Jump to content

गोदावरीच्या उपनद्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोकणात किंवा सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरून वाहणाऱ्या गोदावरी-तापीच्या उपनद्यांत चोंदी, कावेरी, सासू किंवा तान, मान किंवा बामती, नार, पार, बारीक, दमणगंगा, वाल, वैतरणा व भीमा या प्रमुख नद्या आहेत. त्यांपैकी काही नद्या जिल्ह्यांच्या किंवा राज्याच्या सीमेवरून काही अंतर वाहतात. त्या तीव्र उताराच्या आणि बऱ्याच लहान आहेत. वैतरणा नदीने दारणेच्या खोऱ्यात नदी अपहरण केले असल्याची शक्यता आहे.

तापीच्या खोऱ्यातून ईशान्य दिशेस वाहणाऱ्या नद्यांत गिरणा व बोरी या नद्या प्रमुख आहेत व त्या स्वतंत्रपणे तापीस मिळतात. गिरणा नदी सह्याद्रीमध्ये हातगडपासून ८ किमी. नैर्ऋत्येस, चेराई गावाच्या दक्षिणेस उगम पावते व कळवण, सटाणा व मालेगाव तालुक्यांतून वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यात शिरते.

नाशिक जिल्ह्यात गिरणेस तांबडी, पुनंद, आराम, मोसम व पांझण या प्रमुख उपनद्या मिळतात. मन्याड ही गिरणेची उपनदी या जिल्ह्यात उगम पावते आणि गिरणेस जळगाव जिल्ह्यात मिळते. पांझण आणि मन्याड या खोल, अरुंद दऱ्यांतून व उंच दरडींमधून वाहत असल्यामुळे जलसिंचनास फारशा उपयुक्त नाहीत; परंतु गिरणा व तिच्या बाकीच्या उपनद्या मात्र त्या दृष्टीने चांगल्या उपयोगी पडतात. या जिल्ह्यात गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वांत मोठी नदी, नाशिकपासून जवळच गंगाद्वार (त्र्यंबकेश्वर) येथे उगम पावते. तिला १४ कि. मी.वर किकवी मिळते.

काश्यपी (कास)–गोदावरी संगमापासून जवळच गंगापूर धरण बांधले आहे व तेथून दहा किमी. अंतरावर नाशिक शहर आहे. जलालपूरजवळ आळंदी नदी गोदावरीस मिळाल्यानंतर काही अंतरावर गोदावरी अरुंद, खडकाळ पात्रातून जाऊन सुमारे १० मी.खोल उडी घेते व तोच दूधस्थळी धबधबा होय. नाशिक शहरात प्रवेश करण्यापूर्वी ती सुमारे दोन मी.ची छोटीशी उडी घेते. तिच्या काठी अनेक देवळे असून पात्रात अनेक कुंडले बांधलेली आहेत. नाशिक व निफाड या दोन तालुक्यांतील गोदावरीचा ९६ किमी. प्रवाह या जिल्ह्यातून वाहतो.

दारणा ही गोदावरीची या जिल्ह्यातील प्रमुख उपनदी होय. ती इगतपुरीच्या आग्नेयेस १३ किमी.वर सह्याद्रीमध्ये उगम पावते. दारणेवर नांदगावजवळ धरण बांधण्यात आले आहे व त्यामुळे लेक बीले हा जलाशय निर्माण झाला आहे. दारणेस वाकी, उंदुलोह व वालदेवी या प्रमुख उपनद्या मिळतात व त्यांसह दारणा निफाड तालुक्यात गोदावरीस मिळते. या पूर्ववाहिनी नद्या बऱ्याच उथळ असून वर्षातून सहा ते आठ महिने कोरड्या असतात. दारणेशिवाय गोदावरीस या जिल्ह्यात देव, झाम, बाणगंगा, काडवा व गुई या प्रमुख नद्या मिळतात. गोदावरी व तिच्या उपनद्या यांचा जिल्ह्याला सिंचनाच्या दृष्टीने बराच उपयोग होतो.