Jump to content

कोष्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विणकर समाजाचा उदय - (कोष्टी, लाड, क्रोष्टी, गधेवाल, देशकर, साळेवार, स्वकुळ साळी, सुतसाळी व पद्मसाळी)

प्रत्येक व्यवसायाची जात बनणे हे भारतीय समाजाचे अव्यवच्छेदक लक्षण आहे. भारतातील विणकामाचा इतिहास पुरातन असला तरी तो स्त्रियांकरवी जवळपास घरोघरी चालवला जात होता. सिंधु काळातच भारताचा विदेश व्यापार सुरू झाला. इजिप्तमधील ममींना गुंडाळलेल्या जात असलेल्या वस्त्रांत भारतीय कापसाचीही वस्त्रे मिळाली आहेत. याचाच अर्थ असा कि सनपुर्व ३२०० पासुनच भारतीय सुती वस्त्रे जगभर पसरु लागली होती. मागणी वाढली तसे विविध मानवी समुदायांतील कुशल लोक या व्यवसायात उतरु लागले. हातमागांचा शोध लावला. सुत कातणे हे काम स्त्रीयांकडे राहिले तर वस्त्रे विणने आता पुरुष करु लागले. अशा रितीने देशभर हा व्यवसाय फोफावला. विणकरांना प्रांतनिहाय व विणण्यातील वेगवेगळी कौशल्ये यानुसार वेगवेगळी नांवे मिळाल्याचे आपल्याला दिसते. जैन कोष्टी व मुस्लिम वीणकर (मोमिन, व अन्सारी) वगळले तर या सर्वच समाजातील समान धागा म्हणजे ते शैव आहेत. चौंडेश्वरी (चामुंडेश्वरी) जिव्हेश्वर, गणपती अशा शैव दैवता त्यांची आराध्ये आहेत. लिंगायत समाजातही कोष्टी आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने देवांग कोष्टी, लाड, क्रोष्टी, गधेवाल, देशकर, साळेवार, स्वकुळ साळी, सुतसाळी व पद्मसाळी अशा जवळपास पंधरा पोटजाती आहेत. वरकरणी या विविध जाती पडलेल्या दिसत असल्या तरी त्या एकाच मुळच्या समाजातुन व्यवसाय कौशल्यातील भिन्नतेमुळे निर्माण झाल्या आहेत एवढेच. उदाहरणार्थ "कोष्टी" हे जातीनाम कोसा अथवा कोष (रेशीम अथवा कापसाचा) यापासून वस्त्रे बनवणा-यांना लाभले. साळी (अथवा शाली/शालीय) हा शब्द शाल (साल) वृक्षाच्या सालीपासून पुरातन काळी वस्त्रे बनवत त्यांना मिळाला. त्यात पुन्हा वस्त्रांचे अनेक प्रकार असल्याने ज्या-ज्या प्रकारची वस्त्रे बनवण्यात निपुणता होती त्यानुसार त्या त्या वर्गाला विशेषनामेही मिळाली. उदा. देव व उच्चभ्रु लोकांसाठी वस्त्रे बनवत त्यांना देवांग (अथवा देवांगन) कोष्टी म्हणले जावू लागले. काही नांवे, उदा. हलबा कोष्टी ही जात नाही.ती मूळ हलबा हल्बी आदिवासी जमात आहे. त्यांची उत्पत्ती ही छत्तीगडमधील बस्तर मधून झाली आहे. व्यवसायाचा उद्देशाने या जमातींनी मोठ्या प्रमाणात विदर्भात तसेच महाराष्ट्रातील इतर भागात आणि गुजरात मध्यप्रदेश या राज्यात स्थायिक झाले वसती प्रामुख्याने विदर्भात आहे. कोष्टी/साळी/कोरी समाज देशभर पसरला असुन या समाजाने आपली मुळे उत्तरकाळात कधी ब्राह्मण तर कधी क्षत्रियांशी भिडवली असली तरी वैदिक वर्णव्यवस्थेने मात्र त्यांना शुद्रच मानले आहे. तेराव्या शतकानंतर निर्माण झालेल्या अन्याय्य बलुतेदारी पद्धतीत बारा बलुतेदारांत त्यांचा समावेश केला गेलेला आहे. महाराष्ट्र शासनाने २००८ पासून त्यांचा समावेश स्पेशल ब्यकवर्ड क्लासमद्धे केलेला आहे.