गुन्हेगारी तपास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुन्हातपासणी एखादा दंडार्ह गुन्हा प्रत्यक्ष घडलेला असून तो अमुक एका व्यक्तीने केलेला आहे, हे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात ग्राह्य ठरेल असा पुरावा जमा करणे, म्हणजेच गुन्ह्याचा तपास होय. दंडार्ह गुन्हे दोन प्रकारचे असतात : फिर्यादीच्या तक्रारीवरून वा नुसती कुणकुण लागल्यावरून ज्याचा शोध पोलिस अधिकारी स्वतःच करू शकतात, त्या गुन्ह्यांना दखली किंवा पोलिस कक्षेतील गुन्हे म्हणतात. ज्या गुन्ह्यांसाठी साधारणपणे सहा महिने वा त्यांहून अधिक सक्तमजुरीची सजा असते, असे भारताच्या फौजदारी व इतर कायद्यांत नमूद केलेले गुन्हे पोलीस कक्षेत येतात. इतर कित्येक गुन्ह्यांचा तपास दंडाधिकाऱ्याच्या हुकुमावाचून पोलिसांना करता येत नाही. विवक्षित गुन्हे पोलिस कक्षेत पडतात की नाही, हे निरनिराळ्या फौजदारी कायद्यांत स्पष्ट केलेले असते.

फिर्यादीने तक्रार केल्याविना गुन्ह्याचा तपास करू नये, असा नियम प्राचीन काळी भारतात होता पण चाणक्याने तो बदलून काही लोकांनी –उदा., ब्राह्मण, तपस्वी, वृद्ध, रोगी, स्त्रिया, मुले व अनाथ माणसे– फिर्याद केली नसली, तरीही पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करावा अशी आज्ञा दिली. गेल्या शतकापर्यंत पाश्चात्य राष्ट्रांत देखील फिर्यादीची तक्रार आल्यावाचून पोलिसांना गुन्ह्याचा तपास करता येत नसे.

गुन्ह्याची तपासणी म्हणजे न्यायालयात ग्राह्य ठरेल असा पुरावा गोळा करणे. कोणत्या प्रकारचा पुरावा न्यायालयाने ग्राह्य मानावा, याविषयी निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या काळी भिन्न भिन्न प्रथा रूढ होत्या. गुन्हा घडतानाच तो डोळ्यांनी पाहिलेले चार साक्षीदार मिळाल्यास गुन्हा घडला व तो विवक्षित व्यक्तीने केला असे मानावे, असा कायदा मध्ययुगीन इस्लामी राजवटीत असे. अर्थातच असे साक्षीदार मिळवणे, हाच त्या काळी गुन्ह्याच्या तपासाचा मुख्य उद्देश असे. ज्या देशात ब्रिटिश धर्तीवरची न्याययंत्रणा आहे, तेथे पोलिसांना फार मोठ्या प्रमाणावर पुरावा गोळा करावा लागतो. कारण आपण गुन्हा केलेला नाही, हे सिद्ध करण्याचे दायित्व आरोपीवर नसतेच. फिर्यादी पक्षाचा पुरावा वादातीत नसल्यामुळे आपण गुन्हा केल्याचे निःसंदेह सिद्ध झालेले नाही एवढेच आरोपीने निदर्शनास आणले, तरी त्याच्यावरील गुन्ह्याचा आरोप नाशाबीत ठरतो. आरोपी स्वतःच साक्षीदार म्हणून जबानी देण्यास पुढे आल्याखेरीज, फिर्यादी पक्षाला न्यायालयात आरोपीची उलटतपासणीही करता येत नाही. कोर्टाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतानाही खरी माहिती देण्याचे किंवा स्वतःचा गुन्ह्यांशी संबंध असल्याचे दर्शविणारी कोणत्याही स्वरूपाची कबुली देण्याचे बंधनही आरोपीवर नसते. भारतासारख्या देशात तर आरोपीने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला असला, तरी त्याचा लेखी कबुलीजबाबही पुराव्यात ग्राह्य मानता येत नाही. उलट आधुनिक पाश्चात्य राष्ट्रांतील न्यायालयेदेखील आरोपीने पोलिसांपुढे दिलेला कबुलीजबाब पुरावा म्हणून ग्राह्य मानतात. फ्रान्ससारख्या काही देशात तर आपण गुन्हा केलेला नाही, हे सिद्ध करण्याचे दायित्व आरोपीवरही असते. भारतात मात्र गुन्हातपासणीच्या कामात स्वतंत्र पुरावा गोळा करण्यावरच अधिक भर द्यावा लागतो.

कौटिल्याच्या वेळी आरोपीला साक्षीदारांसमक्षच प्रश्न विचारून गुन्ह्याची शहानिशा करून घेता येई. आता भारतात तसे चालत नाही. आरोपीने मागणी केल्यास पोलिसांच्या तपासाच्या कोणत्याही अवस्थेत त्याला केव्हाही वकिलाचा सल्ला घेता येतो. पुरातन काळी गुन्ह्याची कबुली मिळविण्यासाठी संशयिताला मारहाण करण्याचा मार्ग राजमान्य झालेला होता पण आज मारहाण केल्याचे आढळून आल्यास उलट ती करणाऱ्या पोलिसालाच शिक्षा भोगावी लागते. तसेच आरोपीला पकडल्यानंतर फक्त चोवीसच तास पोलिस त्याच्याजवळ पूसतपास करू शकतात. त्यानंतरही पोलिसांना आरोपी पोलिसांच्या कैदेत रहावयास हवा असल्यास त्याला दंडाधिकाऱ्यापुढे हजर करून अधिक काळ पोलिस कैदेत ठेवण्याची मागणी मंजूर करून घ्यावी लागते. असल्या नानाविध तरतुदींपायी आज प्रत्यक्ष संशयिताजवळ पूसतपास करण्याचे महत्त्व भारतात तरी खूपच कमी झाले आहे. पुराव्याच्या कायद्यांचा गुन्ह्याच्या तपासणीवर मौलिक स्वरूपाचा परिणाम कसा होत असतो, याची साक्ष यावरून पटेल.

गुन्ह्याच्या तपासणीचे तीन प्रमुख भाग असतात : (१) गुन्हा घडला आहे की नाही याची खात्री करून घेणे. (२) तो घडला असेल, तर तो कोणी केला याचा शोध करणे. (३) न्यायालयात ग्राह्य ठरेल, अशा प्रकारचा पुरावा गोळा करणे. यासाठी तपासणी अधिकारी सर्वसाधारण शिक्षण, पोलिस कामगिरीचे प्रशिक्षण आणि अनुभव या तीनही गोष्टींत तरबेज असावा लागतो. गुन्हातपासणी हे शास्त्र आहे तशीच ती एक कलाही आहे.

हे शास्त्र पुरातन काळापासून विकास पावत आलेले आहे. कौटिल्य, तिरुवळ्ळुवर, करणीसुत इ. पंडितांनी गुन्ह्यांची वर्गवारी करून ते ओळखता यावे, म्हणून त्यांचे विस्तृत विवरणही केलेले आहे. शिलप्पधिकारम् या तमिळ ग्रंथातही चोरी, अपहार इ. गुन्ह्यांविषयी माहिती आढळते. करणीसुताच्या ग्रंथाचे तर नावच मुळी स्तेयशास्त्र असे आहे. चाणक्याने चोरी, अफरातफर यांसारख्या ठोकळ गुन्ह्यांचे विवरण करून शिवाय संशयास्पद मृत्यू, विषबाधा इ. कसे ओळखून काढावे, याचीही सविस्तर माहिती दिली आहे. गुन्ह्याच्या स्थळाचे सूक्ष्म निरीक्षण कसे करावे, साक्षीदारांचा शोध करून त्यांच्याजवळ पूसतपास कशी करावी, यांविषयी चाणक्याने देऊन ठेवलेल्या सूचना आजही उपयुक्त ठरतात. कित्येक संशयित केवळ भीतीने वा अन्य काही कारणांनी कबुलीजबाब देऊन मोकळे होतात. त्यांच्याबाबत कशा प्रकारची सावधगिरी बाळगायला हवी, याचे चाणक्याने केलेले विवेचन म्हणजे त्याच्या विद्वत्तेचा व प्रगाढ अनुभवाचा रोकडा दाखलाच होय. गुन्ह्याविषयी माहिती मिळविण्यासाठी गुप्तचरांचा उपयोग कसा करून घ्यावा, याचेही सविस्तर विवेचन भारतीय ग्रंथांत केलेले आढळते.

परिस्थितीजन्य पुराव्याच्या एका अंगाच्या दिशेने भारतीयांनी फारच मोठी प्रगती साधलेली होती. गावात चोरी झाल्यावर चोरांचा पत्ता न लागल्यास खेडेगावातील पोलीस पाटील आणि इतर कामदार यांना नुकसानीची भरपाई करून द्यावी लागे. पण चोर बाहेरून आल्याचे सिद्ध करता आले तर मात्र ते ज्या गावाहून आलेले असतील तिथल्याच पोलिसांना चोरीचा शोध लावावा लागे किंवा नुकसानभरपाई द्यावी लागे. त्यामुळे चोरी झाली, तर गावकामदार लागलीच चोर कुठून आले व कोणीकडून पळून गेले हे पहाण्यासाठी त्यांच्या पावलांचा माग काढण्याचा प्रयत्न करू लागत. माग काढण्याच्या या तंत्रात ते इतके निष्णात झालेले असत, की सामान्यांच्या दृष्टीला न दिसणाऱ्या वा दिसले तरी ओळखता न येण्याजोग्या पावलांच्या ठशांवरूनही ते खूप दूरपर्यंत माग काढू शकत. या निष्णात मागाऱ्यांची मोलाची मदत भारतातील बहुतेक सर्व पोलिस-दलांना अगदी परवापरवापर्यंत होत असे. चोराच्या अथवा अन्य गुन्हेगाराच्या शरीराच्या वासावरून माग काढण्यासाठी कुत्र्यांचा उपयोग केला जाऊ लागल्यापासून मात्र मागाऱ्यांचे महत्त्व ओसरले आहे.

परिस्थितीजन्य पुराव्याचे महत्त्व मात्र वाढतच चालले आहे. गेल्या शतकापासून आरोपीचा, विशेषतः पोलीस अधिकाऱ्यांपुढे दिलेला, कबुलीजबाब पुरावा म्हणून ग्राह्य मानला जात नाही. आजकाल भारतीय न्यायालये साक्षीदारांनी सादर केलेल्या पुराव्यावरही तितकासा विश्वास ठेवण्यास तयार नसतात. त्यामुळे तर परिस्थितीजन्य पुरावा गोळा करणे, हेच गुन्ह्याच्या तपासाचे प्रमुख व अपरिहार्य अंग होऊन बसले आहे. गेल्या ५०–६० वर्षांत तपासणीच्या कार्याला वैज्ञानिक संशोधनानेही मोलाचा हात लावलेला आहे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.