चर्चा:नारायण मुरलीधर गुप्ते
चाफ्या'तील ज्ञानदेव -- स्नेहा वाबळे, रविवार, ३० ऑगस्ट २००९
आजवर कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते यांच्या ‘चाफा बोलेना, चाफा चालेना’ या अप्रतिम कवितेवर बरीचशी चर्चा घडलेली आहे, रसग्रहणे झाली आहेत. चार शोधनिबंध या डॉ. द भि. कुलकर्णींच्या पुस्तकात चाफ्यावर एक शोधनिबंधही आहे. इतकी सारी चर्चा, इतकं सगळं होऊनही हा ‘चाफा’ कोण? या चाफ्यानं हसावं, फुलावं, चालावं, बोलावं म्हणून प्रयत्न करणारी आणि त्याच्या अबोल राहण्याचं दु:ख वाटून घेणारी ‘ती’ कोण? कवी बी यांच्या ३० ऑगस्ट म्हणजे आज येणाऱ्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा तीचा व त्या ‘चाफ्या’चा शोध घेण्याचा हा छोटासा प्रयत्न. बीकवींचा चाफा- तो लतादीदींच्या स्वरातून ऐकता ऐकता किती पिढय़ा मोठय़ा झाल्या आणि नकळत रुसलेल्या प्रियकराला उद्देशून अगदी लीलया एखादी प्रेयसी म्हणू लागली, ‘काय! आज चाफा बोलेना?’ असा हा बी कवींचा चाफा माझ्या जन्माच्याही अगोदरचा. आजवर बी कवींच्या या चाफ्यावर बरीचशी चर्चा घडलेली आहे, रसग्रहणे झाली आहेत. ‘चार शोधनिबंध’ या डॉ. द भि. कुलकर्णीसरांच्या पुस्तकात चाफ्यावर एक शोधनिबंधही आहे. इतकी सारी चर्चा, इतकं सगळं होऊनही हा ‘चाफा’ कोण? या चाफ्यानं हसावं, फुलावं, चालावं, बोलावं म्हणून प्रयत्न करणारी आणि त्याच्या अबोल राहण्याचं दु:ख वाटून घेणारी ‘ती’ कोण? ‘ती’ हा शब्द मुद्दाम अवतरणात लिहिण्याचं कारण की, या ‘ती’चा व ‘त्या’ ‘चाफ्या’चा शोध घेण्याचा हा छोटासा प्रयत्न. हा ‘चाफा’ म्हणजेच जेयांचिये वाचे माझे आलाप। दीठि भोगी माझे चि रूप। जेयांचे मन संकल्प। माझे चि वाहे। माझेया किर्तीविण। जेयांचे रिते नाही श्रवण। जेया सर्वागा भूषण। माझी सेवा।। अशा पंचेंद्रियांच्या माध्यमातून त्या ईश्वराशी एकरूप होणारे, चिद्विलासात रत होणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर म्हणजेच बी कवींचा ‘चाफा’! सर्व जगाने अव्हेरल्यावर, ज्यांनी ताटीचं दार लावलं आणि जे अंतर्यामी चिद्विलासात रत झाले; पण त्या संत ज्ञानदेवांच्या या कृतीनं अवघी ‘सृष्टी ’ थरथरली, बिथरली. या ‘सृष्टी’लाच त्या ‘चाफ्या’चं रुसणं, रागावणं समजून आलं आणि अलबत ती अस्वस्थ झाली. जणू ‘सृष्टी’ हीच त्या ज्ञानदेवांची प्रेयसी. आजवर एवढं सोसलं, एवढं सोसलं, पण सोसणाराही सोसून सोसून किती सोसेल. या सोशिकतेचासुद्धा अंत जगाने केला, म्हणून हा चाफा अवघ्या सृष्टीवरच रागावला. मग काय? साक्षात सृष्टीचं येणं आणि या चाफ्याचा राग काढणं! म्हणूनच पहिल्या सहा कडव्यांत सृष्टीच सृष्टीतील अनेक प्रियकर-प्रेयसींच्या जोडय़ांची उदाहरणे देऊन तू मात्र माझी साथसंगत सोडलीस, असे म्हणते. आजवर तर मीच तुझ्या प्रेमात आहे, तुझी अनेक रूपं आजवर मी पाहिली, अनुभवली म्हणूनच प्रेमातील द्वैत आणि प्रेमातील श्रेष्ठता सुचवत सृष्टी ज्ञानेश्वरमय होऊन जाते. हा आंबा, ही मैना, हे केतकीचे बन, त्यात दरवळणारा गंध, नागासवे गळणारे देहभान, रानावनात हुंदडत, पशूंच्यासह फिरणारी, कडेकपाऱ्यातून, दऱ्याखोऱ्यांतून वाहत नेणारा शुभ्र पाण्याचा झरा, त्याचं नदीत होणारं एकरूप, आकाशात कडाडणारी वीज, कलिकेच्या अंगाशी झोंबणारा, धाबडधिंगा घालणारा मदमस्त वारा.. हे सगळं, सगळं काय? अर्थातच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभुतांचंच रूप. म्हणजेच जीवाशिवाच्या मीलनाच्या कितीतरी रूपांचं दर्शन जणू सृष्टीनं ज्ञानदेवांना- या अबोल चाफ्याला घडवलं.या पहिल्या सहा कडव्यांतून हे दर्शन दिल्यानंतर, सातव्या कडव्याच्या सुरुवातीला कवी बी असे म्हणतात, ‘सृष्टी सांगे खुणा’ ही एक ओळच त्या कवितेतील ‘ती’ कोण हे पटवून देते. माझ्या दृष्टीनं सातवं कडवं हा या कवितेचा केंद्रबिंदू आहे, गाभा आहे. कारण ती सृष्टी पुढं म्हणते.. आम्हा मुखस्तंभ राणा मुळी आवडेना! रे आवडेना! या सृष्टीनं ज्याला ‘राणा’ म्हणावं असा एकच परमात्मरूपी मानव जीव होता, तो म्हणजे संतश्रेष्ठ अबोलरूपी ‘ज्ञानेश्वर चाफा.’ या ‘राणा’नं असं मुखस्तंभ राहावं हेच सृष्टीला आवडत नाही, म्हणूनच.. तू चल ये रे ये रे गडय़ा, नाचू उडू घालू फुगडय़ा खेळू झिम्मा झिम्- पोरी झिम- पोरी झिम! वारकरी संप्रदायात वारीला निघालेली माणसं, भजन-कीर्तनात रमणारी माणसं कशात दंग होतात? वारीचा आनंद कसा घेतात? तर खरंच ती नाचतात, उडतात बरं का! ते पाहिल्यावरच ‘त्यांचं उडणं’ आपल्याला समजू शकतं आणि खरा आनंद झिम्मा खेळून, फुगडी घालून ते कसा घेतात हे कळू शकतं. नक्कीच हा ‘चाफा’ म्हणजेच संतश्रेष्ठ श्रीज्ञानदेव व ती सृष्टी यांचं हे अतूट नातं आहे, याचसाठी तो फुगडीचा आग्रह. विश्वाचं अंगण आपल्याला आंदण दिलं आहे. तुझ्यावर रागावणारं जग अर्थातच ‘विषयाचे किडे’ आहेत म्हणूनच त्यांची धाव बाह्य़ गोष्टींकडे, पण आपण मात्र शुद्ध रसपान करायचे आहे. इतकं सगळं सृष्टी जणू संतश्रेष्ठरूपी चाफ्याला समजावून, समजावून तालासुरात, गात गात सांगतेय. शेवटी ‘सृष्टी’ जिंकली. कारण ‘चाफा’ आणि ‘सृष्टी’ यांची ‘दिठीत दीठी’ मिसळून गेल्यामुळे ‘गात्रे पांगळून गेली.’ ‘सृष्टी’ व ‘चाफा’ अद्वैतात विलीन झाले, मग कुठला चाफा आणि कुठली सृष्टी- सर्व दिशांची बंधनेही नाहीशी झाली. चाफा ‘चाफा’ उरला नाही- सृष्टी ‘सृष्टी’ उरली नाही- फक्त अद्वैत आणि अद्वैत!
चाफा : कविता चाफा बोलेना, चाफा चालेना चाफा खंत करी, काही केल्या फुलेना ।।धृ.।। गेले ‘अंब्याच्या’ वनी, म्हटली मैनसवे गाणी आम्ही गळ्यात गळे मिळवून - १ गेले केतकीच्या बनी, गंध दर्वळला वनी नागासवे गळाले देहभान - २ आले माळ सारा हिंडून, हुंबर पशूंसवे घालून कोलाहलाने गलबले रान - ३ कडा धिप्पाड वेढी, घाली उडय़ांवर उडी नदी गर्जून करी विहरण - ४ मेघ धरू धावे, वीज चटकन लवे गडगडाट करी दारुण - ५ लागून कळिकेच्या अंगा, वायू घाली धांगडधिंगा विसरुनी जगाचे जगपण - ६ सृष्टि सांगे खुणा, आम्हां मुखस्तंभ राणा मुळी आवडेना! रे आवडेना!! - ७ चल ये रे ये रे गडय़ा,नाचूं उडूं घालूं फुगडय़ा खेळू झिम्मा झिम्- पोरी झिम्- पोरी झिम्! ८ हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण उणे करूं आपण दोघेजण - ९ जन विषयाचे किडे, यांची धाव बाह्य़ाकडे आपण करूं शुद्ध रसपान - १० ‘दिठी दीठ’ जातां मिळून, गात्रे गेली पांगळून अंगी रोमांच आले थरथरून - ११ चाफा फुली आला फुलून तेजी दिशा गेल्या आटून कोण मी- चाफा! कोठे दोघेजण? - १२ --कवी बी
Start a discussion about नारायण मुरलीधर गुप्ते
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve नारायण मुरलीधर गुप्ते.