कोण म्हणतो टक्का दिला?

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोण म्हणतो टक्का दिला? (नाटक) या पानावरून पुनर्निर्देशित)

कोण म्हणतो टक्का दिला? हे संजय पवार यांनी लिहिलेले एक नाटक आहे.

कथानक[संपादन]

आरक्षणाच्या सवलतींना पन्नास वर्षे झाल्यानंतर केंद्र सरकारने असा अध्यादेश काढला आहे की सवलतींमुळे समाज वर्णवर्गविरहित झाला असला तरी अजूनही एकात्मता साधली जाण्यासाठी प्रत्येक उच्चवर्णीय कुटुंबात एक मागासवर्गीय पुरुष अथवा स्त्री ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. या आदेशाचे पालन करणे आराध्ये कुटुंबालाही भाग पडते आणि त्यांच्या घरात कचऱ्या धीवार हा तरुण येतो. हा तरुण म्हणजे पुराणकथेतल्या देवयानीने ’तू विसाव्या शतकाच्या अखेरीस भूतलावर मागासवर्गात जन्म घेशील आणि कायद्याने तुला सवर्णात जन्म घ्यायला लागेल’ असा शाप दिलेला कच असतो.

त्यानंतर त्या घरात जे काही काही घडते ते या नाटकाच्या रूपाने लेखक संजय पवार यांनी प्रेक्षकांसमोर मांडले आहे.

एक कचऱ्या सोडला तर नाटकातील सर्व पात्रे उच्चवर्णीय आहेत आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. यात कचऱ्याचा दगडाचा देव आपल्या देव्हाऱ्यात मांडायला विरोध करणाऱ्या मिसेस आराध्ये आहेत. तुमच्या वरच्या अन्यायाचे पाढे आणखी किती काळ वाचत राहणार असा सवाल कचऱ्याला करणारा, वेगवेगळ्या संस्कृतीनिष्ठ मुद्द्यांवर त्याच्याशी हुज्जत घालणारा त्यांचा मुलगा सुदर्शन आहे. आपल्या घरात आणलेल्या आदिवासी पोराकडे ॲंटिक पीस म्हणून बघणाऱ्या शेजारच्या घरातल्या मिसेस नाडकर्णी आहेत आणि त्याचवेळी संपूर्ण रॅशनल भूमिका स्वीकारून कचऱ्याच्या घरातल्या अस्तित्वाकडे बघणारे कमलाकर आराध्ये आणि त्यांची मुलगी सुकन्या हेही आहेत. या निमित्ताने वेगवेगळ्या आवरणाखाली आपल्या मनातली जातीयता लपवण्याचा प्रयत्‍न प्रत्येकजण कसा करत राहतो हे दिसते.

कोणी जोशी कुटुंब कुणा मागासवर्गीय माणसाला घरात आणावे लागू नये म्हणून आपण कुडमुडे जोशी असल्याचे सरकारला कळवते, तर मिसेस आराध्ये मागासवर्गीयांची यादी बघायला जाणाऱ्या सुकन्याला यादीतून पुरस्कारप्राप्त दलित लेखकाचा मुलगा निवडायला सांगते. पण ती कचऱ्याला निवडते.

नाटकाचे वैशिष्ट्य[संपादन]

संजय पवारांचा थेटपणा व्यक्त करणारे तिखट संवाद हे या नाटकाचे बलस्थान आहे.[ दुजोरा हवा]

नाटकाच्या सुरुवातीच्या प्रयोगांत उपेंद्र लिमये या नटाने कचऱ्याची भूमिका केली होती.