गोल घुमट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विजापूर येथिल गोल घुमट


गोल घुमट
विजापूर येथिल गोल घुमट
स्थान विजापूर, कर्नाटक, भारत
उंची १६.९६ मी.
निर्मिती इ.स. १६२६ ते इ.स. १६५६
वास्तुविशारद सुलतान मुहम्मद आदिलशाह
वास्तुशैली वास्तु
प्रकार मुस्लिम स्थापत्यशैली
देश भारत
खंड आशिया

गोलघुमट भारतातील कर्नाटक राज्याच्या विजापूर शहरातील वास्तू आहे. याचे स्थापत्य अशा कौशल्याने केले गेलेले आहे की येथील कक्षिकेतील ध्वनी सात वेळा प्रतिध्वनित होतो.

याचे बांधकाम १६२६ ते १६५६ असे तीस वर्षे चाललेले होते. याच्या आत महम्मद आदिलशाहचे थडगे आहे.

गोलघुमट

विजापूरचा सुलतान मुहम्मद आदिलशाह (१६२६–५६) याने विजापूर या राजधानीच्या ठिकाणी बांधलेली कबर ‘गोलघुमट’(गुंबद) या नावाने ओळखली जाते. या घुमटामध्ये उच्चारित आवाजाचे प्रतिध्वनी साधारणपणे दहा-बारा वेळा स्पष्टपणे ऐकू येतात; म्हणून त्यास बोलणारा घुमट या अर्थाने ‘बोलघुमट’ असेही म्हणतात. मुहम्मद आदिलशाहने आपल्या कबरीसाठी प्रारंभी इब्राहिम रोझा (सु.१६२६) या पूर्वकालीन कबरीचा आदर्श पुढे ठेवला होता; तथापि इब्राहिम रोझाचे वास्तुरूप अतिशय परिणत असल्याने, त्या प्रकारात अधिक सरस वास्तुनिर्मिती करणे अशक्य होते; म्हणून त्याने वास्तुदृष्ट्या सर्वस्वी आगळा व भव्य असा हा घुमट उभारला.

या घुमटाच्या आखणीनकाशामध्ये (लेआउट प्लॅन) नगारखान्याने युक्त प्रवेशद्वार, मशीद, अतिथिगृह, कबर अशा इमारतींचा अंतर्भाव होता; तथापि प्रत्यक्ष रचना पूर्णपणे ह्या आखणीनकाशाप्रमाणे करण्यात आली

नाही. गोलघुमटाच्या इमारतीचा आराखडा चौकोनी असून आतले क्षेत्रफळ १,७०३·५ चौ.मी. आहे. त्याच्या प्रत्येक बाजूंची रुंदी ही वास्तूच्या एकूण घुमटासहित उंचीइतकीच, म्हणजे ६०·९६ मी. आहे. तळघरात मूळ कबर असून, तिच्या जोत्याच्या पातळीवर, तिच्याच अनुसंधानाने उपासनेसाठी दुसरी कबर बांधली आहे. कबरीच्या पश्चिमेकडील भिंतीमध्ये एक अर्ध-अष्टकोनाकृती महिरप योजली असून, तिच्यायोगे मक्केकडे तोंड करून कुराणपठण करता येते. कबरीच्या चारही कोपऱ्यांवर आठ मजली अष्टकोनी मीनार आहेत. प्रत्येक मजला बाह्यांगी तीरांनी तोललेल्या छज्जांनी वेगळा दर्शविला आहे. मीनारांवर छोटे घुमटाकृती कळस आहेत. नक्षीदार असे चार मिनार आहेत.

कबरीवरील अर्धवर्तुळाकृती घुमटरचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक भिंतीचे प्रायः तीन भाग केले आहेत (चौकोनात अष्टकोन बसविल्यावर होणारे हे छेद आहेत). त्यांतील मध्यभागात भिंतीच्या रचनेतच भित्तिस्तंभ गुंफून त्यावरून बाजूच्या भिंतीवरील स्तंभावर तिरकस कमानी रचल्या आहेत. या गुंफणीमुळे घुमटनिर्मितीसाठी ताराकृती बैठक तयार झाली आहे. ही बैठक घुमटाच्या पायथ्यापासून साधारणपणे ३·६५ मी. पुढे येते व एक वर्तुळाकृती सज्जा तयार होतो. हा सज्जा जमिनीपासून सु. ३०·४८ मी. अंतरावर आहे. सज्जामध्ये येण्यासाठी भिंतीतून मार्ग काढले आहेत. या ठिकाणीच प्रतिध्वनींचा नादचमत्कार प्रत्ययास येतो [ कुजबुजणारे सज्जे]. गोलघुमटाच्या वास्तुशैलीवर विजयानगर वास्तुशैलीची अलंकरणदृष्ट्या छाप आहे. तसेच कमानरचनेवर पर्शियन वास्तुशैलीचा प्रभाव आहे.

घुमटाचा बाह्य व्यास ४३·८९ मी. आहे. तो पायथ्याशी ३·०४ मी. रुंद असून, शिरोभागी २·७४ मी. जाड आहे. या घुमटाने आच्छादलेले एकूण क्षेत्रफळ (सु. १,७०३·५० चौ.मी.) रोमच्या पॅंथीऑन या जगातील सर्वांत मोठ्या मानलेल्या घुमटाने आच्छादलेल्या क्षेत्रफळापेक्षाही (सु.१४७०·८८ चौ.मी.) मोठे आहे. या घुमटाच्या पायथ्याशी उजेडासाठी सहा झरोके आहेत. घुमटाचा उगम एकत्र गुंफलेल्या कमलदलांच्या अलंकरणपट्टातून झाल्याचे दर्शविले आहे. घुमट क्षितिजसमांतर वीटरचनेवर असून, त्यास आतून व बाहेरून चुन्याचा गिलावा आहे.

कबरीच्या दर्शनी भागावर आतील भिंतींमध्ये समावलेल्या स्तंभरचनेचा परिणाम आहे. या स्तंभांनी पाडलेले भाग कमानीच्या आकारांनी सुशोभित केले आहेत. साध्या व भव्य वास्तुरचनेचे गोलघुमट हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.