Jump to content

कृत्रिम गर्भधारणा तंत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सहाय्यक प्रजननी तंत्रज्ञान किंवा कृत्रिम गर्भधारणा तंत्र म्हणजे पूर्णतः कृत्रिम किंवा अंशतः कृत्रिम माध्यमे वापरून गर्भधारणा साधण्याची पद्धत. हे तंत्रज्ञान मुख्यत्वे वंध्यत्वावरच्या उपचारांत वापरले जाते. प्रजननक्षम जोडप्यांमध्येही हे तंत्र काही खास जनुकीय कारणांसाठी वापरले जाते. काचनळीतील फलन, पेशीद्रव्यांतर्गत शुक्राणू अंतःक्षेपण ही सहाय्यक तंत्रांची काही उदाहरणे आहेत.

कृत्रिम गर्भधारणा म्हणजे शरीरबाहेर घडवून आणलेली गर्भधारणा. मूळ लॅटिन इनव्हिट्रो या शब्दाचा अर्थ “काचेच्या उपकरणामध्ये” असा आहे. कृत्रिम गर्भधारणा घडवून आणण्यासाठी शरीराबाहेर पेट्रिबशीमध्ये मानवी स्त्रीबीजांड आणि शुक्राणू यांचा संयोग करण्यात येतो. याला “टेस्टट्यूब बेबी” असेही म्हणतात. प्रत्यक्षात मुलाचा जन्म अथवा गर्भधारणा परीक्षानलिकेमध्ये (टेस्टट्यूबमध्ये) होत नाही.

ज्या जोडप्यांना विवाहानंतर प्रजनन अक्षमतेमुळे स्वतःचे मूल होत नाही. किंवा काहीं कारणाने वरचेवर स्त्रीचे गर्भपात होतात, अशा जोडप्यांना कृत्रिम गर्भधारणा तंत्राने स्वतःचे मूल होऊ शकते. अंडकोशामधील अंडांची संख्या कमी असणे, फॅलोपिवाहिनी बंद असणे, शुक्राणूंची संख्या अपुरी असणे, गर्भधारणा होणाऱ्या मातेचे वय अधिक असणे अशा विविध कारणांनी मूल होण्याची शक्यता नसलेल्या व्यक्तीसाठी कृत्रिम गर्भधारणा हा उपाय आहे.

१९७८साली जगात सर्वप्रथम ल्युसी ब्राउन या बालिकेचा जन्म कृत्रिम गर्भधारणा तंत्राने घडवून आणण्यात आला. हे तंत्र शोधून काढल्याबद्दल रॉबर्ट जी. एडवर्ड्‌स याना शरीरशास्त्र आणि वैद्यकशास्त्र (फिजिऑलॉजी आणि मेडिसिन) शाखेतील नोबेल पुरस्कार २०१० साली देण्यात आला. स्त्रीच्या नैसर्गिक प्रजननचक्रातून अंडाशयातील अंड शरीरातून बाहेर पेट्रिबशीत योग्य मिश्रणात ठेवून त्या पेट्रिबशीत शुक्राणू सोडण्यात आले. शरीराच्या तापमानास आणि कार्बनडाय ऑक्साइडच्या वातावरणात अंड्याचे फलन घडवून फलित अंड्याचे परत गर्भाशयामध्ये रोपण करणे एवढेच प्रारंभीच्या कृत्रिम गर्भधारणा तंत्रामध्ये होते. हा प्रकार चांगलाच वेळ खाणारा होता. नैसर्गिकपणे स्त्रीच्या शरीरात एका मासिक प्रजनन चक्रामध्ये एकच अंड उपलब्ध होत असल्याने एकदा अंड आणि शुक्राणूचे फलन झाले नाही तर दुसऱ्या महिन्याच्या चक्रामधून बीजांड उपलब्ध होईपर्यंत वाट पहावी लागत असे. आता कृत्रिम गर्भधारणा तंत्रामध्ये वेग आणि अचूकता आली आहे.

आधुनिक कृत्रिम गर्भधारणा उपचार पद्धतीमध्ये आता खालील बाबींचा समावेश होतो.

१. अंडाशयातून उत्तम गुणवत्तेची अंडी जीएनआरएच (गोनॅडोट्रॉपिन रिलीझिंग हारमोन)च्या प्रभावाखाली मिळवली जातात. त्याआधी अल्ट्रासाउंड चाचण्याद्वारे स्त्री प्रजनन चक्राचा पूर्ण अभ्यास केला जातो. एका क्रमबद्ध कार्यक्रमामध्ये अंडी केव्हा मिळवायची त्यांचे फलन केंव्हा करायचे आणि रोपण कसे करायचे याची आखणी केली जाते

२.. कृत्रिम गर्भधारणा करण्याआधी रक्ताच्या तपासण्या करून गर्भाशयाची प्रजनन चक्रातील स्थिति, एलएच (ल्युटिनायझिंग हारमोन) आणि एफएसएच (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हारमोन) या संप्रेरकांचे प्रमाण व ईस्ट्रोजेनची रक्तातील पातळी ठरवण्यात येते. अल्ट्रासाउंड चाचणीद्वारे गर्भाशय भित्तिकेची आणि अंडाशयाची पाहणी करून गर्भरोपणाची वेळ आणि दिवस ठरवण्यात येतो. स्त्रीमध्ये एच‍आयव्ही आणि हिपॅटायटिस सारखे संसर्ग झालेले नाहीत याची खात्री केल्याशिवाय उपचार करण्यात येत नाहीत.

३.. एकाहून अधिक अंडी उपलब्ध होण्यासाठी अंडाशय संप्रेरकांच्या सहाय्याने उत्तेजित करून एका वेळी सुमारे २० अंडी मिळवण्यात येतात.

४. अंडी मिळवण्यासाठी योनीद्वारे अल्ट्रासाउंड उपकरणातून अंडाशयाची पाहणी करून एका लांब पोकळ सुईमधून तयार अंडी परीक्षानलिकेमध्ये गोळा केली जातात. ही क्रिया स्थानिक भूल देऊन केली जाते. यास तीस मिनिटांचा वेळ लागतो. गोळा केलेली अंडी सूक्ष्मदर्शीखाली पूर्ण वाढ झाली असल्याची खात्री करून निर्जंतुक मिश्रणात शरीराच्या तपमानास उबवणयंत्रामध्ये (इनक्युबेटर) ठेवली जातात. याच वेळी पुरुषाचे वीर्य मिळवून फलनासाठी तयार केले जाते. शुक्राणू योग्य त्या मिश्रणामध्ये ठेवून त्यावरील पेशी प्रथिने स्वच्छ केली जातात.

५. अंडाशयातून मिळवलेली अंडी सुदृढ असल्याची खात्री करून तंत्रज्ञ योग्य वृद्धि आणि पोषण द्रवामध्ये अंड आणि शुक्राणूचे निषेचन सूक्ष्मअनुयोजन (मायक्रोमॅनिप्युलेशन) तंत्राने केले जाते. निषेचित फलित अंडी शरीराच्या तापमानास कार्बन डायऑक्साइड उबवणयंत्रात ठेवली जातात. १२ ते ४८ तासानंतर फलित अंडाचे दोन पेशीमध्ये विभाजन होते. ७२ तास उबवल्यानंतर बहुपेशीय गर्भ गर्भाशय रोपणासाठी तयार होतो. निरीक्षणानंतर उत्तम वाढ झालेले दोन गर्भ गर्भाशयात क्षेपित केले जातात.

६. कृत्रिम रीत्या बाह्य मदतीने केलेल्या या पद्धतीस ‘गर्भधारणा चक्र’ (प्रेग्ननसी सायकल) म्हणण्याची पद्धत आहे. प्रत्येक गर्भधारणा चक्रात गर्भधारणेची शक्यता ३०-३५% असते. गरजू जोडप्यास परवडेल अशा खर्चामध्ये आता कृत्रिम गर्भधारणा उपचार उपलब्ध आहेत. प्रत्यक्ष गर्भाशयात क्षेपित केलेल्या गर्भाशिवाय शिल्लक राहिलेले गर्भ अतिशीत तापमानास साठवून ठेवले जातात. दात्यांच्या परवानगीने ते गरजू दांपत्यांना उपलब्ध करून दिले जातात. अशा गर्भांवर दात्याचा कायदेशीर हक्क मान्य झाला आहे. असे गर्भ नष्ट करण्यासाठी दात्याच्या परवानगीची आवश्यकता आहे.

७. स्त्रीचे गर्भाशय गर्भधारणा करण्यास सक्षम नसल्यास दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात बाह्यफलित गर्भरोपण करून स्वतःचे मूल दुसऱ्या गर्भाशयात वाढवणे शक्य असते. या दुसऱ्या स्त्रीस भारितकुक्षीमाता (सरोगेट मदर) म्हणतात.

मूल होण्यास सक्षम असूनही स्त्रीला गर्भधारणा न होण्याची अनेक कारणे आहेत. अशा जोडप्यांना सहाय्यक प्रजनन तंत्राने संतति होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पहा: