन्य विकृती असल्यामुळे पत्नी व पती या दोघांनाही मेट्रोनिडाझोलाच्या २५० मिग्रॅ. गोळ्या दिवसातून तीन अशा १० दिवसापर्यंत घेणे आवश्यक असते.

रक्तप्रदर[संपादन]

ह्यात रक्तस्त्राव होत असतो. रक्तस्त्राव हे जरी सामान्य लक्षण असले, तरी ह्या स्वरूपाचे अनेक विकार असतात. दोघांच्या प्रकोपाने रक्तयोनी, रक्तपित्त, पित्तयोनी, पित्तावृत्त अपान आणि धातुपधातू वृद्धीपासून रक्तवृद्धी, रजोवृद्धी असे प्रकार पडतात. त्या त्या विकाराला अनुसरून योग्य चिकित्सा करावी लागते. पित्तावृत्त अपानामध्ये अपानवातनाशक चिकित्सा, तर पहिल्या तीन रोगांत पित्तनाशक व रक्तस्तंभक रक्तपित्ताची चिकित्सा करावी लागते. रक्तवृद्धी व रजोवृद्धी यांत रक्तधातूचे व रसधातूचे पचन वाढवून त्यापासून अनुक्रमे मांस व रक्त धातू निर्माण करण्याची प्रवृत्ती शरीरामध्ये उत्पन्न करावी. या विकारामध्ये स्नेहन देऊन सर्व शरीराला शेक दिला पाहिजे. धायटीचे फूल, खैर, इ. सिद्ध किंवा शालसारादिगण सिद्ध तूप पिण्याला देऊन शेक करून वमन, विरेचन, नंतर रेचक बस्ती, स्नेह बस्ती आणि योनी बस्ती (उत्तर बस्ती) द्यावा. जेष्ठमध व खडीसाखर तांदुळाच्या धुवणाबरोबर पिण्यास द्यावे. बलामूळ साखर आणि मद्य ह्यांच्याबरोबर द्यावे, वाघनखीचे मूळ उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर आणून कंबरेला बांधावे, रसांजन व तांदुळजाचे मूळ मध व तांदुळाच्या धुवणाबरोबर पिण्यास द्यावे.

अशोकाच्या सालीने सिद्ध केलेले दूध, कुशाच्या मुळाचे चूर्ण उंबराच्या पाण्याबरोबर, तसेच दार्व्यादि क्काथ हे द्यावेत, आहार-दुध्याचा कीस साखर घालून त्याचे मोदक करून ते खाण्यास द्यावेत कोहळ्याची भाजी तिखट न घालता द्यावी दुधातुपाचे पदार्थ द्यावेत, शीत, सुगंधी अशा द्रव्यांचा उपयोग करावा, शोणितस्थापक मध, केशरमोचरस इ. औषधांचा उपयोग करावा, तसेच चंद्रकला, प्रवाळ, दगडी बोर, वसंतकुसुमाकर ह्यांचा उपयोग करावा.

श्वेत प्रदर[संपादन]

शोधन उपचारांपैकी वमन उपचार हा प्राधान्याने करावा. चंद्रप्रभा, प्रतापलंकेश्वर, अशोकारिष्ट, लोध्रासव ही द्यावीत तुरटी, गेरू, काथ ह्यांचे वस्त्रगाळ चूर्ण करून ते तिळाच्या तेलात कालवून त्यात कापसाचा बोळा भिजवून गरम करून तो योनीमध्ये ठेवीत असावे खैर, कायफळ, हिरडा, चंदन ह्यांच्या काढ्याने योनिधावन करीत असावे. ह्या विकाराबरोबर शुक्रक्षीणता, रसक्षीणता असल्यास ती क्षीणतानाशक औषधेही दिली पाहीजेत. मानसिक कारण असल्यास अभ्रक, रौप्य ब्राह्मीच्या रसातून द्यावीत.