ग्रंथाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रंथाली ही पुस्तक प्रकाशन संस्था अशोक जैन आणि दिनकर गांगल यांनी इ.स. १९७४मध्ये स्थापन केली. स्थापनकर्त्या १४ सदस्यांच्या प्रत्येकी २५ रुपये भांडवलावर ही संस्था सुरू झाली. ही संस्था सुरुवातीला स्वयंसेवक चालवीत.

दुर्गा भागवतांचा डूब हा ललितनिबंध संग्रह हे ग्रंथालीने प्रकाशित केलेले पहिले पुस्तक होते. ते पुस्तक ना नफाना तोटा या तत्त्वावर विकले गेले. १९७८मध्ये ग्रंथालीने दया पवार यांचे बलुतं नावाचे आत्मचरित्र प्रकाशित केले. या पुस्तकाने महाराष्ट्रात खळबळ माजली. ग्रंथालीने ४० वर्षांत ४००हून अधिक पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. त्यांपैकी १३०हून अधिक पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत.

ग्रंथाली ही वाचकांची चळवळ समजली जाते. तिची पुस्तके सदस्यांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत दिली जातात. ही संस्था रुची नावाचे एक मासिक प्रकाशित करते. दिनकर गांगल यांनी या मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. एस.टी. समाचार हे ग्रंथालीचे एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशन आहे.

'ग्रंथाली' कार्यालय मुंबईत ग्रॅंट रोड भागातील एका महापालिका शाळेच्या इमारतीत होते. परंतु शिक्षणाशिवाय इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांच्या महापालिका शाळांमधील जागा परत घेण्याचा आदेश हायकोर्टाने दिला, त्यानुसार ग्रंथालीच्या माटुंगा येथील वुलन मिल म्युनिसिपल स्कूलमध्ये असलेल्या कार्यालयाला एक दिवसाच्या नोटिसीनंतर, ९ मार्च २०१६ रोजी सील ठोकण्यात आले.