कॅप्टन लक्ष्मी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लक्ष्मी सहगल

लक्ष्मी एस. स्वामीनाथन ऊर्फ लक्ष्मी सहगल (२४ ऑक्टोबर, इ.स. १९१४- २३ जुलै, इ.स. २०१२) या पेशाने डॉक्टर होत्या. १९४३ साली त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या कर्नल म्हणून जबाबदारी सांभाळली. लक्ष्मी सहगल या कॅप्टन लक्ष्मी या नावाने ओळखल्या जातात..

मद्रास उच्च न्यायालयामध्ये फौजदारी कायदा करणारे वकील एस. स्वामिनाथन हे त्यांचे वडील होत. लक्ष्मी यांनी १९३८ साली मद्रास मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली. एक वर्षानंतर त्यांना स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रात पदविका मिळाली. चेन्नई येथे असलेल्या कस्तुरबा गांधी हॉस्पिटलमध्ये त्यांनी डॉक्टर म्हणून काम केले.

कॅप्टन लक्ष्मी या आझाद हिंद सेनेच्याच्या झाशी राणी पथकाच्या प्रमुख कॅप्टन होत्या. १९४३ ऑक्टोबर मध्ये यांना सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या महिला पथकाचे प्रमुख पद देण्यात आले. या पथकात त्या वेळी १८५ स्त्री सैनिक होत्या. हा आकडा नंतर २ हजारवर पोचला. पिस्तूल, बंदूक, मशीनगन्स यासारखी शस्त्रे वापरण्याचे शिक्षण या स्त्रियांना दिले जाई. प्रारंभी या स्त्रियांना शुश्रूषा पथकात काम करण्याची संधी दिली जात असे. पण नंतर लक्ष्मी यांच्या विनंतीवरून सुभाष बाबू यांनी महिलांच्या दोन पथकांना आघाडीवर जाण्यास संधी दिली आणि हिंदुस्थान आणि ब्रह्मदेश यांच्या आघाडीवर झालेल्या युद्धात या स्त्रियांनी विजय मिळविला. नंतर आझाद हिंद सेना माघार घेत असता यांच्या फौजेने निकराचा लढा दिला आणि सुभाषबाबू यांना निसटून जाण्याची संधी दिली व मगच त्या ब्रिटिशांना स्वाधीन झाल्या. युद्धाच्या अखेरीला त्या जखमी सैनिकांची सेवा करीत होत्या त्यामुळे त्यांच्यावर खटला न भरता त्यांना सोडून देण्यात आले.[१]

त्यानंतर बांगला देशात वैद्यकीय सुविधा आणि बचाव कार्यातही लक्ष्मी सहगल यांचा सहभाग होता. १९४७ च्या मार्चमध्ये लाहोरच्या प्रेम कुमार यांच्याशी त्यांनी लग्न केले. विवाह झाल्यानंतर ते कानपूर येथे स्थायिक झाले.तिथे त्यांनी आपली वैद्यकीय प्रॅॅक्टिस चालू ठेवली आणि भारताच्या फाळणीनंतर मोठ्या संख्येने आलेल्या शरणार्थींना मदत केली.

सुभाषिनी अली आणि अनिसा पुरी या कॅप्टन लक्ष्मी यांच्या दोन मुली.

सेहगल यांनी सन १९७१ मध्ये कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. त्या भारतीय राज्यसभेच्या सदस्याही होत्या.

आझाद हिंद सेनेत काम करण्याबरोबरच वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात कॅप्टन सेहेगल यांनी भरीव कामगिरी केली.

हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने कॅप्टन लक्ष्मी यांना दि. १९ जुलै २०१२ रोजी कानपूर येथील मेडिकल सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. सोमवार दिनांक २३ जुलै २०१२ला सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

पुरस्कार[संपादन]

भारत सरकारने शासनाने सन १९९८ मधे पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते.

  1. ^ भारतवर्षीय अर्वाचीन चरित्र कोश - चित्राव सिद्धेश्वर शास्त्री