कॅपिटॉल बाँबस्फोट
चले जाव चळवळीच्या सुरुवातीलाच पुण्यातील कॅपिटॉल टॉकीजमध्ये संपूर्ण देश हादरवून सोडणारा बॉंबस्फोट झाला. हा स्फोट हरिभाऊ वामन लिमये आणि किसन वामन भातंब्रेकर यांची कामगिरी होती. २४ जानेवारी १९४३ रोजी हा स्फोट झाला. बाबुराव साळवी, बापू साळवी, एस.टी. कुलकर्णी, आणि शिरुभाऊ लिमये या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन इंग्रजांना हिसका दाखविण्यासाठी जोरदार धडाका करण्याचा निश्चय केला.
भास्कर कर्णिक या तरुणाने खडकी येथील दारुगोळा कारखान्यातून आणलेल्या बॉंबचे टाईम बॉंबमध्ये रूपांतर करताना बापू डोंगरे आणि निळूभाऊ लिमये जखमी झाले होते. शिरुभाऊ लिमये, रामसिंग परदेशी, हरिभाऊ लिमये आणि दत्ता जोशी त्यांच्या मदतीला धावले. हे सारे कार्यकर्ते त्यावेळी पुण्यातल्या कसबा पेठेतील तांबट हौदाजवळ रहात असलेल्या किसन वामन भातंब्रेकर यांच्या घरी एकत्र जमत असत. इंग्रजी सत्ता उलथवून टाकण्याविषयी या सर्वांमध्ये हिरिरीने चर्चा होत असे. भातंब्रेकर त्या चर्चेत सहभागी असत.
अवघ्या १६ वर्षांच्या वयात ब्रिटिशांच्या दडपशाहीला विरोध करण्यासाठी हरिभाऊ व त्यांच्याहून वयाने थोड्या मोठय़ा तरुणांनी पुणे शहरातल्या छावणी परिसरातील कॅपिटॉल, एम्पायर, वेस्टएन्ड या चित्रपटगृहांत बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यात ४ ब्रिटिश अधिकारी व कर्मचारी मारले गेले. पोलिसी हिसका दाखवूनही सहकारी पकडले जातील म्हणून हरिभाऊंनी आपल्या सहकाऱ्यांची नावे गुप्त ठेवली. त्यांच्यावर भरलेल्या खटल्यात त्यांना चार वर्षांचा तुरुंगवास झाला.