की कन्सेप्टस इन फेमिनिस्ट थियरी अँड रिसर्च (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

की कन्सेप्टस इन फेमिनिस्ट थियरी अँड रिसर्च[१] हे क्रिस्टिना ह्यूस[२] लिखित पुस्तक २००२ मध्ये प्रकाशित झालेले असून स्त्रीवादी सिद्धांत आणि संशोधन यामध्ये आवश्यक असणाऱ्याु संकल्पनांना एकत्रितपणे वाचकांसमोर मांडते. स्त्रीयांचे प्रश्न हे स्त्रीवादी सिद्धांकनाच्या केंद्रस्थानी नेहमी असतात व त्या प्रश्नांना वैचारिक मांडणी देण्याचे काम हे पुस्तकामध्ये दिलेल्या समता, भिन्नत्व, अनुभव यांसारख्या महत्त्वाच्या संकल्पनांच्या माध्यमातून केले जाते.

प्रस्तावना[संपादन]

स्त्रीवादी सिद्धांकन आणि संशोधन यांना एकत्रितपणे मांडण्याचे महत्त्वाचे काम ख्रिस्टीना ह्युग्स यांनी त्यांच्या Key Concepts in Feminist Theory and Research या पुस्तकामध्ये केले आहे. स्त्रीवादी सिद्धांकनामध्ये अनेक महत्त्वाच्या संकल्पना वापरल्या जातात आणि स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून त्यांचे भिन्न असे अन्वयार्थ देखील लावले जातात. याच संकल्पनांचा स्त्रीवादी अभ्यास क्षेत्रामध्ये संशोधन करताना देखील वापर केला जातो. त्यामुळे सामाजिक शास्त्रांमध्ये नव्याने येणाऱ्या विद्यार्थी व संशोधक यांच्यासाठी स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून काही संकल्पनाचे अर्थ मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. ‘संकल्पनात्मक साक्षरता’ (Conceptual Literacy) साध्य करणे हा या पुस्तकाचा प्राथमिक हेतू असल्याचे लेखिका नमूद करतात कारण संकल्पनांचा अर्थ हा एकाच एक असू शकत नाही; एका संकल्पनेचे बहुविध अर्थ असे शकतात. हे बहुविध अर्थ हे या महत्त्वाच्या संकल्पनांचा वापर भाषांमध्ये, संशोधनातील भाषेमध्ये कसा लावला जातो यानुसार निश्चित होत जातात. समता, भिन्नत्व, निवड, काळजी, वेळ/ काळ आणि अनुभव; स्त्रीवादी अभ्यासातील महत्त्वाच्या असणाऱ्या या संकल्पांचे अन्वयार्थ ख्रिस्टीना ह्युग्स यांनी लावले असून त्या (आधुनिकोत्तरवादी) म्हणजेच Post-Modernist व (उत्तर-संरचनावादी) Post-Structuralist या दृष्टीकोनातून मांडणी करतात. Post-Structuralist दृष्टीकोनातून त्यांनी स्त्रीवादातील महत्त्वाच्या संकल्पनांचे देखील विश्लेषण केले आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये एका संकल्पनेबद्दल चर्चा केली आहे. ह्युग्स यांनी स्त्रीवादी सिद्धांकनासोबतच इतर महत्त्वाच्या अभ्यासाचा देखील उलेख केला आहे उदा. बटलर, स्पिवाक. प्रत्येक संकल्पनेबद्दल सांगताना मांडणी सोबतच त्या संकल्पनेभोवती झालेल्या सैद्धांतिक वादविवादांचीसुद्धा माहिती दिलेली आहे. काही अभ्यासकांचे त्यामधील जे मोलाचे योगदान राहिले आहे त्या कामांची पण दखल घेतली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्यातील कळीचे मुद्दे सारांश स्वरूपात मांडलेले असून सदर संकल्पना अधिक सविस्तरपणे समजण्यासाठी अजून वाचन साहित्याचे संदर्भ देखील दिलेले आहेत. पुस्तकामध्ये विविध १७ case studies असून त्यांच्यातून शिक्षण, लिंग परिवर्तन आणि लिंगभावाचे अर्थकारण असे काही महत्त्वाचे मुद्दे हाताळले आहेत. स्त्रीवादी सिद्धांकन, संकल्पनात्मक साक्षरतेची आवश्यकता आणि हे सर्व घात असताना सांस्कृतिक विविधतेची दखल घेण्याची निकड या सर्व मुद्य्यांच्या अनुषंगाने या case studies आलेल्या आहेत. पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये प्रत्येक प्रकरणाची संक्षिप्त स्वरूपात माहिती दिली आहे. सिद्धांकन, संकल्पनांचे प्रचलित अर्थ, संकल्पनाबाबत होणारे गैरसमज या सर्व शक्यतांची चर्चा केली आहे. उत्तर-संरचनावादी आणि आधुनिकोत्तरवादी सिद्धांकने यातून एखाद्या संकल्पनेचे बदलत जाणारे अर्थ हे भाषेच्या अनुषंगाने कसे महत्त्वाचे असू शकतात हे पुढे येते. बदलत जाणारा काळ आणि परिस्थिती यांमुळे भाषा आणि अर्थ यांच्यात कशी स्थित्यंतरे येतात हे आधुनिकोत्तरवादी सिद्धंकनातून मांडले गेले.

Concepts, Meanings, Games and Contests[संपादन]

Concepts, Meanings, Games and Contests या पहिल्या प्रकरणामध्ये ह्युग्स नमूद करतात की, संकल्पनांचे अर्थ आणि संज्ञा यांच्याबद्दल असणारे वादविवाद हे सामाजिक संरचना समजून घेण्यासाठी आणि संशोधनासाठी महत्त्वाचे असतात. पुढे लिंग आणि लिंगभाव यांच्यातील फरक या संकल्पनांभोवती असणारी चर्चा, उपयुक्तता कशी असते हे सांगितले आहे. प्रत्येक साहित्य हे कोणत्या तरी सैद्धांतिक किंवा संकल्पनात्मक चौकटीमध्ये मांडलेले असते. संकल्पनांचे जे विविध अर्थ असतात त्यांचे विश्लेषण तसेच सिद्धांकन करणे म्हणजे काय हे या प्रकरणामध्ये मांडले आहे. Derridean, Wittgenstein यांसारख्या अभ्यासकांच्या कामाचा संदर्भ घेऊन ह्युग्स भाषा आणि संकल्पना यांच्यातील बदलाल्त जाणारे संदर्भ व अर्थ याचा आढावा घेतात.

समता[संपादन]

दुसऱ्या प्रकरणामध्ये 'समता' संकल्पनेची चर्चा केली आहे. संकल्पनात्मक साक्षरतेचा विकास होतो तेव्हा ऐतिहासिक व सांस्कृतिक संदर्भांमध्ये त्याचा अर्थ हा बदलत जातो. यासाठी १८ व्या आणि १९ व्या शतकामध्ये स्त्रीवाद्यांनी 'समता' याबद्दल जी सिद्धांकनात्मक मांडणी केली त्या अनुषंगाने या संकल्पनेच्या दोन प्राथमिक मांडणी दिल्या आहे; समता म्हणजे सारखेपणा आणि दुसरे, समता म्हणजे फरक यासंदर्भात. समता म्हणजे सारखेपणा याची चर्चा हक्कांच्याबाबत समतेची मागणी जी स्त्रीवाद्यांनी केली यासंदर्भात येते तर समता म्हणजे 'फरक' याची चर्चा १८ व्या शतकातील मेरी वोलस्टेनक्राफ्ट यांच्या कामाचे उदाहरण घेऊन मातृत्वाचे जे केंद्रीकरण केले जाते याभोवती केली आहे. शेवटी भौतिक असमानतेबद्दल याबद्दल सुद्धा मुद्दे आले आहेत.

भिन्नत्व[संपादन]

समतेची चर्चा फरक किंवा भिन्नत्व या संकल्पनेशिवाय होणे शक्य नाही. तिसऱ्या प्रकरणामध्ये भिन्नत्व या संकल्पनेची चर्चा विविध अनुषंगाने केली आहे. भिन्नत्व याभोवती सारखेपणा, ओळखीमधील फरक, लैंगिक फरक, भिन्नत्व यावर उत्तर-संरचनावादी व वसाहतोत्तरवाद यातून झालेले विश्लेषण हे नमूद केले आहेत. सांस्कृतिक, उदारमतवादी व आधुनिकोत्तरवादी स्त्रीवाद यांमध्ये देखील 'भिन्नत्व' या संकल्पनेवर झालेल्या विश्लेषणाची दखल घेतली आहे. चौथे प्रकरण हे 'निवड' (Choice) या संकल्पनेचा उहापोह करणारे असून त्याची मांडणी Agency आणि Structure या दोन संकल्पनांच्या भोवतीने केली आहे. Rational Choice बद्दल बोलताना त्याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व व आर्थिक सिद्धांतातील त्याचे महत्त्व हे लक्षात घेतले आहे. सद्सद्विवेक बुद्धीने केलेली निवड याबद्दल अर्थशास्त्रीय स्त्रीवाद्यांनी केलेली मांडणी तसेच निवड केल्या जाणाऱ्या विषयाबद्दल उत्तर-संरचानावादी परिप्रेक्षातून केली जाणारी चर्चा यांचा समावेश केला आहे.

काळजी / चिंता[संपादन]

Care म्हणजे काळजी ही संकल्पना सैद्धांतिकपेक्षा देखील प्रायोगिक अधिक असल्याचे ह्युग्स मांडतात. पाचव्या प्रकरणामध्ये संकल्पना या कोणत्या सैद्धांतिक चौकटीमध्ये संकल्पित व प्रस्थापित केल्या जातात हे सांगताना Care ही प्रामुख्याने स्त्रियांची जबाबदारी मानली जाते जे अधोरेखित केले आहे. कुटुंब व्यवस्था आणि कामाचे क्षेत्र आशा दोन्ही संदर्भात ह्युग्स Care या संकल्पनेचे अर्थशास्त्रीय अनुषंगाने विश्लेषण करतात. कारण स्त्रीवाद्यांनी Care यामधील अर्थकारण जेव्हा प्रकर्षाने मांडले तेव्हाच त्याला 'काम' म्हणून बघितले जाऊ लागले; असे काम जे वैतानिक व अवैतनिक अशा दोन्ही स्वरूपात केले जाते.

काळ / वेळ[संपादन]

'वेळ' किंवा 'काळ' ही स्त्रीवाद्यांची अप्रगट संकल्पना आहे. काळ ही संकल्पना केवळ स्त्रीवाद व इतर सामाजिक परिवर्तनवादी चळवळींमध्येच महत्त्वाची ठरली आहे असे नाही तर तत्त्वज्ञान आणि वैयक्तिक अनुभव यांमध्ये देखील काळ हा एक कळीचा कोटीक्रम आहे. सहाव्या प्रकरणामध्ये काळ या संकल्पनेची तीनप्रकारे चर्चा केली आहे- Linear clock time, cyclical time, concepts of time that regard past, present and future. Linear clock time सामाजिक सिद्धांकन, संशोधन, ऐतिहासिक विश्लेषण यांमध्ये काळाची ही संकल्पना अधिक प्रभुत्वशाली आहे. स्त्रीवाद्यांनी काळाची/वेळेची प्रमुखप्रवाही संकल्पना ही पुरुष केंद्री असून स्त्रिया या घरकाम, पुनरुत्पादन यासोबत त्यांची 'वेळ' ही संकल्पना जोडलेली असते.

अनुभव[संपादन]

सातवे प्रकरण हे 'अनुभव' ही संकल्पना मांडणारे असून स्त्रीवादी राजकारणामध्ये 'जे जे वैयक्तिक, ते ते राजकीय' हे विधान मूलगामी ठरले त्यामागे अनुभव हे अतिशय कळीचा मुद्दा होता. संशोधनामध्ये देखील कथानक किंवा मुलाखती यांमध्ये अनुभव हे त्या त्या संदर्भात महत्त्वाचे ठरतात. या अनुषंगानेच ७० च्या दशकापासून ते आजपर्यंत स्त्रीवाद्यांचा भूमिदृष्टी सिद्धांत हा कसा उभा राहिला, त्यात स्त्रियांचे विशेषतः परिघावरील सामाजिक समूहातील स्त्रियांचे अनुभव हे कसे केंद्रस्थानी होते हे नमूद केले आहे. अस्मितांचे राजकारण व आधुनिकोत्तरवादी सिद्धांतांमध्ये प्रमाण म्हणून कोणाचे अनुभव हे ग्राह्य समजले जातात याला स्त्रीवाद्यांनी प्रश्नांकित केले. शेवटच्या निष्कर्षाच्या प्रकरणामध्ये सर्व प्रकरणांमधील महत्त्वाच्या मुद्य्यांचा समारोप केला आहे. संकल्पनात्मक साक्षरता कशाप्रकारे साध्य करता येऊ शकते या अनुषंगाने चर्चा केली आहे. महत्त्वाच्या संकल्पनांचे विविध अर्थ केवळ अभ्यासाने हा विद्यार्थ्यांचा हेतू नसून त्यांना त्यापलीकडे जाऊन त्यांचा परिप्रेक्ष्य आणि विविध बाजूंनी संकल्पना समजून घेण्याची दृष्टी विकसित होणे आवश्यक आहे. या पुस्तकाचा त्यासाठी उपयोग होतो. संकल्पनात्मक अर्थामधील जी विविधता आहे ती लक्षात घेण्यासाठी याप्रकारच्या प्रयत्नांमधून जागृती व जाणीव निर्माण होण्याच्या शक्यता असतात. अभ्यासाच्या क्षेत्राचा विकास, ज्ञानाच्या विविध प्रकारांची निर्मिती आणि सिद्धांत तसेह संशोधन यांची प्रमुख प्रवाही भाषा बदलण्याचा प्रयत्न हे यामधून साध्य करायचे आहे.

महत्त्वाच्या संकल्पना[संपादन]

संकल्पनात्मक साक्षरता, स्त्रीवादी भूमिदृष्टी सिद्धांत, उत्तर संरचनावाद, उत्तर-आधुनिक

प्रतिसाद[संपादन]

मिरियम वॉलरेवन यांनी सदर पुस्तकावर पुढीलप्रमाणे प्रतिक्रिया दिली असून या पुस्तकाचा प्रमुख हेतू हा सामाजिक शास्त्रांमधील विद्यार्थ्यांना ‘संकल्पनात्मक साक्षरता’ याची तोंडओळख व्हावी हा आहे. हयुग्स यांनी समता, भिन्नत्व, निवड, काळजी, काळ/वेळ आणि अनुभव या संकल्पना, त्यांच्यातील संकल्पनात्मक फरक, स्त्रीवादी सिद्धांकनातील त्यांचे महत्त्व हे खूप चांगल्याप्रकारे मांडले आहे. समाजशास्त्रीय व इतर संबंधित अभ्यासक्षेत्रे याबद्दल हयुग्स यांचा समतोल असा परिप्रेक्ष्य उत्तर-आधुनिकतावादी व उत्तर-संरचनावादी दृष्टीकोनांवर आधारित आहे. उत्तर-संरचनावादी दृष्टीकोनातील बहुआयामित्व हे नव्याने या अभ्यास क्षेत्रात आलेल्या संशोधक व विद्यार्थी यांना समजण्यास या पुस्तकाचा उपयोग होतो.[३]

संदर्भ सूची[संपादन]

  1. ^ Hughes, Christina (2002-10-08). Key Concepts in Feminist Theory and Research (इंग्रजी भाषेत). SAGE. ISBN 9780761969884.
  2. ^ "Christina Hughes | University of Warwick - Academia.edu". warwick.academia.edu (इंग्रजी भाषेत). 2018-03-24 रोजी पाहिले.
  3. ^ "AnyBody's Concerns 6(2003)". research.gold.ac.uk. 2018-03-24 रोजी पाहिले.