Jump to content

कोकम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोकमाची फळे
रातांब्याची फळे

कोकम किंवा रातांबा (गार्सिनिया इंडिका) हा मँगोस्टीन कुलातील वृक्ष आहे. [] याला भिरंड असेही म्हणतात. या वृक्षाची फळे आहारात, औषधांमध्ये तसेच उद्योगांमध्ये वापरली जातात. कोकम भारतीय भाषांमध्ये खालील वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते -

  • संस्कृत-अत्यम्ला, तिंतिडीकम्‌
  • हिंदी-कोकम
  • बंगाली-महादा, तेंतुल
  • कानडी-मुलगला
  • गुजराती-कोकम
  • मल्याळम-पुनमचुली
  • इंग्रजी-Kokam Butter tree/Wild Mangostein
  • लॅटिन-Garcinia Indica

वर्णन

[संपादन]

हा एक सुमारे १८ मीटरपर्यंत उंच होणारा व झुकलेल्या फांद्यांचा वृक्ष असतो. याची पाने २.५ ते ३.५ इंच लांब व गडद हिरव्या रंगाची असतात. कोकमाची फुले लहान असतात. एकाच झाडावर नर आणि मादी फुले तयार होतात. उन्हाळ्यात या वृक्षाला फळधारणा होते. कच्ची फळे हिरव्या रंगाची असतात. एप्रिल-मे महिन्यात फळे पिकतात. ती पिकल्यावर गडद लाल रंगाची होतात. फळाच्या आत पांढरट, गुलाबी बिया आणि मऊ, गोड गर असतो.[]

लाल तोंडाची माकड, वानरे, खारी, वाटवाघळे कोकमाच्या फळांवर ताव मारतात. फळे लिंबापेक्षा थोड्या मोठ्या आकाराची असतात. फळाची ताजी साल रसदार आणि आम्लधर्मी असते.[]

लागवडीचे प्रदेेश

[संपादन]

कोकम वृक्ष भारतातील पश्चिम घाटातील स्थानिक वृक्ष आहे. हा वृक्ष भारतात महाराष्ट्रातील कोकण, गोवा, कर्नाटक येथे आढळतो.[] भारतात याच्या ३५ जाती आढळतात, त्यापैकी १७ जाती प्रदेशनिष्ठ आहेत. रत्‍नागिरी जिल्ह्यातील कोकमाला जीआय मानांकन मिळाले आहे. []

उपयोग

[संपादन]

आयुर्वेदानुसार - कोकम पित्तनाशक आहे. अर्श, शूल, उदरकृमी, अरुची, पित्त इ. रोगांत. त्याचा वापर करतात. कोकमाच्या बियांपासून तेलही निघते. ते व्रणरोपक व तळपायांच्या भेगांवर उपयोगी आहे.

कोकमापासून केले जाणारे पदार्थ - कोकमाची साल मिठाच्या पाण्यात बुडवून उन्हात वाळवली जाते. त्यानंतर त्याला आमसूल असे म्हणतात. आमसुलाचा वापर स्वयंपाकात आंबटपणासाठी केला जातो. आमटी, माशाचे कालवण इत्यादी पदार्थात ते वापरले जाते.

कोकमाच्या सालीत साखर भरून ठेवली जाते. त्यामुळे सुटणाऱ्या रसापासून कोकम सरबत तयार करतात. कोकमाच्या सालीमध्ये मीठ भरून ठेवल्यास सुटलेल्या रसाला आगळ असे म्हणतात, त्याचा वापर सोलकढी करण्यासाठी केला जातो. कोकमच्या बियामध्ये 23-26% कोकम लोणी असते, जे खोलीच्या तापमानावर घनरूप राहते. हे चॉकलेट तयार करण्यासाठी वापरले जाते.[]

कोकमावर प्रक्रिया करून विविध पदार्थ बनवणे हा कोकणातील एक मोठा उद्योग आहे.[]

चित्रदालन

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Janick, Jules; Paull, Robert E. (2008). The Encyclopedia of Fruit and Nuts (इंग्रजी भाषेत). CABI. ISBN 978-0-85199-638-7.
  2. ^ Asinelli, Marta Eglaé Camargo; Souza, Maria Conceição de; Mourão, Káthia Socorro Mathias (2011-03). "Fruit ontogeny of Garcinia gardneriana (Planch. & Triana) Zappi (Clusiaceae)". Acta Botanica Brasilica (इंग्रजी भाषेत). 25 (1): 43–52. doi:10.1590/S0102-33062011000100007. ISSN 0102-3306. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ a b https://www.ias.ac.in/article/fulltext/reso/001/01/0086-0089
  4. ^ "महाराष्ट्राला सर्वाधिक जीआय टॅग मिळवून देणारा हा पक्का पुणेकर..." झी २४ तास. 2018-05-01. 2020-06-07 रोजी पाहिले.
  5. ^ Kanes K. Rajah (2002). Fats in Food Technology. CRC Press. p. 167. ISBN 978-0-8493-9784-4.
  6. ^ "काजू, आंबा, कोकम प्रक्रिया उद्योगाची यशस्वी वाटचाल". Agrowon - Agriculture Marathi Newspaper. 2020-06-07 रोजी पाहिले.